बुधवार, 9 जून 2010

इंजिन आघाडीच्या यार्डात?

इंजिन आघाडीच्या यार्डात?
सकाळ वृत्तसेवा
Wednesday, June 09, 2010 AT 12:00 AM (IST)
 
मुंबई - आपल्या राजकीय भवितव्याच्या समीकरणाची जुळवाजुळव करीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपली 13 मते कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पारड्यात टाकण्याचे नक्की केल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येते. त्यामुळे 'मनसे'च्या मतांकडे डोळा लावून बसलेल्या भाजप व शिवसेनेच्या पदरात निराशा पडण्याची शक्‍यता असून अतिरिक्त मतांसाठी त्यांची मदार आता सर्वस्वी अपक्ष व 'रिडालोस'वर राहणार आहे.

'मनसे'कडे असलेल्या 13 मतांवर सर्वच पक्षांचा डोळा होता. त्यांची मते मिळावीत यासाठी सध्या परदेशात असलेले "मनसे'चे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे अन्य राजकीय पक्षांच्या नेत्यांनी फोनवरून मनधरणी केली; तर काही पक्षांच्या उमेदवारांनी राज ठाकरे यांच्या जवळच्या शिलेदारांकडे संपर्क करून राज यांच्याकडे काही मतांसाठी शब्द टाकला होता. राज ठाकरे उद्या (ता. 10) पहाटे मुंबईत येणार असले तरीही त्यांनी आपल्या 13 मतांची विभागणी निश्‍चित केल्याचे सांगण्यात येते. या विभागणीनुसार कॉंग्रेसच्या पारड्यात सात; तर राष्ट्रवादीला 6 मते मिळणार आहेत.

'मनसे'च्या चार निलंबित आमदारांना विधान परिषद निवडणुकीत मतदानाचा अधिकार मिळाला असली तरीही चार वर्षांसाठी झालेले मनसेचे निलंबन पक्षाला सध्या परवडणारे नाही, त्यामुळे येत्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात त्या चार निलंबित आमदारांचे निलंबन मागे घेण्याच्या बोलीवरच मनसेची मते कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या उमेदवारांना मिळणार हे नक्की झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येते. कारण, गेल्या दोन्ही अधिवेशनांत मनसेच्या गटनेत्यांनी व प्रतोदांनी निलंबन मागे घेण्यासाठी दोन्ही कॉंग्रेसकडे सातत्याने मनधारणी केली होती, परंतु आश्‍वासनांच्या पलीकडे त्यांच्या पदरात काही पडले नव्हते; त्यामुळे यंदा सत्ताधाऱ्यांनी ठोस आश्‍वासन दिल्याचेही सांगण्यात येते.

शिवसेना व भाजपच्या उमेदवारांना मनसेच्या मतांची अपेक्षा होती, पण आता मनसेने आपली मते सत्ताधाऱ्यांच्या पारड्यात टाकण्याचा निर्णय घेतल्यामुळे युतीच्या उमेदवारांना अन्यत्र हालचाली कराव्या लागणार हे स्पष्ट आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें