सोमवार, 9 नवंबर 2009

विधानसभेत अ'राज'क; मनसेचे चौघे निलंबित

विधानसभेत अ'राज'क; मनसेचे चौघे निलंबित
सकाळ वृत्तसेवा
Monday, November 09, 2009 AT 01:57 PM (IST)

मुंबई - महाराष्ट्राच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात नव्या विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सदस्यांनी धुमाकूळ घालत लोकशाहीवर घाला घालण्याचा प्रयत्न केला; परंतु सर्व पक्षांच्या सदस्यांनी एकत्र येऊन लोकशाहीच्या मंदिराची प्रतिष्ठा जपण्यासाठी "मनसे'च्या चार सदस्यांना निलबंनाची शिक्षा केली.

विधानसभा सदस्यत्वाची हिंदीतून शपथ घेणाऱ्या समाजवादी पक्षाच्या अबू असीम आझमी यांना "मनसे'च्या सदस्यांनी लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण केली. त्यामुळे सभागृहात एकच गोंधळ उडाला. मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह सर्व पक्षांच्या नेत्यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. राज्याच्या काही शहरांमध्ये हिंसाचाराच्या रूपाने विधिमंडळातील घटनेचे पडसाद उमटले.

अशोभनीय वर्तन आणि सभागृहाचा अवमान केल्याबद्दल शिशिर शिंदे, राम कदम, रमेश वांजळे आणि वसंत गिते या सदस्यांना हंगामी अध्यक्ष गणपतराव देशमुख यांनी चार वर्षांसाठी निलंबित केले. मुंबई आणि नागपूर विधान भवनांच्या परिसरात प्रवेश करण्यासही या चौघांना मनाई करण्यात आली आहे.

नवनिर्वाचित सदस्यांना शपथ देण्यासाठी बोलाविण्यात आलेल्या अधिवेशनात भाषेवरून एखाद्या सदस्याला मारहाण करण्याची महाराष्ट्राच्या इतिहासातील ही पहिलीच घटना आहे. विधानसभेतील या घटनेचे पडसाद राज्यात विविध भागांत उमटले. भिवंडीत समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केल्याप्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आल्याची माहिती गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी दिली. ठाणे, भिवंडी आणि नाशिक येथे पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आल्याचे सांगण्यात आले. पुरोगामी महाराष्ट्राला काळिमा फासणारी घटना घडली असून, त्याचा सभागृहात तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला.

विधानसभेवर निवडून आलेल्या सदस्यांना शपथ देण्यासाठी विधानसभेचे तीन दिवसीय विशेष अधिवेशन आजपासून सुरू झाले. सभागृहाचे ज्येष्ठ सदस्य गणपतराव देशमुख हंगामी अध्यक्ष म्हणून कामकाज पाहत होते. ज्येष्ठ सदस्य मंत्री, माजी मंत्री या क्रमाने शपथविधी पार पडल्यानंतर सदस्यांना शपथ देण्याचे काम सुरू झाले. या निवडणुकीत "मनसे'चे 13 आमदार निवडून आले आहेत. प्रत्येक सदस्याने मराठीतूनच शपथ घेतली पाहिजे, असा आग्रह "मनसे'ने पहिल्यापासून धरला होता. मनसेचे गटनेते बाळा नांदगावकर यांनी त्या संदर्भात औचित्याचा मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न केला; परंतु अध्यक्षांनी त्यास नकार दिला. शपथ घेतल्याशिवाय कोणत्याही सदस्याला बोलता येणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आणि सदस्यांचा शपथविधी सुरू ठेवला.

अबू आझमी शपथ घेण्यासाठी अध्यक्षांच्या आसनाच्या बाजूला असलेल्या पोडियमजवळ गेले. त्यांनी हिंदीतून शपथ घेण्यास सुरवात करताच, "मनसे'चे रमेश वांजळे आझमी यांच्या दिशेने धावले आणि त्यांचे पोडियम खेचून खाली घेतले. त्यांच्यापाठोपाठ मनसेचे अन्य सदस्य मराठीतच शपथ घेतली पाहिजे, असे फलक फडकवीत वेलमध्ये धावले आणि एकच गोंधळ उडाला. त्या वेळी आझमी यांच्या मदतीला पहिल्यांदा धावल्या त्या "शेकाप'च्या सदस्या मीनाक्षी पाटील. त्यानंतर कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या सदस्यांनी आझमी यांना घेरून, त्यांचे संरक्षण करण्याचा प्रयत्न केला. शिवसेना-भाजपचे सदस्य मात्र जागेवर उभे होते. "मनसे'च्या सदस्यांनी श्रीमती पाटील यांच्या अंगावर कापडी फलक भिरकावले. काही क्षण वातावरण अतिशय स्फोटक झाले. श्रीमती पाटील आझमी यांना अध्यक्षांजवळ घेऊन गेल्या आणि तिथे त्यांना शपथ घ्यायला लावली. त्या वेळीही त्यांनी हिंदीतूनच शपथ घेतली. अध्यक्षांशी हस्तांदोलन करून विरोधी सदस्यांच्या बाजूने आपल्या आसनाकडे जात असतानाच, शिशिर शिंदे यांनी त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला. त्याबरोबर वांजळे, कदम, गिते हे सदस्य वेलमध्ये आले आणि त्यांना धक्काबुक्की करू लागले. आझमी यांना लाथाबुक्‍यांनी मारण्यात आले. एकाने त्यांना थप्पड मारली, त्या वेळी जलसंपदामंत्री अजित पवार, संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील, आदिवासी विकासमंत्री बबनराव पाचपुते; तसेच सत्ताधारी सदस्यही आझमी यांच्या बचावासाठी धावून गेले. सभागृहात रणकंदन सुरू झाले. त्या वेळी अध्यक्षांनी अर्ध्या तासासाठी सभागृहाचे कामकाज तहकूब केले.

सभागृहाचे कामकाज पुन्हा सुरू झाल्यानंतर मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी "मनसे'च्या आमदारांनी अबू आझमी यांना केलेल्या मारहाणीचा तीव्र शब्दांत निषेध केला. या प्रकरणी कडक कारवाईची मागणी त्यांनी अध्यक्षांकडे केली; त्याला उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, भाजपचे गटनेते एकनाथ खडसे यांनी पाठिंबा दिला. मात्र, शिवसेनेचे गटनेते सुभाष देसाई यांनी तळ्यात-मळ्यात भूमिका घेतल्याने शिवसेनेचा या प्रश्‍नावर गोंधळ उडाल्याचे चित्र दिसले.
सभागृहातील 246 सदस्यांचा शपथविधी पार पडल्यानंतर संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी विधानसभा सदस्यांना मारहाण करणारे आणि सभागृहाच्या विशेषाधिकाराचा भंग करणारे मनसेचे शिशिर शिंदे, राम कदम, रमेश वांजळे व वसंत गिते यांना चार वर्षांसाठी निलंबित करण्याचा ठराव मांडला. सत्ताधारी सदस्यांच्या बहुमताच्या जोरावर हा ठराव मंजूर करण्यात आला. त्या वेळी शिवसेना व भाजपचे सदस्य जागेवर बसून होते. त्यानंतर अध्यक्ष देशमुख यांनी या चार सदस्यांना पुढील चार वर्षे निलंबित करण्यात येत असल्याचे; तसेच त्यांना मुंबई व नागपूरच्या विधान भवन परिसरात प्रवेश करण्यास मनाई करण्यात येत असल्याचे जाहीर केले.

1 टिप्पणी:

  1. इस टिप्पणी को एक ब्लॉग व्यवस्थापक द्वारा हटा दिया गया है.

    जवाब देंहटाएं