शनिवार, 16 अक्तूबर 2010

मनसेच्या 22 बंडखोरांची "कृष्णकुंज'वर समजूत

मनसेच्या 22 बंडखोरांची "कृष्णकुंज'वर समजूत
सकाळ वृत्तसेवा
Sunday, October 17, 2010 AT 12:15 AM (IST)
 
कल्याण - कल्याण-डोंबिवली पालिका निवडणुकीत सर्वच पक्षांना बंडाचा फटका सोसावा लागत आहे. यातून मनसेचीही सुटका झालेली नाही. उमेदवारी नाकारलेल्या मनसेच्या इच्छुकांनी बंडखोरी केली. त्यामुळे खुद्द मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षातील बंडखोरांना थेट शिवाजी पार्क येथील "कृष्णकुंज' येथे बोलावून समजूत काढली. 

"कल्याण-डोंबिवली'त मनसे सर्व 107 प्रभागांतून स्वबळावर निवडणूक लढवत आहे. 107 प्रभागांतून मनसेतर्फे साडेचार हजारहून अधिक इच्छुकांनी मुलाखती दिल्या होत्या. मनसेच्या आमदार कमिटीच्या शिफारशीनंतर मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी स्वत: डोंबिवलीत तीन दिवस तळ ठोकला होता. 13 ऑक्‍टोबर रोजी उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध केल्यानंतर उमेदवारी न मिळालेल्यांनी बंडखोरी केली व अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले. काही उमेदवारांनी कल्याण डोंबिवली विकास आघाडीतर्फे उमेदवारी अर्ज दाखल केले. मनसेच्या 22 बंडखोरांना आज मनसेचे प्रमुख ठाकरे यांनी "कृष्णकुंज'वर बोलाविले होते. या 22 बंडखोरांशी ठाकरे यांनी स्वत: चर्चा केली. पालिकेची निवडणूक संपली म्हणजे सगळं संपलं का, असा सवाल त्यांनी इच्छुक उमेदवारांना केला. सर्वांनी धीर धरा, भविष्यात निवडणुका होणार आहेत. कल्याण-डोंबिवलीत मनसेचा महापौर सत्तेवर बसणार, असा मला विश्‍वास कार्यकर्त्यांनीच दिला आहे. त्यांनी असे केले तर कसे होणार. अधिकृत उमेदवारांच्या विजयासाठी कामाला लागा. भविष्यात तुमचाही योग्य विचार केला जाईल, असे सांगून इच्छुकांना विश्‍वास दिला. यावेळी बंडखोरांनी कल्याणचे आमदार प्रकाश भोईर व जिल्हाध्यक्ष काका मांडले यांच्या विरोधात तक्रारी केल्याचे सूत्रांकडून समजते.
राज ठाकरे यांना मानणाऱ्यांनी आदराखातर त्यांची भेट घेतली. त्यांच्याकडे आपल्या व्यथा मांडल्या, मात्र उमेदवारी मागे घेण्याविषयी आम्ही अद्याप काहीएक ठरविलेले नाही, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें