गुरुवार, 30 सितंबर 2010

नेत्यांच्या कचखाऊ भूमिकेने 'मनसे'च्या गडाला खिंडार?

नेत्यांच्या कचखाऊ भूमिकेने 'मनसे'च्या गडाला खिंडार?
सकाळ वृत्तसेवा
Friday, October 01, 2010 AT 12:53 AM (IST)
 

कोल्हापूर - महापालिकेच्या निवडणुकीसंबंधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांनी घेतलेल्या कचखाऊ भूमिकेमुळे नाराज झालेल्या मनसेच्या अनेक कार्यकर्त्यांनी सामूहिक राजीनामा देण्याची तयारी केली आहे. दोन दिवसात मनसेतील मोठा गट बाहेर पडण्याची शक्‍यता असून मनसेला खिंडार पडणार आहे.

महापालिकेची निवडणूक लढवायची नाही अशी भूमिका संपर्कप्रमुख संजय जामदार, आमदार शिशिर शिंदे यांनी जाहीर केली आहे. जिल्हाप्रमुख उदय पोवार यांनी कोणत्याही स्थितीत निवडणूक लढवायचीच अशी भूमिका घेतली. अनेकांनी निवडणुकीत उमेदवारीची संधी मिळेल या अपेक्षेने मनसेत प्रवेश केला होता; पण मनसेतील गटबाजी, कुरघोड्या यामुळे पक्षाचे अस्तित्व असून नसल्यासारखे झाल्याने निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेण्यात आला होता; मात्र निवडणूक लढवण्याची संधी आता मिळाली नाही तर पुन्हा पाच वर्षे प्रतीक्षा करावी लागणार आहे. मनसेच्या नेत्यांची एकूणच कचखाऊ भूमिकेमुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. कोल्हापूरच्या बाबतीत ठोस निर्णय घेतला जात नाही. पक्षातील गटबाजी संपवण्यासाठी नूतन पदाधिकारी निवडण्यासाठी हालचाली सुरू झाल्या; पण प्रत्यक्षात कोणताच निर्णय झालेला नाही. आहे त्या पदाधिकाऱ्यांनाही काम करू दिले जात नाही. एकूणच मनसेतील आंधळा कारभार लक्षात घेऊन कार्यकर्ते मनसेलाच राम राम करण्याचा विचार करत आहेत. राष्ट्रवादी, कॉंग्रेस, भाजप, शिवसेना असे पर्याय त्यांच्यापुढे आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांचा एक मोठा गट दोन दिवसात राजीनामा देऊन बाहेर पडण्याची शक्‍यता आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें