गुरुवार, 26 अगस्त 2010

तिकीट दरांवरून राज यांची उद्धववर टीका

तिकीट दरांवरून राज यांची उद्धववर टीका
सकाळ वृत्तसेवा
Thursday, August 26, 2010 AT 12:15 AM (IST)
मुंबई - मराठी चित्रपटांसाठी तिकिटांचे दर कमी झाले तर त्याचा आपणास आनंद आहे; परंतु मराठी माणूस काही दरिद्री नाही किंवा मोठ्या दुःखात आहे असे काही नाही. त्याला चांगले प्रॉडक्‍ट दिले तर तो निश्‍चितच त्याचे स्वागत करतो, असे उद्‌गार काढून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना कार्यकारी अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यावर शरसंधान साधले.

महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचा वर्धापनदिन उद्या (ता. 26) साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्त आज माटुंगा येथील स्टारसिटी मल्टिप्लेक्‍समध्ये "ऐका दाजिबा' या चित्रपटाचा खास शो त्यांच्या पदाधिकाऱ्यांसाठी आयोजित करण्यात आला होता. तो चित्रपट पाहण्यासाठी राज ठाकरे, तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चित्रपट शाखेचे अध्यक्ष अमेय खोपकर, शालिनी ठाकरे, रिटा गुप्ता, संदीप देशपांडे, आमदार नितीन सरदेसाई आदी मंडळीही हजर होती.
पत्रकारांशी बोलताना राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांनी सुचविलेल्या तिकिटांचे दर कमी करण्याच्या मुद्द्याचा खास आपल्या शैलीत समाचार घेतला. ते म्हणाले, की महाराष्ट्रात मराठी माणसांची संख्या जास्त आहे. ते हिंदी चित्रपट पाहतात. हिंदी चित्रपटांचे तिकिटांचे दर त्यांना परवडतात. मग मराठी चित्रपट ते का पाहू शकत नाहीत? मुळात प्रॉडक्‍ट चांगले दिले तर ते निश्‍चितच मराठी चित्रपट पाहतील. त्यातच तिकिटांचे दर कमी झाले तर आपणास आनंद आहे.

मल्टिप्लेक्‍सवाल्यांना काही सवलती हव्या आहेत. त्यांनी त्यांचा शहाणपणा कमी केला पाहिजे, असा सज्जड दमही त्यांनी मल्टिप्लेक्‍सवाल्यांना पुन्हा दिला. मल्टिप्लेक्‍सचे आंदोलन पहिले कुणी सुरू केले ते सर्वांना ठाऊक आहे. त्याबाबतीत आपली कुणाशीही स्पर्धा नाही. मराठी चित्रपट चालले पाहिजेत असे आपले मत आहे. त्यांना प्राईम टाईम दिला गेला पाहिजे. कारण त्याच वेळी प्रेक्षक येतील, असेही ते म्हणाले. नेहमी इंजिन पुढे असते. बाकीचे डबे मागून येत असतात, असे म्हणून त्यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें