शनिवार, 2 अक्तूबर 2010

राज ठाकरे यांची पोतडी रिकामी ..!

राज ठाकरे यांची पोतडी रिकामी ..!
नाशिक, २ ऑक्टोबर / प्रतिनिधी
मनसेची स्थापना झाल्यानंतर वेगवेगळ्या मुद्यांवरून अवघ्या देशाचे लक्ष वेधून घेणाऱ्या राज ठाकरे यांच्याकडील जवळपास  सर्वच मुद्दे संपुष्टात आले की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे. शनिवारी ही बाब दस्तुरखुद्द राज यांनीच येथे बोलून दाखविली. आज आपल्या पोतडीत काही नसल्याचे स्पष्ट करत त्यांनी राजकारणात आपण अपघाताने दाखल झाल्याचे सांगून सर्वाना आश्चर्याचा धक्का दिला. मनसेतर्फे आयोजित करिअर मेळाव्यात मार्गदर्शन करताना राज यांनी विद्यार्थ्यांना आपला आतला आवाज ऐकून करिअर निवडण्याचा सल्ला दिला खरा, मात्र सद्यस्थितीत स्वत:च्या आतल्या आवाजाबद्दल काहिशी संधिग्धताच ठेवणे त्यांनी पसंत केले.
करिअर फेअरच्या निमित्ताने अनेक महिन्यानंतर नाशिक येथे राज यांचे जाहीर भाषण होणार असल्याने हजारो युवकांनी सकाळपासून महाकवी कालिदास कला मंदिरात गर्दी केली होती. तथापि, राज यांचे नेहमीच्या ठाकरी शैलीत भाषण न झाल्याने जमलेल्या युवकांचा काहिसा हिरमोड झाला. असे असूनही कला मंदिरातील त्यांच्या मोटारीला सर्वानी एकच गराडा घातल्याने त्यांची ‘क्रेझ’ कायम असल्याचे अधोरेखीत झाले. आ. वसंत गीते यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या तीन वर्षांपासून मनसेतर्फे स्पर्धा परीक्षा व करिअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले जात आहे. यंदाच्या शिबिर समारोपप्रसंगी बोलताना राज यांनी करिअर हा मोठा विषय असून तो प्रत्येक विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी निगडीत असल्याचे सांगितले. करिअर करायचे म्हणजे काय ते तुमच्या अंर्तमनात तुम्हाला प्रथम समजले पाहिजे. ते एकदा समजले की तुम्हाला कुणाच्या मार्गदर्शनाची गरज राहणार नसल्याचे ते म्हणाले.
राजकारण देखील एक करिअर असून आपण त्यात अपघाताने आलो आहोत. ‘कमर्शिअल आर्टिस्ट’ शिक्षण घेतल्यावर व्यंगचित्रकार आणि मग राजकीय व्यंगचित्रकार असे आपल्या आयुष्यातील काही पदर त्यांनी उलगडून दाखविले. महात्मा गांधी, अमिताभ बच्चन, सचिन तेंडूलकर यांची उदाहरणे देत राज यांनी विद्यार्थ्यांना आपले समाधान नेमके कशात आहे ते ओळखण्याचा सल्ला दिला. दरम्यान, भरगच्च सभागृहात एका प्रवेशद्वारातून जागा नसतानाही काही जण आत शिरत असल्याचे पाहून राज यांनी ‘जागा शिल्लक नसताना अजून किती आत शिरणार’ असा टोला परप्रांतीयांचा उल्लेख न करता हाणला. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना उद्देशून बोलताना त्यांनी आपल्या पोतडीत आज फारसे काही नसल्याचे स्पष्ट करत आपली पोतडी जणू रिकामी असल्याचा संदेश दिला. दरम्यान, प्रारंभी, शिबिराचे संयोजक आ. गीते यांनी या संपूर्ण उपक्रमाचा आढावा घेतला. शिबिरासाठी प्रारंभापासून प्रयत्न करणाऱ्या बाळासाहेब दुगजे यांच्यासह विविध पदाधिकाऱ्यांचा राज यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें