रविवार, 27 सितंबर 2009

सत्तेची किल्ली द्या; राज्यात चमत्कार घडवून दाखवितो - राज ठाकरे

सकाळ वृत्तसेवा
Monday, September 28th, 2009 AT 12:09 AM


मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या एका मोठ्या युद्धाला आपण सर्व जण सामोरे जात आहोत. या वेळी सत्तेची किल्ली माझ्या हातात द्या. मी महाराष्ट्रात चमत्कार घडवून दाखवितो, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज केले. मतांचा जोगवा मागायला विविध राजकीय पक्षांचे लोक तुमच्या दारात येतील. शिवसेना-भाजपचे मराठी प्रेमही आता जागे झाले आहे. त्यांचे मराठी मतांवर प्रेम आहे; मराठी माणसांवर नाही. सत्ताधारी आणि विरोधकांनी मुंबईतील मराठी टक्का घटविण्याचे काम केले आहे, असा जोरदार हल्ला राज यांनी विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या प्रचारसभेत केला.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या भांडुप विभागाच्या वतीने भांडुप विधानसभा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार शिशिर शिंदे यांची प्रचारसभा भांडुप-पश्‍चिम येथील खडी मशीन मैदानात आज दणक्‍यात झाली. या सभेत राज ठाकरे यांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस, तसेच शिवसेना-भाजप युती यांच्यावर चौफेर हल्ला चढविला. खोट्या नावांनी निवडणुकीची ओळखपत्रे, रेशनकार्डे व पॅनकार्डे बनविली जात आहेत. याबाबत कोणताही राजकीय पक्ष बोलायला तयार नाही. सगळ्यांचेच हात बरबटले आहेत, असा आरोप करीत त्यांनी जनतेसमोर पुरावे सादर करून खळबळ उडवून दिली. उत्तर भारतीयांच्या वाढत्या लोंढ्यांबाबत
टीका करताना राज म्हणाले, ""मुंबईत 227 नगरसेवक आहेत; त्यापैकी 73 नगरसेवक अमराठी आहेत. पुढच्या पालिकेच्या निवडणुकीत हा आकडा 150 च्यावर जाईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.
गेल्या लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी महेश जेठमलानी यांनाच मतदान केले ना? त्याआधी संजय निरुपम यांना मांडीवर घेऊन छट्‌पूजा केली, उत्तर प्रदेश दिन साजरे केले. तेव्हा ते त्यांना कसे चालले? मराठी माणसांवरील हे शिवसेना-भाजपचे प्रेम बेगडी आहे, असा टोला त्यांनी लगावला.
आज मुंबई, महाराष्ट्रात नोकऱ्या आहेत. उत्तर भारतीय इथे येऊन नोकऱ्या लाटत आहेत. स्वतःचे मतदारसंघ बांधत आहेत. शिवसेना आणि भाजप याविषयी का नाही बोलत? उत्तर भारतातील राज्यकर्ते त्यांना शस्त्राचे परवाने देतात. सुरक्षा रक्षक म्हणून इथे ते लोक रुबाबात नोकरी करतात. मात्र, एकाही मराठी माणसाला इथले सरकार एकही परवाना का देत नाही. त्यांचे कसलेही रेकॉर्ड इथे ठेवले जात नाही. हा या शहराच्या सुरक्षेला मोठा धोका आहे, अशी भीतीही राज ठाकरे यांनी व्यक्त केली.
इथल्या राष्ट्रीय पक्षांचे लोक नातेवाइकांना निवडणुकीची तिकिटे देत आहेत. मग पक्षासाठी राबणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी जायचे कुठे, त्यांनी काय आयुष्यभर सभा-समारंभांत सतरंज्याच टाकायच्या काय? असा सवाल करीत नातेवाइकांना पोसण्यासाठी राजकीय पक्ष काढले असल्याचा टोला राज यांनी लगावला.
राम कदम, सुधाकर चव्हाण यांच्यासह सर्वांनाच दिलेली उमेदवारी स्थानिक पदाधिकाऱ्यांना विश्‍वासात घेऊन दिली असल्याचे ते म्हणाले.
या सभेला मुंबईतील मनसेचे उमेदवार सत्यवान दळवी, मंगेश सांगळे, राम कदम, आप्पासाहेब मगरे, सतीश नारकर, तसेच मनसेचे पदाधिकारी भाई माईनकर, सतीश अधिकारी आदी उपस्थित होते. प्रचाराच्या शुभारंभाचे श्रीफळ राज यांनी वाढविले. भांडुपमधील स्थानिक उमेदवार शिशिर शिंदे यांनी निवडून आल्यानंतर भांडुपमध्ये सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्याचे, तसेच सेवन स्टार हॉटेलमध्ये तरुणांना नोकऱ्या मिळवून देण्याचे आश्‍वासन या वेळी दिले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें