सोमवार, 14 जून 2010

'मनसे'कडून मदत?.. मिळालीच नाही!

'मनसे'कडून मदत?.. मिळालीच नाही!
सकाळ न्यूज नेटवर्क
Tuesday, June 15, 2010 AT 12:15 AM (IST)
 

नवी दिल्ली -  महाराष्ट्रात विधान परिषदेच्या निवडणुकीत कॉंग्रेसला मदत करण्यावरून राज ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेत भांडण सुरू असताना कॉंग्रेसने या मदतीचा इन्कार केला आहे. "राज ठाकरेंशी कोणत्याही प्रकारचा समझोता होऊच शकत नाही,' अशा शब्दांत कॉंग्रेस-मनसे हातमिळवणी झाली नसल्याचा दावा पक्षाने केला आहे.

विधान परिषद निवडणुकीत कॉंग्रेसने समर्थन दिलेले अपक्ष उमेदवार विजय सावंत विजयी, तर शिवसेनेचे अनिल परब पराभूत झाले. त्यानंतर "मनसे'च्या आमदारांनी केलेल्या मतदानामुळे सावंत जिंकले असून, राज ठाकरेंनी कॉंग्रेसशी समझोता केला, अशी टीकेची झोड शिवसेनेने उठवली. शिवसेनेकडून होणाऱ्या "थैलीशाही'च्या आरोपांमुळे चिडलेल्या राज ठाकरेंनी "कॉंग्रेसशी समझोता हा "धनसे' नव्हे, तर "मनसे' होता,' असे प्रत्युत्तर देताना आपल्या आमदारांचे निलंबन रद्द व्हावे, यासाठीच कॉंग्रेसला मदत केल्याचे म्हटले होते. मुंबईत राहणाऱ्या उत्तर भारतीय आणि बिहारी नागरिकांविरुद्ध तीव्र आंदोलन केल्याबद्दल राज ठाकरेंना लक्ष्य करणाऱ्या कॉंग्रेसने विधान परिषदेच्या निवडणुकीत मात्र आपल्या समर्थक अपक्ष उमेदवाराला निवडून आणण्यासाठी राज ठाकरेंची मदत घेतल्याने शिवसेनेचा तिळपापड झाला.

राज ठाकरेंशी केलेल्या या हातमिळवणीचा परिणाम बिहार आणि उत्तर प्रदेशमधील आगामी निवडणुकांवर होऊ शकतो, याची धास्ती असल्याने राष्ट्रीय पक्ष असणाऱ्या कॉंग्रेसने "मनसे'शी कोणताही समझोता झालेला नसल्याचे दाखविणे सुरू केले आहे. या संदर्भात कॉंग्रेस मुख्यालयात झालेल्या दैनंदिन वार्तालापादरम्यान प्रवक्‍त्या जयंती नटराजन यांना, "मनसे'शी झालेल्या समझोत्यामुळे बिहार, उत्तर प्रदेशच्या निवडणुकांत कॉंग्रेसचे नुकसान होईल का, असे विचारले असता, ""कॉंग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत समझोता होऊच शकत नाही. दोन्ही पक्षांच्या विचारसरणीमध्ये मोठे अंतर आहे. ते सर्वांना माहिती असल्याने मी याचा इन्कार करते,'' असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, राज ठाकरेंनी स्वतः या संदर्भात पत्रकार परिषदेत वक्तव्य केल्याचे निदर्शनास आणून दिले असता, ""राज ठाकरे जे सांगत आहेत त्याची आपणाला माहिती नाही,'' असा बचावात्मक पवित्रा त्यांनी घेतला.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें