सोमवार, 18 जनवरी 2010

राज ठाकरे आले, आयोजकांना झोडून गेले

राज ठाकरे आले, आयोजकांना झोडून गेले
सकाळ वृत्तसेवा
Monday, January 18, 2010 AT 05:37 PM (IST)

पुणे - अपुरी जागा, विद्यार्थ्यांनी घातलेला गोंधळ आणि नंतर स्वतः राज ठाकरे यांनीच खरपूस भाषेत आयोजकांचा घेतलेला समाचार यामुळे चौथा स्तंभ पत्रकारिता पुरस्काराच्या कार्यक्रमाला जमलेल्या श्रोत्यांचा सोमवारी हिरमुड झाला.

ओम ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट अकादमीने कोथरूडमधील एमआयटी संस्थेच्या ज्ञानेश्‍वर सभागृहात चौथा स्तंभ विशेष पत्रकारिता पुरस्काराचे आयोजन केले होते. मात्र, पुरस्कारार्थी पत्रकार, त्यांचे स्नेही, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते आणि एमआयटीमधील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्यामुळे सभागृह अपुरे पडले. राज ठाकरे यांच्या समर्थकांची घोषणाबाजी आणि त्याला विद्यार्थ्यांनी दिलेला प्रतिसाद यामुळे कार्यक्रमाच्या सुरवातीपासूनच गोंधळाला सुरवात झाली.

सभागृहातील परिस्थिती पाहून कार्यक्रमात बोलण्याचा मला "मूड' नाही, असे राज ठाकरे यांनी स्पष्टपणे सांगून टाकले. कार्यक्रमाची जागा चुकल्याचेही त्यांनी आयोजकांच्या निदर्शनास आणून दिले. पत्रकारमंडळी खूप कष्ट करून, वेळप्रसंगी उपाशी राहून आपल्यापर्यंत बातम्या पोचवित असतात. त्यांच्याशी खूप काही बोलायचे होते. मात्र आत्ता इथे काही बोलले, तर त्याचे गांभीर्य राहणार नाही. पुरस्कारार्थी पत्रकारांना नंतर भेटून मी त्यांच्याशी बोलेन, असे सांगून त्यांनी भाषण आटोपते घेतले. वंदे मातरम सुरू असताना विद्यार्थी एकमेकांशी गप्पा मारत असल्याबद्दलही त्यांनी खेद व्यक्त केला.

1 टिप्पणी: