बुधवार, 18 नवंबर 2009

भांडण राजने सुरू केले; मी हिंदीतच बोलणार - आझमी

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, November 17, 2009 AT 09:57 PM (IST)

लखनौ - "महाराष्ट्राच्या विधानसभेत मी हिंदीतच बोलणार, कोणाच्या धमकावण्याने घाबरून मी भाषा बदलणार नाही,'' असा इशारा समाजवादी पक्षाचे नेते अबू असीम आझमी यांनी मंगळवारी मनसेला उद्देशून दिला.

विधानसभेत हिंदीतून शपथ घेतल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आमदारांनी केलेल्या धक्काबुक्कीमुळे उत्तर प्रदेशात "हीरो' बनविण्यात आलेले आझमी यांचा पक्षाने सत्कार केला. त्याला उत्तर देताना आझमी यांनी वरील इशारा दिला. पक्षाचे अध्यक्ष मुलायमसिंह आणि राष्ट्रीय सरचिटणीस अमरसिंह यांनी आझमी यांना पक्षाचा मुस्लिम चेहरा म्हणून समोर आणण्याचे स्पष्ट संकेत या निमित्ताने दिले. "राज ठाकरे यांच्या आमदारांना मी तेथेच प्रत्युत्तर देऊ शकलो असतो; मात्र मुलायमसिंह यांची शिकवण आणि संस्कारांनी मला रोखले,'' असेही आझमी म्हणाले.

महाराष्ट्राच्या विधिमंडळात हिंदीतून शपथ घेऊन परतलेले आझमी यांचे येथे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. त्यानंतर पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत मुलायमसिंह यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. "मराठी येत नाही तर काय करू? जगण्यासाठी रोजगार मिळवू, की शाळेत जाऊन शिकू,' असे ते म्हणाले.
दरम्यान, आझमींना महाराष्ट्रात येऊन बोलू तर देत, असे आव्हान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिले.

"अबू आझमी फक्त पेटवापेटवीचे धंदे करीत आहेत. लखनौमध्ये जाऊन अशा प्रकारची वक्तव्ये करून राजकारण करण्याचा हा प्रकार आहे. त्यांना जे बोलायचे ते येथे येऊन बोलू दे, मग नंतर बघू,' अशी प्रतिक्रिया "मनसे'चे सरचिटणीस व आमदार शिशिर शिंदे यांनी आज येथे दिली.

सारे काही व्होट बॅंकेसाठी - शिंदे
शिंदे यांच्याशी संपर्क साधल्यावर ते म्हणाले, "आझमी दोन जागांवर निवडून आले आहेत, त्यांपैकी एक जागा रिकामी झाली आहे. त्यामुळे दुसरी जागा निवडून आणण्यासाठी व व्होट बॅंकेच्या राजकारणासाठी ते ही बडबड करीत आहेत. आम्ही त्यांच्या बडबडीला महत्त्व देत नाही.''

"मुलायमसिंह हेच देशातील मुस्लिमांचे खरे मसीहा आहेत,' असे प्रतिपादनही आझमी यांनी लखनौमधील सत्काराला उत्तर देताना केले. आझमी यांनी या वेळी पक्षातून बाहेर पडलेल्या आझम खान यांच्यावरही जोरदार टीका केली.

"मनसे' आमदारांना प्रत्युत्तर न देता महात्मा गांधीजींच्या अहिंसेच्या मार्गाचा स्वीकार केल्याबद्दल अमरसिंह यांनी या वेळी आझमी यांचे कौतुक केले. या प्रकरणामुळे आझमी जनतेच्या नजरेत "हीरो' बनल्याचे ते म्हणाले, तर राष्ट्रभाषेबद्दल दाखवलेल्या सन्मानाबद्दल आझमी यांचे लखनौसह उत्तर प्रदेशातील इतर पाच शहरांमध्येही भव्य सत्कार करण्याची घोषणा मुलायमसिंह यांनी केली. खासदार जया बच्चन यांची उपस्थिती या वेळी विशेष लक्ष वेधत होती, तर खासदार जयाप्रदा यांची अनुपस्थिती मात्र चर्चेचा विषय ठरली.

अमरसिंह यांचा पक्षावर वाढता प्रभाव; तसेच मुलायमसिंह यांनी भाजप बंडखोर कल्याणसिंह यांच्याशी केलेल्या सलोख्यामुळे दुखावलेले मुस्लिम नेते आझम खान पक्षातून बाहेर पडले होते. बाबरी मशीद विध्वंसाला कल्याणसिंहच कारणीभूत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. या पार्श्‍वभूमीवर आझमी यांना पक्षाचा मुस्लिम चेहरा म्हणून पुढे आणण्याचा पक्षाचा विचार आहे. त्यातच हिंदीतून शपथ घेण्याच्या प्रकरणावरून "मनसे'ने केलेल्या गदारोळामुळे आझमी यांचे पक्षातील वजन आणखी वाढल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे त्यांना पक्षात विशेष स्थान मिळणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें