मंगलवार, 8 जून 2010

मनसेचे आमदार मतदानासाठी विधानभवनात

मनसेचे आमदार मतदानासाठी विधानभवनात
सकाळ वृत्तसेवा
Wednesday, June 09, 2010 AT 12:15 AM (IST)
 
मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चार निलंबित आमदारांना विधानभवनात जाऊन मतदान करण्यास केंद्रीय निवडणूक आयोगाने विशेष परवानगी दिली आहे. यामुळे या निलंबित आमदारांना विधान परिषद आणि राज्यसभा निवडणुकांसाठी विधानभवनाबाहेरील तंबूतून नाही, तर मध्यवर्ती सभागृहात जाऊन मतदान करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

राज्याच्या विधिमंडळ सचिवालयाने केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र पाठवून याबाबत विचारणा केली होती. आज निवडणूक आयोगाने पाठवलेल्या उत्तरात या निलंबित आमदारांना मतदानासाठी विधानभवन इमारतीमध्ये प्रवेश करण्यास परवानगी दिली आहे. आयोगाने सर्व विधिमंडळ कायदे आणि राज्यघटनेचा आधार घेत, या आमदारांना विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असताना सभागृहातून निलंबित करण्यात आले असल्याचा दाखला देत, विधानभवनातील मध्यवर्ती सभागृहात जाण्यास हरकत नसल्याचे म्हटले आहे. राज्यघटनेच्या कलम 194 अन्वये या आमदारांचे निलंबन झाले असले तरी त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आलेले नाही, असे स्पष्ट करत या आमदारांचा मतदानाचा हक्‍क अबाधित असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.

वर्षभरापूर्वी या चार आमदारांचे निलंबन झाले होते. तेव्हापासून या आमदारांना विधानभवनच्या इमारतीत प्रवेश करण्यास बंदी करण्यात आली होती. मात्र विधान परिषद आणि राज्यसभा निवडणुकीच्या निमित्ताने मनसेचे हे चारही आमदार विधानभवनच्या पायऱ्या चढणार आहेत.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें