बुधवार, 27 अक्तूबर 2010

युतीनेच केला कल्याण-डोंबिवलीचा सत्यानाश

युतीनेच केला कल्याण-डोंबिवलीचा सत्यानाश
सकाळ वृत्तसेवा
Thursday, October 28, 2010 AT 12:30 AM (IST)

कल्याण  - ऐतिहासिक वारसा असलेल्या, शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कल्याणमध्ये ज्यांच्या हाती भगवा झेंडा होता, त्यांनी कल्याण-डोंबिवली शहराचा सत्यानाश केला,'' अशी जळजळीत टीका मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज येथील प्रचारसभेत केली. नेहमीच्या आक्रमक शैलीत त्यांनी युती, आघाडीवर सडकून टीका केली असली, तरी त्यांचा सर्वाधिक भर विकासाच्या मुद्द्यावरच होता.

कल्याण पूर्वेतील डबल टॉवर येथे मनसेतर्फे आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते. या वेळी आमदार बाळा नांदगावकर, महिला आघाडीच्या अध्यक्षा शालिनी ठाकरे, काका मांडले, आमदार प्रकाश भोईर आदी उपस्थित होते.

'पत्रकारांनी मला प्रश्‍न विचारला, की तुम्हाला विकासकामांचा अनुभव काय? मग सांगा, लग्नाच्या वेळी अनुभव विचारला जातो का? माझा आत्मविश्‍वासच हा माझा अनुभव आहे. कल्याणची परंपरा ऐतिहासिक आहे. साडेतीनशे वर्षांपूर्वी शिवाजी महाराजांनी कल्याण जिंकले होते. त्या वेळी कल्याणमध्ये त्यांना सोन्याच्या मोहोरांचे हंडे सापडले होते. आता हंडा सापडत नाही. सगळे गिळून टाकले सत्ताधारी पक्षाने. पहिल्या बाजीरावांचे लग्न कल्याणमध्ये झाले; पण या ऐतिहासिक शहराची युतीने विल्हेवाट लावली. नगरसेवकांनी काय करून ठेवले आहे, याचा बाळासाहेबांना पत्ताच नाही. युतीने कल्याण-डोंबिवली शहरे भकास करून ठेवली. आता माझ्या हाती सत्ता द्या, केळी सोलल्यासारखे एकेकाला सोलून ठेवतो,'' असे सांगत त्यांनी युतीच्या कारभारावर हल्ला चढविला.

'गटारे उघडी, रस्ते नाहीत, रुग्णालये नाहीत; यांनी काही केले नाही तरी लोक मतदान करतात. त्यामुळे तुम्हाला गृहित धरण्यात आले आहे. जोपर्यंत त्यांचा विश्‍वास मोडीत काढत नाहीत, तोपर्यंत काही वेगळं घडणार नाही. हा विश्‍वास मोडून काढण्याची संधी चालून आली आहे. निवडून दिलेले लोक रग्गड झाले. शहर भकास झाले. निवडून दिलेल्या सत्ताधारी पक्षाने शहराच्या विकासाचा आत्मियतेने विचारच केला नाही. सकाळी दोन-तीन तास आणि सायंकाळी तीन तास वीज भारनियमन केले जाते. रोज करण्यासाठी काय तो व्यायाम आहे,'' असा सवाल राज यांनी केला. "माय नेम इज खान'च्या वेळी काठ्या खाणाऱ्या शिवसैनिकांना बाळासाहेबांच्या वाढदिवसाला "सामना' मुखपत्रात चित्रपटाची जाहिरात छापून आल्यावर काय वाटले असेल? मी जर कृपाशंकरच्या घरी गणपतीच्या दर्शनाला गेलो, तर काय वाटेल माझ्याविषयी? तेच वाटले होते शिवसैनिकांना, याचा पुनरुच्चार त्यांनी केला.

आजवर मी जे बोललो तेच केले आहे, असे सांगत मराठीतून दुकानांच्या पाट्या, मोबाईल फोनवरही मराठीला प्राधान्य, असे दाखले त्यांनी दिले. ""कल्याण डोंबिवलीबाबत बोलतोय तेच खरे करून दाखविणार आहे. कारण टेंडरवर माझे घर चालत नाही,'' असे सांगून ते म्हणाले, ""दात स्वच्छ होत नसतील, तर लोक टूथपेस्टही बदलतात. तुम्ही तर पंधरा-पंधरा वर्षे दात खराब झाले, पडायला आले तरी एकच टूथपेस्ट (युती) वापरत आहात. आता मनसे ही नवी टूथपेस्ट आहे. नवीन चकाचक. ती 31 ऑक्‍टोबरला वापरावीच लागेल; त्याशिवाय गत्यंतर नाही,'' अशी मल्लीनाथी राज ठाकरे यांनी केली.

शांतता नाही, तोपर्यंत भाषण नाही!सभेच्या ठिकाणी गर्दीमुळे चेंगराचेंगरी झाली. उपस्थितांचा एकच गोंधळ सुरू होता. त्यामुळे सुरुवातीला 15 मिनिटे राज ठाकरे काहीच बोलले नाहीत. "जोपर्यंत शांतता होत नाही, तोपर्यंत भाषण करणार नाही; अन्यथा भाषण न करताच निघून जाईन,' असा दमही त्यांनी उपस्थितांना भरला. त्यानंतर गैरसोयीविषयी दिलगिरी व्यक्त करीत आधीच्या लोकांनी (सत्ताधारी युतीचे नेते) सगळ्या मोकळ्या जागा खाऊन टाकल्याने सभांसाठी जागा मिळत नसल्याचा टोलाही राज ठाकरे यांनी लगावला.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें