शुक्रवार, 11 जून 2010

राज ठाकरे बनले टीकेचे धनी!

राज ठाकरे बनले टीकेचे धनी!
सकाळ वृत्तसेवा
Friday, June 11, 2010 AT 02:57 PM (IST)
 

पुणे - महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा वेगळा पक्ष सुरू केल्यापासून मराठी नेटिझन्सचा कायम पाठिंबा मिळवणारे राज ठाकरे पहिल्यांदाच टीकेचे धनी झाले आहेत. विधान परिषदेच्या निवडणुकीत मनसेच्या आमदारांनी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवारांना मतदान करण्याबद्दल अनेकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. 'ई-सकाळ'वर प्रतिक्रिया व्यक्त करून राज ठाकरेंच्या निर्णयाबद्दल नेटिझन्सनी संताप व्यक्त केला.

राज ठाकरे तुम्ही दाखवून दिले की, तुम्ही पण सत्तेचे लालसी आहात. मराठीचा मुद्दा बिलकूल तुमचा नाही आणि तुम्ही विश्‍वासघात करीत आला आहात आणि करता आहात, अशी प्रतिक्रिया श्‍वेता चौधरी यांनी व्यक्त केली. हे सगळे करण्यासाठी कॉंग्रेसने तुम्हाला किती पैसे दिले, असा सवालही त्यांनी केला.

राज ठाकरे महाराष्ट्राचे नाही, तर स्वतःचेच नवनिर्माण करीत आहेत, असे मत मांडले आहे जयवंत यांनी. मनसे हे कॉंग्रेसचेच छोटे पिल्लू आहे. सभेत आघाडी सरकारला शिव्या घालायच्या आणि पैसे घेऊन त्यांना मदत करायची, असा आरोप त्यांनी राज ठाकरेंवर केला आहे. मनसेसुद्धा इतर पक्षांसारखी निघाली, म्हणून महेश पाटील या वाचकाने नाराजी व्यक्त केली. राहूल म्हणतात, राज ठाकरे तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. काय फरक पडला असता जर तुमच्या आमदारांचे निलंबन मागे घेतले नसते तर... जनता होती ना तुमच्या पाठिशी...!

राज ठाकरे यांनी आपला विश्‍वासघात केल्याचे दिनकर यांनी आपल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे. पुढच्या निवडणुकीत हे विसरणार नाही, असाही इशारा त्यांनी दिला. राज ठाकरे सर्व राजकीय पुढाऱ्यांसारखेच एका माळेचे मणी असल्याचा अन्वयार्थ योगेश यांनी काढला आहे. चांगले पांग फेडले मराठी माणसाचे... राजसाहेब तुम्हाला लाजीरवाणा मुजरा, अशी प्रतिक्रिया एका अनामिक वाचकाने व्यक्त केली.

प्रशांत म्हणतो, आता तरी लोकांनी शहाणे व्हावे. राज ठाकरे आणि मनसेच्या मागे लागू नये. फक्त निवडणुकीच्यावेळी स्टंटबाजी करायची आणि लोकांना मूर्ख बनवायचे एवढेच यांचे काम. राज ठाकरे यांनी महाराष्ट्राचा विश्‍वासघात केल्याची भावना सतीश यांनी व्यक्त केली.

...तरीही मनसेला पाठिंबाअनेक नेटिझन्स राज ठाकरेंवर टीका करीत असले, तरी काहींनी त्यांच्या रणनीतीबद्दल विश्‍वास व्यक्त करून त्यांना पाठिंबा दिला आहे. चेतन म्हणतो, राज ठाकरे यांनी जे केले, ते योग्यच होते, नाहीतर पक्ष वाढण्याऐवजी लवकरच संपेल. मनसेला माझा पूर्ण पाठिंबा आहे. राजकारणात उतरल्यानंतर अशी खेळी खेळावीच लागते, असे मत नामदेव या वाचकाने मांडले आहे. मनसे आमदारांचे निलंबन रद्द होणे, हा एक नंबरचा मुद्दा आहे. त्यामुळे राज ठाकरे यांनी चांगलेच केले, असे शिवा यांनी आपल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे. राज ठाकरे यांनी काहीतरी विचार करूनच हा निर्णय घेतला असेल, राज ठाकरे इतर पक्षांसारखे राजकारण करणार नाही, असा विश्‍वास आशिषने व्यक्त केला. 

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें