सोमवार, 8 मार्च 2010

मराठी जनतेशी प्रतारणा नाही - राज ठाकरे

मराठी जनतेशी प्रतारणा नाही - राज ठाकरे
सकाळ वृत्तसेवा
Tuesday, March 09, 2010 AT 01:20 PM (IST)


मुंबई - 'मराठी जनतेने दाखविलेल्या विश्‍वासामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने भरारी घेतली, त्यामुळे या सर्व यशाचे श्रेय मराठी माणसाला जाते. पुढील काळात महाराष्ट्रातल्या जनतेशी प्रतारणा करणार नाही,' असे खणखणीत आश्‍वासन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी येथे दिले.

मनसेला चार वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त दादर येथील यशवंतराव नाट्यगृहात कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला. त्यात राज ठाकरे यांनी मराठीचा मुद्दा पुन्हा एकदा लावून धरला. कालच (सोमवारी) सर्वोच्च न्यायालयाने भडक भाषणे करू नये, अशी समज राज ठाकरे यांना दिली. त्या पार्श्‍वभूमीवर राज यांच्या आजच्या भाषणाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. राज यांनी आपल्या भाषणातून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

'महिला आरक्षण विधेयकाला मनसेचा पूर्णपणे पाठिंबा असल्याचे त्यांनी या वेळी जाहीर केले. मुलायमसिंह यादव आणि लालूप्रसार यादव या आरक्षणाला विरोध करत आहेत. त्यातून त्यांची संस्कृती कळते, असा टोलाही त्यांनी लगावला. तुरुंगात गेल्यावर लालूंनी आपल्या बायकोलाच पदावर बसवले ना,' असा प्रश्‍नही त्यांनी विचारला.
'महिलांनो आरक्षण जरूर घ्या, पण कारभार तुम्हीच करा. तुमच्या नवऱ्याकरवी कारभार करू नका,' असे आवाहन केले.

ते म्हणाले, 'शिवसेना सोडल्यानंतर माझ्यासमोर कोणतेही चित्र स्पष्ट नव्हते. दुसऱ्या पक्षात प्रवेश करणे किंवा स्वतः:चा राजकीय पक्ष स्थापन करणे एवढे दोनच पर्याय होते. शिवसेना सोडताना माझ्यासोबत अनेकजण होते. मात्र, दुसरा पक्ष स्थापन करताना किती जण येतील, अशी साशंकता होती. परंतु, माझ्या सुदैवाने माझ्या पक्षस्थापनेच्या निर्णयाचा सर्वांनी आदर केला. सुरवातीला इतर पक्ष मनेसचे अस्तित्व मान्य करायला तयार नव्हते. त्यानंतर आलेल्या महापालिका निवडणुकीत मनसेने पटकावलेल्या जागा पाहून वर्तमान पत्रांनी पार्टी ओव्हर अशा शीर्षकाखाली बातम्याही छापल्या होत्या. ही शीर्षके वाचून मी अस्वस्थ झालो होतो. पण, मराठी जनतेने माझ्यावर विश्‍वास दाखवला, आणि त्यातूनच मनसेने भरारी घेतली.'

'महाराष्ट्रात चांगले विचार पटकन रुजतात. आपली लढाई विचारांनी जिंकली पाहिजे, पैशांनी नाही. तिथे विचार संपतात, तिथे पैसे सुरू होतात, असे मत व्यक्त करून राज म्हणाले, की मनसेच्या कार्यकर्त्यांनी सुरवातीला अनेक पाट्या मोडल्या, काचा फोडल्या. याचा विसर मला कधीही पडणार नाही. पण, ज्यांना चांगली भाषा कळत नाही, त्यांना लाथांची भाषा बोलावी लागते. महाराष्ट्रात प्रत्येक गोष्टीचे मराठीकरण झाले पाहिजे, ही आपली जबाबदारी आहे. रेल्वे, विमानतळांच्या ठिकाणी मराठीतून अनाउंन्समेंट होत नसेल, तर त्यावर लक्ष ठेवा,' असे आवाहनही कार्यकर्त्यांना केले.

'माझा हिंदी भाषेला विरोध नाही, असे स्पष्ट करून राज यांनी आज महाराष्ट्रात जेवढे राजकीय नेते आहेत, त्यात उत्तम हिंदी बोलणाऱ्या पहिल्या पाचांमध्ये मी आहे, असे ठणकावून सांगितले. माझी वडिलांना उर्दू वाचता, लिहिता आणि बोलता येत होते. त्यामुळे लहानपणापासूनच माझे हिंदी चांगले आहे, असे त्यांनी सांगितले. देशातल्या अधिकाधिक भाषा शिकल्या पाहिजेत. पण, त्याच्या नावाखाली आमच्यावर राष्ट्रभाषा लादू नका,' असा दम त्यांनी भरला.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें