शुक्रवार, 26 फ़रवरी 2010

महाराष्ट्र म्हणजे मराठी भाषाच - राज ठाकरे

महाराष्ट्र म्हणजे मराठी भाषाच - राज ठाकरे
सकाळ वृत्तसेवा
Saturday, February 27, 2010 AT 12:40 AM (IST)


मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आंदोलनाचा दुसरा टप्पा हा मराठी भाषेच्या आग्रहाचा असणार आहे. महाराष्ट्र म्हणजे मराठी भाषाच हे समीकरण मनसे करून दाखविणार आहे. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील प्रत्येक ठिकाणी आम्ही मराठीचा आग्रह धरणार असून आम्ही आमच्या पद्धतीने मराठीकरण करून घेऊ, असा संदेश मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज जागतिक मराठी भाषा दिनानिमित्त दिला आहे.


महाराष्ट्रातील भाषिक व्यवहार; मग तो तोंडी असो वा लेखी, तो फक्त मराठीच असेल, याबाबत प्रत्येक मराठी माणसाने अतिशय कडवे, आग्रही असायला हवे, अशी अपेक्षा राज ठाकरे यांनी आपल्या चार पानी निवेदनात व्यक्त केली आहे.

संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनानंतर महाराष्ट्रात, मुंबईत मराठी माणसाला, मराठी भाषेला सन्मानाचे, प्रतिष्ठेचे स्थान मिळेल, असे वाटले होते; पण अमेठी-रायबरेलीच्या माध्यमातून महाराष्ट्राचे जे शोषण आझमगड-जौनपूर करीत आहे ते पाहता आता पुन्हा मराठी भाषेसाठी मोठं यज्ञकुंड धगधगवण्याची वेळ आली आहे, असे मतही त्यांनी व्यक्त केले आहे.
अनेक अमराठी लोक येथे महाराष्ट्रात वर्षानुवर्षे, पिढ्यानपिढ्या राहत आहेत, मराठी भाषेचा आदर राखत आहेत, मराठी संस्कृती जपत आहेत, मराठी सण साजरे करीत आहेत. त्यांना आपण मराठीच मानतो, अशी स्पष्ट भूमिका मांडताना ते म्हणाले की, वर्षानुवर्षे येथे राहून मराठी भाषेबद्दल आस्था नसणारे व भाषा बोलता न येणारे; तसेच आपापल्या समाजातील लोकांची लोकसंख्या वाढवून आपला मतदारसंघ निर्माण करणारे व त्यातून महाराष्ट्राला ओरबडण्याची स्वप्ने पाहणारे; तसेच कसेही करून मराठी माणसाला सर्व स्तरातून हाकलून द्यायची इच्छा बाळगणाऱ्यांच्या विरोधात माझे आंदोलन सुरूच राहणार, असा इशाराही त्यांनी दिला.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें