मंगलवार, 16 फ़रवरी 2010

मुंबईवर मराठी तरुणांचाच हक्क - राज ठाकरे

मुंबईवर मराठी तरुणांचाच हक्क - राज ठाकरे
सकाळ वृत्तसेवा
Tuesday, February 16, 2010 AT 12:45 AM (IST)

कणकवली - "राज्यात वेगवेगळे उद्योग येऊनही त्यात स्थानिकांना नोकऱ्या मिळत नाहीत. स्थानिकांना त्यांचा हक्क मिळावा, यासाठीच आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईवर मराठी माणसाचा, इथल्या तरुणांचा पहिला हक्क असल्याची भूमिका घेतली आहे,'' असे प्रतिपादन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज केले.

श्री. ठाकरे गेले दोन दिवस सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आहेत. आज ते येथे आले होते. या वेळी आमदार शिशिर शिंदे, कोकण संपर्कप्रमुख शिरीष सावंत, जिल्हा सपंर्कप्रमुख उदय सावंत, जिल्हाध्यक्ष राजन दाभोळकर आदी उपस्थित होते. श्री. ठाकरे यांचे येथे जोरदार स्वागत झाले. देवगड, वैभववाडी, कणकवलीहून शेकडोंनी तरुण त्यांना भेटण्यासाठी आले होते. येथील पटवर्धन चौकात मिरवणूक काढण्यात आली. शासकीय विश्रामगृहावर त्यांनी तिन्ही तालुक्‍यांतील पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या. त्यानंतर माहिती देताना श्री. ठाकरे म्हणाले, ""सिंधुदुर्गात मला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यामुळे आमची संघटना निश्‍चितच आकार घेईल. पक्षातील तरुण कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आपण येथे आलो होतो. येत्या काळात कार्यशाळा घेणार आहे. राज्यभरात पक्ष सभासद नोंदणी पंधरवडा येत्या 21 तारखेपासून सुरू होत आहे. यात जास्तीत जास्त सभासद होतील.''

ते म्हणाले, ""राज्य सरकार सर्वच पातळीवर अपयशी ठरले आहे. कोण कधी येते, कसे येते, हे समजतच नाही. परिणामी बॉंबस्फोट होत आहेत. राज्यात विविध उद्योग येत आहेत. या उद्योगांमध्ये महाराष्ट्रातील तरुणांना रोजगार मिळत नाही. तो मिळावा म्हणून आपण मुंबईवर मराठी माणसाचा हक्क आहे, अशी भूमिका घेतली आहे.''

राज्यातील ग्रामीण भागात विविध समस्या आहेत. याबाबत आपले मत काय, असे विचारले असता श्री. ठाकरे म्हणाले, ""मुंबईत मोठ्या प्रमाणात रोजगार आहेत; पण हे रोजगार परप्रांतीयांच्या हातात जात आहेत. रोजगार नसल्याने विविध प्रश्‍न राज्यात निर्माण होत आहेत. त्यासाठी मराठी आपल्याला वाचवावी लागेल. राज्य सरकारने मुंबईत साडेचार हजार परवाने टॅक्‍सीसाठी देणे जाहीर केले. यावर मराठी माणसाचा हक्क राहिला पाहिजे. यापुढे सर्वच निवडणुकांमध्ये पक्ष उतरणार नसून जेथे संधी मिळेल तेथे योग्य उमेदवार देऊन निवडणूक लढण्याचा प्रयत्न राहील.''

तरुणाईचा प्रतिसाद
राज ठाकरे यांच्या भूमिकेवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तरुणही सहमत असल्याचे चित्र होते. जिल्ह्यातील दौऱ्यात त्यांना भेटण्यासाठी तरुणांची उपस्थिती लक्षणीय होती. विशेषतः म्हणजे विशीतील तरुणांचा सहभाग यात जास्त होता.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें