गुरुवार, 16 सितंबर 2010

राज ठाकरेंकडून नानांच्या गणपतीचे दर्शन

राज ठाकरेंकडून नानांच्या गणपतीचे दर्शन
सकाळ वृत्तसेवा
Friday, September 17, 2010 AT 12:15 AM (IST)

मुंबई - राजकारणातील खणखणीत नाणे तसेच आजच्या तरुण पिढीचे आयकॉन राज ठाकरे आणि अभिनयातील हुकमी एक्का नाना पाटेकर आज गणपतीच्या निमित्ताने एकत्र आले. नानांच्या घरी बसविलेल्या गणपतीचे दर्शन आज राज यांनी घेतले. यामुळे या दोघांमध्ये असलेली घनिष्ट मैत्री पुन्हा दिसून आली आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज यांनी आज नाना पाटेकर यांच्या माहीम येथील घरी जाऊन गणपतीचे दर्शन घेतले. त्यावेळी श्री. ठाकरे यांच्यासोबत आमदार बाळा नांदगावकर आणि शिशिर शिंदे ही मंडळी होती. राज ठाकरे दुपारी साधारण साडेबारा किंवा एकच्या दरम्यान नानाच्या गणपतीला भेट देणार अशी कुणकुण प्रसिद्धीमाध्यमाला लागताच वाहिन्यांच्या काही प्रतिनिधींनी तेथे गर्दी केली. परंतु राज ठाकरे पत्रकारांशी काहीही न बोलता तसेच निघून गेले. त्यामुळे त्यांची निराशा झाली. दुपारी अडीचच्या सुमारास राज यांचे नानांच्या घरी आगमन झाले. गणपतीचे दर्शन घेतल्यानंतर त्या दोघांमध्ये विविध विषयावर चर्चाही झाली. परंतु चर्चेचा नेमका तपशील समजू शकला नाही. खरे तर राजकीय व्यासपीठावरून आपल्या सभा गाजविणाऱ्या राज ठाकरे आणि अभिनयात चौकार-षटकार ठोकणाऱ्या नाना पाटेकर यांच्यामध्ये मैत्री आहे हे सर्वश्रुत आहे. जेव्हा राज यांनी शिवसेना सोडली तेव्हा नाना पाटेकर यांनी कृष्णकुंजवर जाऊन राज यांची एक तास सदिच्छा भेट घेतली होती. त्यावेळी ही भेट राजकीय-सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात चर्चेची ठरली होती. त्यातच आज राज ठाकरे यांनी नानांच्या घरी भेट दिल्यामुळे ही भेटदेखील एक चर्चेचा मुद्दा ठरला आहे. मध्यंतरी एका वाहिनीवरील तसेच काही जाहीर कार्यक्रमात नानाने राज ठाकरे यांची स्तुती केली होती. राज ठाकरे यांची महाराष्ट्राविषयीची भूमिका चांगली आहे, असे नाना पाटेकर म्हणाले होते. त्यांची मैत्री जुनी आहे हे सर्वश्रुत आहे. आज त्यांनी आपल्या मैत्रीची पुन्हा प्रचीती दिली.

2 टिप्‍पणियां: