गुरुवार, 21 जनवरी 2010

...तर एकही टॅक्‍सी रस्त्यावर फिरू देणार नाही - राज

सकाळ वृत्तसेवा
Friday, January 22, 2010 AT 12:15 AM (IST)

मुंबई - उत्तर प्रदेश व बिहारींसाठी मुंबई ही आश्रमशाळा नाही, त्यामुळे मुंबईत टॅक्‍सी परवाने मराठी युवकांना मिळाले नाहीत, तर एकही टॅक्‍सी मुंबईच्या रस्त्यावर फिरू देणार नाही, ही आमची ठाम भूमिका आहे, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज राज्य सरकारला दिला. सरकारने माझ्या या भूमिकेला धमकीच समजावे, असे राज यांनी पुन्हा-पुन्हा ठामपणे सांगितले.

मराठी भाषा येणाऱ्या टॅक्‍सीचालकांनाच परवाना देण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय चोवीस तासात फिरविणाऱ्या मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याविरुद्ध राज यांनी पत्रकार परिषदेत टीकेची तोफ डागली. त्यांच्या अंगातच लाचारी भिनलेली आहे, त्यांच्याकडे भाषा व प्रदेशाबद्दल आत्मसन्मान नाही. निर्णय घेण्याची क्षमताही नाही. आपल्या मुख्यमंत्र्यांनी दक्षिणेतील राज्यांकडून काही तरी शिकावे व तेथील राज्यकर्त्यांकडे पार्ट टाईम नोकरी करावी, असा टोलाही राज यांनी लगावला.

मराठी युवकांसाठी राज्याच्या कॅबिनेटमध्ये झालेला निर्णय मुख्यमंत्री एकटेच कसे काय फिरवू शकतात, असा सवाल करून राज म्हणाले, ""दिल्लीवरून दट्ट्या बसला म्हणूनच त्यांनी निर्णय बदलला. त्यांना फक्त त्यांच्या खुर्च्या टिकवायच्या आहेत. कारण त्यांच्यात स्वाभिमानच राहिलेला नाही. कर्नाटकात सिंचनाखालील जमीन विकत घ्यायची असेल, तर ती फक्त कानडी माणसाला विकत घेण्याचा हक्क आहे. कारण कर्नाटकात तसा कायदा आहे; पण आमचे सरकार लाचार आहे.''

उत्तर प्रदेश व बिहारमधून आलेल्यांना स्थानिक भाषा कळत नाही. शहर कळत नाही, कुठे जायचे हे समजत नाही, तरीही त्यांना टॅक्‍सीचे परवाने दिले जाणार असतील, तर मराठी भूमिपुत्रांनी जायचे कुठे, असा सवाल राज यांनी केला. 4500 मराठी टॅक्‍सीचालकांना परवाने मिळाले, तर त्यांच्या कुटुंबीयांचे संसार उभे राहतील; पण मुख्यमंत्र्यांना फक्त खुर्चीवर आणून बसविले आहे, त्यांचे कर्तृत्व काहीच नाही, अशी टीका त्यांनी केली.

नव्याने देण्यात येणारे टॅक्‍सी परवाने हे फक्त मराठी युवकांनाच मिळाले पाहिजेत. तसेच ज्यांना आधी परवाने दिले आहेत, त्यांचेही परवाने तपासले पाहिजेत. त्यांना ठाणे, पुणे, नाशिक तरी माहीत आहे काय, असा सवालही राज यांनी केला.

विदर्भवाद्यांवरही शरसंधान
बेळगाव, कारवार, निपाणीसह सीमाभाग महाराष्ट्रात येण्यासाठी टाहो फोडत आहे, पण काही टुकार व नाकाम लोकांनी महाराष्ट्राचे तुकडे पाडण्याचे धंदे सुरू केले आहेत. जे नेते राजकारणात पडद्याआड गेले आहेत त्यांना आता वेगळ्या विदर्भाच्या नावाने आज पुढे यायचे आहे. म्हणूनच काही नेत्यांचे हे धंदे सुरू आहेत, अशा शब्दांत राज ठाकरे यांनी त्यांना फटकारले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें