रविवार, 13 दिसंबर 2009

विदर्भाच्या लढाईसाठी राज ठाकरे उद्या नागपूरच्या रणांगणात!

नागपूर, १३ डिसेंबर
स्वतंत्र तेलंगणाच्या पाश्र्वभूमीवर पुन्हा एकदा स्वतंत्र विदर्भात घोषणा दिल्या जात आहेत. विदर्भातील प्रश्नांना केवळ वाचाच फुटावी म्हणून नव्हे, तर ते सुटावे यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे येत्या मंगळवारी नागपूरच्या रणांगणात उतरणार आहेत. राज ठाकरे यांच्या नागपुरातील आगमनामुळे थंड पडलेल्या विधानसभा अधिवेशनात जान येणार असून राज यांच्या स्वागताची जय्यत तयारी विदर्भातील मनसेच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. यावेळी स्वतंत्र विदर्भाच्या प्रश्नावरील मनसेची भूमिका राज ठाकरे स्पष्ट करणार आहेत.
राज्यात शिवसेना-भाजप युती गेले दोन दशकांहून अधिक काळ असून हिंदूत्वाच्या मुद्यावर एकत्र आलेले हे दोन पक्ष स्वतंत्र विदर्भाच्या प्रश्नावर मात्र दोन टोकांवर आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा स्वतंत्र विदर्भाला विरोध असून सेनेतून फुटून स्वत:चा पक्ष काढलेल्या राज ठाकरे हे त्यांच्या काकांप्रमाणेच अखंड महाराष्ट्राच्या बाजूने उभे राहणार की, तेलंगणाच्या धर्तीवर स्वतंत्र विदर्भाची पाठराखण करणार, याचा उलगडा होणार आहे. विदर्भातील शेतक ऱ्यांच्या आत्महत्या, कापूस माफियांचा प्रश्न, नक्षलवादी कारवाया, प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन, सोयाबीन, धान या विदर्भाच्या वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या प्रश्नांवरून ते सरकारवर तुटून पडतील, असे संकेत आहेत.
विधानसभा निवडणुकीत मनसेचे १३ आमदार निवडून आले असून १२ व्या विधानसभा अधिवेशनात शपथविधीच्या वेळी मुंबईत मनसेच्या आमदारांनी सपाचे आमदार अबू आझमी यांना दिलेल्या झटक्यापासून मनसेची व राज ठाकरे यांची लोकप्रियता शिगेला पोहोचली आहे. अबू आझमी यांना कानफटात मारल्यामुळे तसेच, गोंधळ घातल्यामुळे मनसेच्या चार आमदारांना चार वर्षासाठी निलंबित करण्यात आले आहे. त्यांना विधानसभेच्या आवारातही प्रवेश करण्यास बंदी घातली असून राज ठाकरे यांच्यासमवेत रमेश वांजळे, वसंत गिते, राम कदम आणि शिशिर शिंदे हे चारही आमदार उपस्थित राहणार आहेत. यातील शिशिर शिंदे यांनी सदस्यत्वाची शपथ न घेतल्यामुळे वैधानिक पेचप्रसंग निर्माण झाला असून त्यांना शपथ द्यावयाची झाल्यास विधानसभेत शपथविधी पुरता प्रवेश देण्याचा ठरावा मांडावा लागणार आहे. त्यामुळे सध्या विधानसभेत मनसेचे नऊ आमदार किल्ला लढवत आहेत. विदर्भात अधिवेशन घेण्यामागे येथील प्रश्न सुटणे, ही प्रमुख भूमिका असूनही विदर्भाच्या तोंडाला कायमच सरकारकडून पाने पुसली जात असल्याचा आरोप मनसेचे गटनेते बाळा नांदगावकर यांनी केला आहे.
नक्षलवाद्यांचा प्रश्न हा केवळ गडचिरोली व चंद्रपूर पुरता मर्यादित राहिलेला नसून तो केव्हाही नागपूपर्यंत येऊन ठेपेल, अशी भीती जाणकारांकडून व्यक्त करण्यात येत आहे. त्याचे पडसाद विधिमंडळाच्या अधिवेशनातही उमटले. वरिष्ठ पोलीस अधिकारी नागपूरमध्येच मुक्काम ठोकतात. त्यांनी गडचिरोलीमध्ये जाणे आवश्यक आहे, तर गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी एक दिवस तरी गडचिरोलीत मुक्काम करण्याची हिंमत दाखवावी, असे आव्हान बाळा नांदगावकर यांनी केले आहे. गेल्या चार महिन्यात नक्षलवाद्यांकडून ५२ पोलीस कर्मचाऱ्यांची हत्या करण्यात आली असून या शहिदांच्या विधवांना निवासस्थाने खाली करण्याच्या नोटिसा पाठवण्यात येत असल्याच्या तक्रारी आहेत. हा प्रश्न राज ठाकरे उचलून धरणार असून गोसीखुर्द, बेंबळ तसेच, उध्र्व वर्धा प्रकल्पांतील प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन आणि शेतक ऱ्यांच्या आत्महत्येच्या प्रश्नावरून राज ठाकरे हे सरकारला जाब विचारणार असल्याचे विश्वसनीयरीत्या समजते. गेल्या पाच वर्षात सात हजार शेतक ऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. राज्य शासन व पंतप्रधान पॅकेजमधील मदतीनंतरही शेतकरी आत्महत्या का करत आहेत तसेच, या पॅकेजमधील घोटाळ्याच्या चौकशीची मागणी केली जाणार आहे.
विमानतळापासून राज यांची भव्य रॅली निघणार असून विधानभवनाच्या प्रांगणातील मनसेच्या कार्यालयाला भेट देणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
हिवाळी अधिवेशनातील मोठा मोर्चा
हिवाळी अधिवेशनाच्या पाश्र्वभूमीवर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नागपूर भेटीमुळे कुतूहल निर्माण झाले आहे. गेल्या तीन वर्षात राज यांनी लोकप्रियतेचे शिखर गाठले असले तरी नागपूरमधील लोक राज यांनी शिवसेनेत असताना विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष म्हणून १९९३ साली काढलेल्या मोर्चाचीच आठवण आजही काढतात. १९९३ मध्ये हिवाळी अधिवेशनाच्या वेळी राज यांनी बेरोजगार व विद्यार्थ्यांचा मोठा मोर्चा काढला होता. नागपूरच्या गेल्या २५ वर्षाच्या राजकीय इतिहासात सर्वात मोठा मोर्चा आदिवासी गोवारींचा होता. त्यात सुमारे ३० हजार गोवारी सहभागी झाले होते. त्यानंतरचा मोठा मोर्चा राज ठाकरे यांचा होता. तेव्हापासून आजपर्यंत राज ठाकरेंच्या मोर्चापेक्षा मोठा मोर्चा निघालेला नाही.
(
संदीप आचार्य)

1 टिप्पणी: