रविवार, 10 अक्तूबर 2010

"कल्याण-डोंबिवली'साठी मनसेचे उमेदवार जाहीर"

"कल्याण-डोंबिवली'साठी मनसेचे उमेदवार जाहीर
-
Sunday, October 10, 2010 AT 01:30 PM (IST)

डोंबिवली- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीसाठी शंभर उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. या निवडणुकीत मनसे सर्वशक्तीनिशी उतरणार असून सर्वच्यासर्व म्हणजे 107 जागा लढवणार आहे. उरलेल्या सात उमेदवारांची नावे येत्या दोन दिवसात जाहीर करण्यात येणार आहे.

पक्षाच्या पदाधिकारी आणि आमदारांनी सर्वेक्षण करून उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्यांच्या नावांची यादी प्रथम तयार केली. त्यानंतर आपण स्वतः 450 ते 500 जणांच्या मुलाखती घेतल्या आणि उमेदवार निश्‍चित केले आहेत अशी माहिती राज ठाकरे यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिली.

2007 मध्ये झालेल्या पाच महापालिका निवडणुकांमध्ये पक्ष नवीन होता, पुरेशी पक्षबांधणी झाली नसल्याने फटका बसला. आता पक्षबांधणीचा विचार करून केवळ कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीवर लक्ष केंद्रीत केले आहे. त्यामुळेच कोल्हापूर महापालिकेची निवडणूक असूनही तिथे रस घेतलेला नाही असे राज ठाकरे म्हणाले.

कल्याण - डोंबिवली महापालिकेसाठी मनसेने सर्वसामान्य पदाधिकाऱ्यांनाच उमेदवारी दिली असून सत्ता मिळाली तर आपण पंधरा दिवसातून किमान 4-5 दिवस डोंबिवलीत ठाण मांडून बसणार आहोत असे राज ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

शहरातील खड्यांच्या परिस्थितीबाबत विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना ते म्हणाले की, रस्त्यावर पडलेल्या खड्यांची जबाबदारी ही कंत्राटदाराचीच असली पाहिजे. महापालिकेत सत्ता मिळाली तर प्रत्येक निविदेत कंत्राटदाराला त्याच्या खर्चानेच रस्त्याची दुरूस्ती करून देण्याची अट घालण्यात येईल.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें