गुरुवार, 7 अक्तूबर 2010

कोल्हापूर महापालिकेत लढतीपूर्वीच मनसेने पाठ टेकली

संदीप आचार्य ,मुंबई, ७ ऑक्टोबर
जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडविण्याचे स्वप्न दाखविणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीत न उतरण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे कोल्हापूरमधील मनसे कार्यकर्त्यांमध्ये कमालीची अस्वस्थता निर्माण झाली असून कुस्ती लढण्यापूर्वीच मातीला पाठ लावण्याचा हा प्रकार असल्याची संतप्त प्रतिक्रिया मनसेच्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
कोल्हापूर महापालिकेची निवडणूक येत्या ३० ऑक्टोबर रोजी होत असून ७७ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत शिवसेना-भाजपने युती केली आहे तर काँग्रेस व राष्ट्रवादी स्वबळावर निवडणूक लढवत आहेत. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत मनसेने येथे आपले स्थान निर्माण केले होते. तरुणांची मोठी संख्या राज ठाकरे यांच्या मनसेकडे आकर्षित  झाली होती. पक्षाकडून विशेष लक्ष देण्यात आले नसले तरीही मनसेने येथे चांगलाच जम निर्माण केला होता. पालिका निवडणुकीत मनसे उतरली असती तर किमान चार-पाच जागा निश्चित मिळाल्या असत्या, असा विश्वास येथील मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. या पाश्र्वभूमीवर कोल्हापूरमधील मनसेच्या पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना विश्वासात न घेताच पालिका निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेण्यात आल्यामुळे कोल्हापूरमधील मनसे कार्यकर्त्यांमध्ये कमालीचा असंतोष निर्माण झाला आहे. यातूनच अनेक कार्यकर्त्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी तसेच शिवसेनेत प्रवेश करण्यास सुरूवात केली आहे.
 कोल्हापूर पालिका निवडणुकीत शिवसेना ५२ तर भाजप २५ जागा लढविणार असून शिवसेनेला येथे चांगल्या जागा मिळतील, असा विश्वास त्यांच्या नेत्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे कल्याण-डोंबिवली महापालिकेबरोबरच शिवसेनेने येथेही लक्ष केंद्रित केले असून शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या काही जाहीर सभाही आयोजित करण्यात आल्या आहेत. मनसेच्या स्थापनेनंतर २००७ साली एकाच वेळी नऊ पालिका निवडणुकांना सामोरे जावे लागल्यामुळे ठोस यश मिळाले नव्हते, असे राज यांचे म्हणणे आहे. तेव्हा प्रचाराची धुरा केवळ राज यांच्या एकटय़ाच्याच खांद्यावर होती. मात्र आज परिस्थितीत बदल झाला असून १३ आमदार दिमतीला असताना कोल्हापूरमध्ये कच खाणे कितपत योग्य आहे असा सवाल कोल्हापूरमधील मनसेचे पदाधिकारी करीत आहेत. लोकसभा व विधानसभेत मनसेला मिळालेल्या यशानंतर झालेल्या औरंगाबाद, नवी मुंबई व वसई पालिका निवडणुकीत मनसे का आपटली असा सवाल करत कल्याण-डोंबिवलीत मराठी माणूस राहतो आणि कोल्हापूरमध्ये काय कानडी माणूस राहतो का, असा प्रश्नही या पदाधिकाऱ्यांकडून उपस्थित करण्यात येत आहे.
कालपर्यंत अपक्षांच्या आघाडीच्या ताब्यात असलेली पालिका काँग्रेसच्या ताब्यात यावेळी येऊ शकते असे चित्र निर्माण झाल्यामुळे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी प्रचाराचा नारळ अलीकडेच फोडला. ज्या विभागातील काँग्रेस नगरसेवक काम करत नसेल अथवा तेथे काही प्रश्न असतील तर त्यासाठी काँग्रेसने टोल फ्री क्रमांकही जाहीर केला असल्याचे काँग्रेसचे आमदार बंटी तथा सतेज पाटील यांनी सांगितले.  काँग्रेस-राष्ट्रवादीच्या भांडणात भाजपला येथे चांगल्या जागा मिळतील असा विश्वास आमदार चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे. कल्याण-डोंबिवली पालिकेवर लक्ष केंद्रित करताना कोल्हापूरला वाऱ्यावर सोडणे अयोग्य असल्याचे मत मनसेच्या एका ज्येष्ठ आमदाराने व्यक्त केले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें