रविवार, 31 अक्तूबर 2010

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा
सकाळ वृत्तसेवा
Sunday, October 31, 2010 AT 12:30 AM (IST)
 
डोंबिवली - कल्याण-डोंबिवली पालिका निवडणुकीत प्रचारासाठी मुक्काम ठोकणारे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात डोंबिवलीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिस उपायुक्त भुजंगराव शिंदे यांनी दिली.

निवडणूक आयोगाच्या 9 एप्रिल 2010 च्या आदेशानुसार महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी बाहेरून येणाऱ्या राजकीय नेत्याने प्रचार संपण्यापूर्वी ही निवडणूक ज्या परिसरात होते, तो परिसर सोडून जावे, असे आदेश आहेत. निवडणुकीचा प्रचार 29 ऑक्‍टोबरला रात्री संपला. तत्पूर्वी पोलिसांनी निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार राज ठाकरे यांना शहर सोडून जाण्याची नोटीस बजावली होती; मात्र ठाकरे यांनी शहर न सोडता ते निवडणूक परिसरात होते. निवडणूक आयोगाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी ठाकरे यांच्याविरोधात डोंबिवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, या संदर्भात मनसेचे आमदार नितीन सरदेसाई यांनी सांगितले, की मनसे अध्यक्ष ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्याची अधिकृत माहिती आमच्याकडे नाही.
प्रचारासाठी मनसेने सरकारी वाहने वापरली
29 ऑक्‍टोबरला झालेल्या मनसेच्या प्रचारसभेसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या पालघर, भिवंडी, डहाणू व पनवेल या आगारांतून 27 बसेसमधून कार्यकर्ते सभेला आले होते. या सभेचे आयोजक मनसेचे जिल्हा चिटणीस यांनी इरफान शेख यांच्याविरोधात प्रचारासाठी सरकारी वाहनांचा वापर करून आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी निवडणूक अधिकारी रामनाथ सोनवणे यांनी बाजरपेठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
या तक्रारीच्या आधारे बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच संबंधित बस आगार व्यवस्थापकांनी बसेस प्रचारासाठी कशा दिल्या आणि कोणी परवानगी दिल्या याचीही या प्रकरणात चौकशी करण्यात येणार असल्याचे निवडणूक अधिकारी सोनवणे यानी सांगितले. प्रचारसभेचा आयोजक व बस पुरविणारे या दोघांवरही कारवाई करण्यात येणार आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें