शनिवार, 16 जनवरी 2010

स्वतंत्र विदर्भास "मनसे'चा विरोध - राज ठाकरे

स्वतंत्र विदर्भास "मनसे'चा विरोध - राज ठाकरे
सकाळ वृत्तसेवा
Sunday, January 17, 2010 AT 03:30 AM (IST)


पुणे - "स्वतंत्र विदर्भाची मागणी ही तेथील आम जनतेची मागणीच नाही, तर ज्यांना राजकारणात फारसे भवितव्य राहिले नाही, त्यांच्या अस्तित्वाची मागणी आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा स्वतंत्र विदर्भास पूर्णपणे विरोध असून येत्या काळात तो आम्ही दाखवून देऊ,'' असे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी स्पष्ट केले.

"रोटरी क्‍लब ऑफ पुणे लक्ष्मी रस्ता'च्या वतीने आयोजित कार्यक्रमात सुधीर गाडगीळ यांनी ठाकरे यांची मुलाखत घेतली, त्यावेळी ते बोलत होते. ठाकरे म्हणाले, ""अजूनही बेळगाव-कारवार-निपाणी महाराष्ट्रात आलेले नाही, तोवरच तुम्ही महाराष्ट्राचा तुकडा पाडून मागता आहात? युती सरकारचा कालावधी सोडला, तर स्थापना झाल्यापासून महाराष्ट्रात कॉंग्रेसचेच राज्य आहे. दोन विदर्भाचे मुख्यमंत्री झाले. त्यामुळे विदर्भावर अन्याय कॉंग्रेसच्याच नेत्यांनी केला आहे. मग तुमच्यावर राजकीय अन्याय झाला, तर त्याचा राग महाराष्ट्रावर का काढताय? या नेत्यांचेच राजकारण विकासाच्या आडवे येते. मग मेंदूला रक्तप्रवाह होत नसेल, तर "डॉक्‍टर' बदलला पाहिजे. मुंडके छाटणे हा त्यावर इलाज होऊ शकतो का?''

अ"राज'कीय राज उलगडले
शिक्षण, वाचन, चित्रपट, संगीत अशा आवडीनिवडींपासून ते कौटुंबिक प्रश्‍नांवर ठाकरे यांनी दिलखुलास उत्तरे दिली. ते म्हणाले, ""आचार्य अत्रे, पु. ल. देशपांडे अशा अनेकांचे लेखन, हृदयनाथ मंगेशकर, श्रीनिवास खळे, सुधीर फडके यांचे संगीत मला मनापासून आवडते. रोज एक चित्रपट पाहिल्याशिवाय मी झोपत नाही. "गांधी,' "गॉडफादर' असे अनेक चित्रपट मी अनेकदा पाहिले असून काही चित्रपट तर शंभराहून अधिक वेळा पाहिले आहेत. संगीतकार असो की नेता, त्याने जगातील उत्तम ऐकले-वाचले पाहिजे. अन्यथा त्याच्या करिअरमध्ये तोचतोपणा येतो. श्रीपाद अमृत डांगे, जॉर्ज फर्नांडिस, अटलबिहारी वाजपेयी यांचे वक्तृत्व मी ऐकले आहे. मला स्वतःला मात्र मुद्दे काढून भाषण करणे जमत नाही.''
ते म्हणाले, ""एका पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेणे, हे माझ्यासाठी प्रचंड मोठे आव्हान होते. इतर कोणीही अशा परिस्थितीतून जाऊ नये, असे वाटावे, इतका त्रास अशा वेळी होतो. तसेच आता अनेक जण माझ्याकडे इतक्‍या अपेक्षेने पाहत आहेत, की त्या अपेक्षांचीच भीती वाटते. मी अजून काहीच केलेले नाही, तरीही अनेक जण माझ्या सभांना गर्दी करतात, सह्या घेतात. त्या सर्व अपेक्षांचे ओझे प्रचंड आहे.'' यावेळी दीपा भागवत, डॉ. परेश गांधी, डॉ. मिहीर सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

हिंदीचा राग नाही; पण...
ठाकरे म्हणाले, ""कदाचित महाराष्ट्रातील चांगले हिंदी येत असलेल्या मूठभर राजकारण्यांमध्ये माझा समावेश होईल, इतके माझे हिंदी उत्तम आहे. एखाद्या शब्दात कोणत्या अक्षराखाली नुक्ता द्यायचा, हे मला ठाऊक आहे. वडिलांचा उर्दूचा उत्तम अभ्यास होता. त्यामुळे हिंदी कधी संपते आणि उर्दू कोठे सुरू होते, ते मला माहिती आहे. "मेरे पास मॉं है'ची तडफ मराठीतील वाक्‍यात येणार नाही आणि "मंत्रालयासमोर जोड्याने मारेन,'ची मजा हिंदीतील वाक्‍याला येणार नाही. प्रत्येक भाषेला आपले एक स्थान आहे. त्यामुळे हिंदीचा राग करण्याचा प्रश्‍नच नाही. पण महाराष्ट्रात मराठीच पाहिजे. हिंदी भाषेच्या आडून राजकारण मी चालू देणार नाही.'

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें