शुक्रवार, 29 अक्तूबर 2010

मनसेची भूमिका निर्णायक ठरणार!

मनसेची भूमिका निर्णायक ठरणार!
सकाळ वृत्तसेवा
Saturday, October 30, 2010 AT 12:30 AM (IST)
कल्याण - कल्याण-डोंबिवली पालिका निवडणुकीत शिवसेना-भाजप युती, कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यातच मुख्य लढत असली, तरी कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्‍यता नाही. "पालिकेत आमचाच महापौर असेल,' अशी घोषणा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केल्याने निकालानंतर त्रिशंकू स्थिती झाल्यास ते युतीचा पाठिंबा घेणार की आघाडीचा, यावरच सर्व राजकीय गणिते अवलंबून आहेत.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे विरुद्ध मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात कलगीतुरा रंगल्याने कल्याण-डोंबिवलीच्या निवडणुकीला यंदा प्रचंड महत्त्व प्राप्त झाले आहे. प्रचारादरम्यान दोन्ही बाजूंनी यथेच्छ चिखलफेक झाल्याने निकालानंतर युती आणि मनसे कितपत एकत्र येतील, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. त्यामुळे कोणत्याही एका आघाडीला बहुमत न मिळाल्यास मनसेची भूमिका निर्णायक ठरेल. अंबरनाथ नगरपालिकेत मनसेने युतीला पाठिंबा दिल्याने त्या बदल्यात मनसे युतीचा पाठिंबा घेईल की आघाडीचा, हे पाहणे रंजक ठरेल. आघाडीचा पाठिंबा घेतल्यास मनसेला अनेक आरोपांना तोंड द्यावे लागेल. त्यामुळेच राज ठाकरे सातत्याने "पूर्ण सत्ता द्या,' असे आवाहन मतदारांना करीत आहेत. "आम्ही कॉंग्रेसशी चर्चा केली, तर त्याला "डील' म्हणू नका,' असेही त्यांनी युतीच्या नेत्यांना खडसावल्याने पुढील राजकारण मनसेभोवती कसे फिरेल, त्याची ही चुणूक मानली जात आहे. या पालिकेसाठी येत्या रविवारी (ता. 31) मतदान होणार असून सोमवारी (ता. 1) सकाळी 10.30 पासून मतमोजणी सुरू होईल.

एखादा पक्ष किंवा आघाडीला निर्णायक किंवा स्पष्ट कौल न देण्याची येथील मतदारांची आजवरच्या तीन निवडणुकांतील परंपरा आहे. 1995 ते 2005 या कालावधीत शिवसेना-भाजप युतीला अपक्षांची मदत घेऊनच सत्ता हस्तगत करावी होती. गेल्या पाच वर्षांत आधीची अडीच वर्षे आघाडी आणि आताची अडीच वर्षे शिवसेना-भाजप युती सत्तेत आहे. या अडीचकीच्या सत्तेची मदारही अपक्षांवरच होती.

पालिकेच्या 107 जागांपैकी शिवसेना 62 जागा लढवीत असून भाजपची लढाई 45 जागांवर आहे. युतीसाठी यंदाची निवडणूक ही अस्तित्वाची लढाई आहे. नजीकच्या काळातील मुंबई, ठाण्याच्या निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर युतीसाठी ही जनमत चाचणी आहे. प्रस्थापित राजकीय पक्षांपैकी एकाही राजकीय पक्षाने स्वबळावर 107 जागा लढविलेल्या नाहीत. फक्त मनसे सर्व जागा लढवीत आहे. कॉंग्रेसविरोधातील बंडखोरांनी यंदा "कल्याण-डोंबिवली विकास आघाडी' उघडली आहे आणि या आघाडीचे 12 उमेदवार रिंगणात आहेत. या आघाडीचे "रिंगमास्टर' "राष्ट्रवादी'पुरस्कृत आमदार गणपत गायकवाड असल्याने कॉंग्रेसपुढे आव्हान उभे ठाकले आहे. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये जागावाटपावरून आधी वाद झाला असला आणि नंतर कॉंग्रेस 55, राष्ट्रवादी 52 या सूत्रावर तो मिटविण्यात आला असला, तरी कमी जागा लढवून अधिक जागांवर विजय मिळविण्याची परंपरा राष्ट्रवादी कॉंग्रेस यंदाही कायम राखते का, याकडे सर्वांचे लक्ष आहे."रिडालोस'चे 32 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. गेल्या वेळी रिपाईंना तीन व बसपला एक जागा मिळाली होती. या वेळी ते आहे ती स्थिती कायम राखतात का, हेही सोमवारी स्पष्ट होईल.

प्रचारासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कल्याण-डोंबिवलीतच तळ ठोकला असून गेल्या आठवड्यात त्यांच्या चार सभा पार पडल्या आहेत. उद्धव ठाकरे यांनी "रोड शो' अणि प्रचारसभांचा सपाटा लावला आहे. राज यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनीही "रोड शो' केला. उद्धव ठाकरे यांच्यासोबत डोंबिवलीच्या माहेरवाशीण असलेल्या त्यांच्या पत्नी रश्‍मी ठाकरे आणि "युवा सेने'चे सेनापती आदित्य ठाकरे हेही रणधुमाळीत सहभागी झाल्याने ठाकरे कुटुंबीय प्रचारात उतरल्याचे दिसून आले. आघाडीतर्फे मुख्यमंत्री अशोक चव्हाण, उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यासह आर. आर. पाटील, नारायण राणे, सुनील तटकरे, गणेश नाईक, जयंत पाटील, वसंत डावखरे आदी दिग्गजांनी सभा आणि "रोड शो' केले. भाजपतर्फे सुधीर मुनगंटीवार यांच्यासह मुंबई-ठाण्यातील आमदारांनी प्रचाराचा डोलारा सांभाळला.

विकासापेक्षा भाऊबंदकीच प्रचाराचा मुख्य मुद्दा! कल्याण-डोंबिवलीच्या विकासापेक्षा ठाकरे घराण्यातील वाद हाच प्रचाराचा मुख्य मुद्दा ठरल्याचे दिसून आले. दसरा मेळाव्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी या आतषबाजीला सुरुवात केली आणि कालांतराने सर्वच नेते त्यात सहभागी झाले. प्रचारात युतीने आपल्या आजवरच्या कामांवर भर दिला; तर राज ठाकरे आणि आघाडीच्या नेतेमंडळींनी युतीने शहराचा कसा सत्यानाश केला, यावर भर दिला. आघाडीने शहर विकासाला निधी देण्याचे आश्‍वासन दिले; तर रामदास आठवले यांनी जातीयवादी शक्तींना सत्तेवरून खाली खेचा, असे आवाहन केले. प्रचारात रस्ते, प्रदूषण, अनधिकृत बांधकामे यांचाही उल्लेख झाला. शिवसेना आणि मनसेने "एसएमएस', "वेबसाईट', "एलसीडी'चा वापर करीत प्रचार हायटेक केला

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें