गुरुवार, 28 अक्तूबर 2010

भाऊबंदकीचा दुसरा अंक

भाऊबंदकीचा दुसरा अंक
-
Thursday, October 28, 2010 AT 01:15 AM (IST)


दुभंगलेले ठाकरे घराणे पुन्हा एकत्र करून त्यातून शिवसेनेची वज्रमूठ उभी करण्याचे स्वप्न जे बघत होते, त्यांना काका-पुतण्याच्या सवाल-जवाबातून बोध घेणे भाग आहे.

दिवाळी सुरू होण्याआधीच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राज ठाकरे यांच्यात वाक्‌बाण युद्ध सुरू झाले आहे. शब्दांची आतषबाजीही रंगू लागली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन केल्यापासून राज आणि उद्धव ठाकरे यांच्यात जाहीर शिव्याशाप सुरू होते. "शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी मात्र मी कधीही काही बोलणार नाही,' असे राज नेहमी सांगत असत; पण उद्धव यांनी थेट सामना करायचे टाळून जेव्हा बाळासाहेबांमार्फत शरसंधान सुरू केले तेव्हा राज यांना आपली प्रतिज्ञा कधी ना कधी मोडावी लागणार, हे स्पष्ट होते. बाळासाहेबांची प्रकृती ठीक नव्हती त्या वेळी त्यांच्या नावे प्रसिद्धीला दिल्या जाणाऱ्या पत्रकातून किंवा "सामना'च्या कार्यकारी संपादकांना त्यांनी दिलेल्या मुलाखतीतून राज यांच्या टिकेला उत्तरे दिली जात असत. प्रकृती स्थिरावल्यानंतर या वेळी ते दसरा मेळाव्याला आले आणि त्यांच्या तोंडूनच राज यांची टिंगलटवाळी केली गेली. आपल्या नातवाचे लॉंचिंग करताना शिवसेनाप्रमुखांनी पुतण्यावर केलेले शरसंधान घराणेशाहीची कक्षा आणखी संकुचित करणारे होते. राज यांनी त्याला कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीचे निमित्त साधून उत्तर दिले. शिवसेनाप्रमुखांनी या देशातल्या एकाही नेत्याला आपल्या ठाकरी शैलीतून सोडलेले नाही. त्यामुळे त्यांचेच बाळकडू घेऊन मोठ्या झालेल्या राज यांनी तरी किती काळ तोंड दाबून बुक्‍क्‍यांचा मार सहन करायचा? "अरे'ला "कारे' करणे हा ठाकरी बाणा असेल, तर राजही "ठाकरे'च आहेत हे त्यांनी डोंबिवलीच्या मैदानात दाखवून दिले.

राज यांच्या टीकेला उत्तर देताना शिवसेनाप्रमुखांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात "राज ठाकरे' हीदेखील घराणेशाहीच असल्याचे म्हटले आहे. ते बरोबरच आहे. त्यामुळे बाळासाहेब यांना राज यांनी दिलेल्या घरच्या आहेराने देशातले सारेच राजकारणी थक्क झाले तर नवल नाही. शिवसेनाप्रमुखांच्या वयाचा विचार करून गेल्या काही दिवसांत सर्वच राजकारण्यांनी त्यांना आपल्या राजकीय टीकेच्या वर्तुळाबाहेर ठेवले होते. पण आता खुद्द त्यांच्या पुतण्यानेच हे वर्तुळ छेदले असल्याने राजकारणातील इतर नेत्यांनाही बोलायला मोकळीक मिळणार आहे. महसूलमंत्री नारायण राणे यांनीही शिवसेना सोडल्यानंतर राज यांच्यासारखीच प्रतिज्ञा केली होती. पण त्यांनाही ही प्रतिज्ञा मोडायला शिवसेनेने भाग पाडले. उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी शिवसेना सोडली आणि बाळासाहेब ठाकरेंवरच "हल्लाबोल' केला. त्याचा त्यांना बराच त्रास झाला. बरीच शक्ती वाया गेली. त्यापासून धडा घेऊन राज आणि राणे या दोघांनीही बाळासाहेब यांना टिकेपासून दूर ठेवून उद्धव यांनाच आपले लक्ष्य केले होते. उद्धव यांच्या दृष्टीने हीच मोठी अडचण होती. या दोघांना थेट बाळासाहेबांच्या तोंडी देणे उद्धव यांची राजकीय गरज होती. राज यांनी बाळासाहेबांवर तोंडसुख घेण्याआधी काही दिवस राणे यांनीही "मातोश्रीवरील लीला' सांगण्याची धमकी दिली होती. त्यालाही बाळासाहेबांनाच उत्तर द्यावे लागले. त्यामुळे बाळासाहेबांना दैवत मानणारा शिवसेनेचा विरोधक उद्धव यांनी शिल्लक ठेवला नाही, असे म्हणता येईल. ही बेरीज समजायची की वजाबाकी याचा विचार शिवसेनेच्या नेत्यांना करावा लागणार आहे. राज आणि उद्धव यांच्यात दुभंगलेले "ठाकरे घर' सांधण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांनाही आपोआपच खिळ बसणार आहे. ठाकरे घराणे पुन्हा एकत्र करण्याचे, त्यातून शिवसेनेची वज्रमूठ उभी करण्
याचे आणि मराठी माणसाचे राजकारण सांधण्याचे स्वप्न जे बघत होते, त्यांना काका-पुतण्याच्या या सवाल-जवाबातून बोध घेणे भाग आहे. राज काय आणि बाळासाहेब काय, दोघेही बोलले ते खरेच आहे. राज बाळासाहेबांच्याच तालमीत तयार झाले हेही खरे आणि बाळासाहेबांनी त्यांच्या संयमाचा विचार न करता आगपाखड केली हेही खरेच. तरीही दोघांनीही जे बोलायला हवे, ते टाळलेच आहे. केवळ व्यक्तिगत शेरेबाजी आणि टिंगलटवाळी यापुरताच विषय थांबला आहे. अशा व्यक्तिगत निंदानालस्तीतून लोकांची घटकाभर करमणूक होते; पण त्यातून सार्वजनिक हिताच्या दृष्टीने काहीच साध्य होत नाही. दोघांनाही परस्परांविषयी खरे बोलायचे असेल तर बोलण्यासारखे पुष्कळ आहे. त्यातून कदाचित सार्वजनिक हितही साधले जाईल! पण तसे काही होणार नाही. काचेच्या घरात राहणारे दुसऱ्याच्या घरावर दगड मारत नाहीत, हे भारतातील राजकारणी चांगले जाणून असतात. त्यामुळे ठाकरे घराण्याने कल्याण-डोंबिवलीमध्ये जो धोबीघाट घातला, त्यातून ना कल्याण-डोंबिवलीच्या नागरिकांचे कल्याण होणार, ना महाराष्ट्रातील जनतेचे.

.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें