रविवार, 15 अगस्त 2010

मराठी सिनेसृष्टी आज ‘राज’दरबारी!

मराठी सिनेसृष्टी आज ‘राज’दरबारी!
मुंबई, १५ ऑगस्ट/ विशेष प्रतिनिधी
मुजोर मल्टिप्लेक्स मालकांना ‘मनसे’ दणका दिल्यानंतर राज ठाकरे यांनी उद्या मराठी चित्रपट निर्माते व दिग्दर्शकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी बैठक आयोजित केली आहे. मराठी चित्रपट कितीही चांगला असला तरी मल्टिप्लेक्समध्ये त्यांना वेळ दिला जात नाही व दिलाच तर प्राइम टाइम मिळत नाही. यामुळे चांगले मराठी चित्रपट काढूनही मल्टिप्लेक्स मालकांच्या मनमानीमुळे व्यावसायिकदृष्टय़ा यश मिळत नाही. याबाबत राज्य शासनाकडे मराठी चित्रपट निर्माता संघाने अनेकदा साकडे घातल्यानंतरही ठोस निर्णय होत नव्हता. या पाश्र्वभूमीवर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मल्टिप्लेक्स मालकांना इशारा दिल्यानंतर शनिवारी दादर, वांद्रे, ठाणे, कांदिवली आदी ठिकाणी मनसेच्या कार्यकर्त्यांनी मल्टिप्लेक्समध्ये जाऊन राडा केला. राज ठाकरे यांनी दिलेला ‘खळ्ळ व फटाक’ इशारा नेमका कसा असतो याची जाणीव मल्टिप्लेक्सच्या मालकांना करून दिली. मल्टिप्लेक्सवाल्यांनाही तीच भाषा समजणार असेल तर त्याच भाषेत समजावले जाईल, या राज ठाकरे यांच्या इशाऱ्याचे तंतोतंत पालन मनसेच्या कार्यकर्त्यांनी केल्यामुळे मराठी चित्रपट निर्माते, अभिनेते तसेच दिग्दर्शकांनी राज ठाकरे यांची अभिनंदन केले. या पाश्र्वभूमीवर उद्या वांद्रे येथील एमआयजी क्लब येथे मराठी निर्माते व दिग्दर्शकांना मल्टिप्लेक्स मिळण्याबाबत येणाऱ्या अडचणी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे समजून घेणार आहेत.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें