गुरुवार, 30 सितंबर 2010

प्रचंड गर्दीत मनसेच्या मुलाखती सुरू

प्रचंड गर्दीत मनसेच्या मुलाखती सुरू
सकाळ वृत्तसेवा
Thursday, September 30, 2010 AT 12:30 AM (IST)
 

कल्याण - कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती प्रचंड गर्दीत सुरू झाल्या. पक्षाच्या सुकाणू समितीतर्फे आणखी दोन दिवस मुलाखती घेतल्या जाणार आहेत.

कल्याण पश्‍चिमेतील सर्वोदय पार्कमध्ये मनसेच्या इच्छुकांच्या कालपासून मुलाखती सुरू झाल्या. सकाळी अकरापासून मुलाखती सुरू होणार असल्याने इच्छुक उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांनी सकाळी नऊपासूनच सर्वोदय पार्क परिसरात एकच गर्दी केली होती. मुलाखतीसाठी पूर्वतयारी करून आलेल्या उमेदवारांनी प्रभागातील समस्या आणि इतर माहितीचा डेटा असलेली फाईल बरोबर ठेवली होती. काल सकाळी अकरापासून सुरू झालेल्या इच्छुकांच्या मुलाखतीच्या पहिल्या सत्रात प्रभाग क्षेत्र "अ' व "ब' मधील 150 पेक्षा जास्त इच्छुकांच्या मुलाखती रात्री साडेअकरापर्यंत सुरू होत्या. एका प्रभागातून किमान सहा ते 12 इच्छुकांनी मुलाखती दिल्या आहेत.

इच्छुक उमेदवार असलेल्या महिलांची संख्या लक्षणीय होती. जवळपास 45 टक्के इच्छुक महिला उमेदवारांनी मुलाखती दिल्या. त्यात डॉक्‍टर, वकील, शिक्षक आदींचा समावेश आहे. मराठी समाजातील इच्छुकांसह ख्रिश्‍चन, मुस्लिम आणि इतर मागासवर्गीय अशा सगळ्या समाज घटकातील उमेदवार मनसेतर्फे निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याचे मुलाखतीत दिसून आले. मनसेच्या स्थापनेपासून सोबत असलेल्या कार्यकर्त्यांचा इच्छुकांमध्ये समावेश अधिक होता.

प्रभाग क्षेत्र "क' व "ड' मधील प्रभागातून इच्छुक असलेल्या उमेदवारांची मुलाखत दिवसभरात घेण्यात येणार आहे. त्यानंतर उद्या व 1 ऑक्‍टोबर रोजी डोंबिवलीतील पूर्व-पश्‍चिमेतील इच्छुकांच्या मुलाखती डोंबिवलीत पार पडणार आहेत.

मुलाखत घेणाऱ्या सुकाणू समितीत आमदार बाळा नांदगावकर, शिशिर शिंदे, नितीन सरदेसाई, रमेश पाटील, प्रकाश भोईर यांच्यासह शालिनी ठाकरे, मनोज चव्हाण यांचा समावेश आहे. निवडणुकीच्या नियोजन समितीचे कामकाज राजन गावंड, विनय भोईटे, केदार हुंबळकर, मनोहर सुगदरे पाहत आहेत.

एकाच प्रभागात प्रबळ दावेदारप्रभाग क्रमांक 21 (गांधीनगर) प्रभागातून अपक्ष नगरसेवक फैसल जलाल यांनी मनसेत प्रवेश केला आहे. गांधीनगरातून श्री. जलाल हे इच्छुक आहेत. या प्रभागातून मनसेचे जिल्हा चिटणीस इरफान शेख इच्छुक आहेत. भाजपला रामराम ठोकून मनसेत आलेले नगरसेवक दिनेश तावडे यांनी प्रभाग क्रमांक 32 (जोशीबाग) उत्सुकता दर्शविली आहे. याच प्रभागातून मनसेच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष ऊर्मिला तांबे इच्छुक आहेत. मनसेच्या स्थापनेपासून महिला आघाडीत तांबे सक्रिय आहेत. कल्याणमधील या दोन प्रभागांतून कोणाला उमेदवारी द्यायची, असा एक पेचप्रसंग मनसेच्या निवडणूक सुकाणू समितीपुढे निर्माण होणार आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें