गुरुवार, 2 जुलाई 2009

मराठीविरोधातील गोष्टी ठेचून काढल्या पाहिजेत - राज ठाकरे

राज ठाकरे

मुंबई - मराठी भाषा मरेल, असे मला कधीच वाटत नाही; पण गद्दारांमुळे तिला धोका संभवतो. म्हणून ज्या गोष्टी मराठीच्या विरोधात आहेत, त्या ठेचून काढल्या पाहिजेत, असे प्रतिपादन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले. मराठीमाया डॉट कॉम या वेब मॅगझिन व मुद्रित मासिकाचे प्रकाशन राज ठाकरे यांच्या हस्ते आज झाले; त्या वेळी ते बोलत होते.
इतर राज्यांतील त्यांची भाषा व महाराष्ट्रातील मराठी भाषा यांच्यातील विरोधाभास मांडताना राज ठाकरे म्हणाले, की सर्व राज्यांत तेथील भाषाच महत्त्वाची असते; पण दुर्दैवाने महाराष्ट्रात तसे नाही. मराठी नागरिकांनी स्वभाषेबद्दल अभिमान बाळगला पाहिजे. हे शहर, हे राज्य माझे आहे, असे म्हणणारा कुणीच नाही. प्रत्येक जण स्वार्थी बनत चालला आहे. आपल्या अस्मितेबद्दल कुणाला काही पडलेच नाही. म्हणून या वेब मॅगझिनचा फोकसही मराठी भाषा, मराठी माणूस अशा याभोवतीच फिरत राहावा, ही इच्छा त्यांनी व्यक्त केली.
"मराठीमाया'च्या प्रकाशनाला "ग्रंथाली'चे दिनकर गांगल व ज्येष्ठ साहित्यिक राजन खान हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. भाषेत नेमके कोणते भान ठेवले पाहिजे याचे विवेचन करताना गांगल म्हणाले, की मुद्रित माध्यम मागे पडून संगणक व इंटरनेटने त्याची जागा घेतली आहे, हे मान्य करावेच लागेल. एकीकडे पुस्तकांचा व वर्तमानपत्रांचा खप वाढतोय; पण वाचन कमी होत चालले आहे. त्यामुळेही छापील माध्यमांचा प्रभाव क्षीण होत आहे. माध्यमांच्या या गदारोळात आपण भांबावून जात आहोत. आताचे युग करमणुकीचे आहे. आपल्यावर सातत्याने करमणुकींचा मारा होत असतो. यातच आपले जीवन अडकले आहे. जे आपल्यासमोर सादर होत आहे, त्याचा परिणाम काय होतोय हेही एव्हाना जाणवू लागले आहे.
भाषेच्या बाबतीत आग्रही भूमिका घेताना राजन खान यांनी मराठीच्या अस्तित्वाची चिंता व्यक्त केली. मराठी भाषा अस्तित्वहीन होईल, असे प्रतिपादन केले. त्यामागची कारणमीमांसा करताना ते म्हणाले, की जी भाषा पोट भरत नाही, ती मरते. मराठीने जर रोजगार दिला नाही, तर तीही मरणार. मराठीवर अतिक्रमण होत आहे, अशी जी सततची ओरड असते, ती सपशेल चुकीची आहे. कोणतीही भाषा दुसऱ्या भाषेवर अतिक्रमण करीत नाही. अतिक्रमण करीत आहेत, ते आतले सूर्याजी पिसाळ. ते मराठीचा जीव घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. आम्ही जेव्हा मराठीचा अभिमान बाळगतो, तेव्हा आम्हाला खेडवळ ठरवले जाते. मराठी भाषेचे संकर करू नका, असे आवाहन करताना ते म्हणाले, की मराठी भाषेत इंग्रजी लिहिण्याची खुमखुमी वाढत आहे. त्यांचे काहीतरी केले पाहिजे. ते आपली भाषा पोखरत आहेत. मुंबई-पुण्याची संकरित भाषा ही महाराष्ट्राची भाषा नव्हे. या देशात दोन टक्के लोक इंग्रजी भाषा बोलतात; पण देशाचा कारभारच त्या भाषेत चालतोय. या वेळी मराठीमाया.कॉमचे संचालक व संपादक यशवंत चौघुले यांनी मान्यवरांचे स्वागत केले; तर कार्यकारी संपादक सुलभा कोरे यांनी प्रास्ताविक केले.


सकाळ वृत्तसेवा
Wednesday, July 01st, 2009 AT 10:07 PM

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें