शनिवार, 14 नवंबर 2009

मराठीचा मुद्दा निवडणूक जिंकण्यासाठी उपयोगी नाही - भारतकुमार राऊत

मराठीचा मुद्दा निवडणूक जिंकण्यासाठी उपयोगी नाही - भारतकुमार राऊत
सकाळ वृत्तसेवा
Sunday, November 15, 2009 AT 12:00 AM (IST)


ठाणे - निवडणुका जिंकण्यासाठी मराठी माणसाचा प्रभाव पडत नाही, तर दुसऱ्या मराठी माणसाला पाडण्यासाठीच त्याचा प्रभाव पडतो. निवडून येण्याच्या गुणवत्तेवर मराठी माणसाचा प्रभाव नाही. त्यामुळे प्रत्येक निवडणूक ही मराठी माणसासाठी "पाडवणूकच' ठरते. हे अगदी महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपासून होत आले आहे, अशी खंत ज्येष्ठ पत्रकार भारतकुमार राऊत यांनी व्यक्त केली.

अर्थ फाऊंडेशन आयोजित नरेंद्र बल्लाळ स्मृती व्याख्यानमालेत "निवडणुका आणि मराठी मानसिकता' या विषयावर श्री. राऊत बोलत होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षपद राजकीय विश्‍लेषक डॉ. उदय निरगुडकर यांनी भूषविले.

या वेळी श्री. राऊत म्हणाले की, भाषावार प्रांतरचनेमुळे प्रादेशिक अस्मिता असणे स्वाभाविक आहे व आवश्‍यकही आहे; परंतु स्वातंत्र्यानंतरच्या प्रत्येक निवडणुकीत मराठी माणूस "मराठी' म्हणून मतदान करीत नाही. आज मुंबईत 19 अमराठी आमदार निवडून आले आहेत. इतर भाषक आमदारांना विरोध नाही, हे सांगत दररोज सुमारे 350 कुटुंबे महाराष्ट्रात येतात, असेही त्यांनी नमूद केले; पण अशीच जर परिस्थिती राहिली तर 2014 मध्ये होणारी लोकसभा व राज्यसभा निवडणूक ही मुंबईसह महाराष्ट्राची शेवटची निवडणूक ठरण्याची शक्‍यता आहे, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

ते पुढे म्हणाले की, मराठी माणसाच्या पीछेहाटीचे आणखी एक कारण म्हणजे आपली मराठी माणसाचा आर्थिक कमकुवतपणा. महाराष्ट्राच्या दरडोई उत्पन्नातून मुंबई जर वेगळी केली तर ओरिसा, छत्तीसगड अशा राज्यांबरोबर आपण येतो. "आपण नोकरीत पडतो व धंद्यात पडतो' अशीच आपली मानसिकता आहे. तसेच स्वातंत्र्यानंतर दिल्लीत मराठी माणसाला अनेक मानाची पदे मिळाली; पण नेतृत्व व मानाची पदे यात फरक आहे. आज महाराष्ट्रातून प्रत्येक स्तरावर राष्ट्रीय नेतृत्व घडविण्याची गरज आहे. समाज दुर्बल झाला की त्याचे प्रतिनिधित्व करणारी भाषाही दुर्बल होते. आज मराठी समाजाची उन्नती आवश्‍यक आहे. त्यासाठी सर्व मराठी माणसांनी मराठी म्हणून मतदान करण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.

1 टिप्पणी: