मंगलवार, 19 जनवरी 2010

मी झोपेतून दचकून उठतो - राज ठाकरे

मी झोपेतून दचकून उठतो - राज ठाकरे
सकाळ वृत्तसेवा
Wednesday, January 20, 2010 AT 12:53 AM (IST)


ठाणे - ''राज्यातील नागरिकांच्या अपेक्षा व सभेला गेल्यानंतर वाजणाऱ्या शिट्यांची मला मनापासून भीती वाटते. मी अनेक वेळा झोपेतून दचकून उठतो. बराच वेळ झोप लागत नाही. लोकांच्या अपेक्षा पाहून त्या पूर्ण करण्याची माझी लायकी आहे का, असा प्रश्‍न पडतो. परमेश्‍वराकडे माझे हेच मागणे आहे, की लोकांच्या अपेक्षेनुसार सर्व काही घडो,'' असे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे सोमवारी रात्री येथे मोठ्या कळकळीने म्हणाले.

नवनिर्माण करिअर ऍण्ड रिसर्च अकादमीच्या वतीने नवनिर्माण गौरव पुरस्कार देण्यात आले. त्यानंतर झालेल्या प्रकट मुलाखतीत ते बोलत होते. "गडकरी रंगायतन'मध्ये सव्वा तासाहून अधिक वेळ चाललेल्या या मुलाखतीतून राज ठाकरे यांच्या मनाचे विविध पैलू उलगडत गेले. कलेपासून राजकारणापर्यंतच्या विषयांवर कवी अशोक नायगावकर, पत्रकार राजू परुळेकर आणि संदीप आचार्य यांनी ठाकरे यांच्याशी संवाद साधला. ठाकरे यांच्या हस्ते डॉ. संदीप केळकर, मंजिरी देव, सुरेंद्र दिघे, प्रदीप इंदूलकर, श्रीकांत बोजेवार आणि संदीप आवारी यांचा गौरव करण्यात आला.

मुलाखतीची सुरुवात तुम्ही भाषण कसे करता, कडक कसे बोलता, या प्रश्‍नाने झाल्यावर राज ठाकरे यांनी आपण खूप वाचत असल्याचा गैरसमज पसरला आहे, असे सांगून सर्वांना चकित केले. मात्र, "जीएं'च्या पुस्तकाचे चार खंड राज ठाकरे यांनी वाचले असल्याचे राजू परुळेकर यांनी ठामपणे सांगितले. त्यानंतर बोलण्याच्या ओघात राज यांनी सध्या "स्टोरी ऑफ सिंगापूर' हे पुस्तक वाचत असल्याचे सांगितले. त्यात मुंबई, ठाणे, पुण्याबद्दल वाचत असल्याचे वाटते, असेही ते म्हणाले. निवडक पुस्तकांबरोबरच दररोज वर्तमानपत्रांचेही वाचन होते, असे ते म्हणाले.

लोकसभा निवडणुकीतील मतमोजणीचे कल जाहीर होत असताना आपण चित्रपट पाहत होतो. शेवटी काय होईल, ते सायंकाळी कळणार आहे, असे वाटत होते, असेही ते मिश्‍कीलपणे म्हणाले. "व्हीसीआर' आल्यापासून आपण दररोज "कोणताही' चित्रपट पाहतो, असे त्यांनी सांगताच गडकरी रंगायतन हास्यात बुडाले.

गांधीजींनी ऐन भरात असलेले आंदोलन मागे घेतले होते. त्याचप्रमाणे आपणही आंदोलने मागे घेता, या प्रश्‍नकर्त्याच्या टिप्पणीवर राज ठाकरे म्हणाले, ""आंदोलनाने टोक गाठले असेल, तर ते लगेच खाली आणतो. 13 आमदार निवडून आल्यावर शिवतीर्थावर मेळावा घ्यायला पाहिजे होता. विजयामुळे पक्षातील केडर वेगळ्या पातळीला जाऊ शकतो. त्यातून उद्दामपणा व उन्माद येऊ न देण्याची काळजी घ्यावी लागते. एखादी गोष्ट ठरवून पुढे नेली पाहिजे. त्याच वेळी उडालेला धुरळाही शांत करायला हवा. विशेष म्हणजे, आंदोलनाच्या काळात लोक माझे किती काळ थोबाड बघणार, हेसुद्धा ठरवायला हवे.''

महाराष्ट्राबाहेर राहणाऱ्या व्यक्तींनी तेथील प्रांताप्रमाणे राहावे. त्यांनी तेथील संस्कृती जपावी, असे आवाहन श्री. ठाकरे यांनी केले. आपल्याकडे आलेल्या लोकांनी येथील संस्कृतीप्रमाणे वागले पाहिजे. येथील मराठी भाषा त्यांना समजलीच पाहिजे. रिक्षा परवान्यासाठी मातृभाषेची अट आहे. मग परप्रांतीयांना परवाने कसे मिळतात, असा प्रश्‍न त्यांनी विचारला. कायद्याचे बोलल्यावरही माझ्यावर केस दाखल केल्या जातात, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

राज्यात इंच इंच विकू, असा एककलमी कार्यक्रम राबविला जात आहे. या राज्यकर्त्यांना बाजूला केल्याशिवाय काहीही होणार नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले. मी व माझ्या सहकाऱ्यांमध्ये तुलना करू नका. माझ्या पक्षाला साडेतीन वर्षे झाली असून, अनेक सहकारी उत्तम वक्ते आहेत. भाजपमध्ये अटलबिहारी वाजपेयी व प्रमोद महाजन वगळता आणखी वक्‍त्यांचा संदर्भ देता येईल का, असा सवाल त्यांनी केला.

लोक भेटायला आल्यावर संकोच वाटतो. विशेषत: त्यांच्यासोबत फोटो काढणे जमत नाही. त्यामुळे मी अलिप्त राहतो. मात्र, मी दररोज अनेक लोकांशी बोलत असतो'' असेही राज ठाकरे म्हणाले.

येत्या महाराष्ट्र दिनी शिवतीर्थावर महाराष्ट्राचा खाद्यमहोत्सव आयोजित करण्यात येतील. त्याचबरोबर तेथे पुस्तक महोत्सवही भरविला जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.
------------------------------------
सतत आंदोलने नकोत - राज
मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष कृपाशंकर सिंह, सुभाष पाशी यांच्या भ्रष्टाचाराबाबत आंदोलने का करीत नाही, असे विचारले असता राज म्हणाले, ""आंदोलनाने काहीही होत नाही. तुम्ही कायदाच माझ्या हातात द्या. आंदोलनाची कोणालाही भीती उरलेली नाही. माझ्यावर कितीही केस दाखल झाल्या तरी फरक पडत नाही. मात्र, कार्यकर्त्यांवरील केसेसचा त्यांना त्रास होतो.

मला माझ्या पद्धतीने जाऊ द्या. थोडी सबुरी ठेवा. प्रत्येकाच्या मनात राग असून त्यातून आंदोलने घडतात. सतत आंदोलने झाली तर सर्वांनाच कंटाळा येईल.''
----------------------------------
'त्यांच्या घरातच झोपड्या बांधा'
2014 मध्ये मनसेची राज्यात नक्की सत्ता येईल. तीच तीच पेस्ट-टूथब्रश आता लोकांनी बदलायला हवी, असे राज ठाकरे म्हणाले. झोपड्या तोडल्यानंतर हरकत घेणाऱ्या मानवाधिकार व "अग्नी'सारख्या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या घरात झोपड्या बांधायला हव्यात, असे त्यांनी सुनावले.
------------------------------------
'मुलांना स्वातंत्र्य द्या'
मुलांच्या वाढत्या आत्महत्यांविषयी चिंता व्यक्त करताना राज ठाकरे यांनी मुलांना स्वातंत्र्य दिले पाहिजे, असे मत व्यक्त केले. मुलांना जेवढ्या गोष्टी करायच्या आहेत, त्या करू द्याव्यात. परीक्षा आल्यावर टीव्ही-इंटरनेट बंद केले जाते. मुलगा म्हणजे "सुसाईड बॉम्बर' आहे का, असा सवाल त्यांनी केला.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें