सोमवार, 1 नवंबर 2010

कल्याण-डोंबिवलीत मनसेच किंगमेकर

कल्याण-डोंबिवलीत मनसेच किंगमेकर!
सकाळ वृत्तसेवा
Tuesday, November 02, 2010 AT 01:00 AM (IST)
 
मुरलीधर भवार
कल्याण - कल्याण-डोंबिवली महापालिकेतील 107 पैकी 25 जागांवर विजय मिळवत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सत्तारुढ शिवसेना-भाजप युती आणि कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीला जोरदार धक्का दिला आहे. युतीपैकी केवळ भाजपचे बाहुबल घटवण्यात मनसेला यश आले असले, तरी शिवसेनेच्या मतांवर मनसेचा पर्यायाने राज ठाकरे यांच्या करिष्म्याचा फारसा प्रभाव पडलेला नाही. मात्र कल्याण-डोंबिवलीतील सत्तेची दोरी पूर्णतः मनसेच्याच हाती आहे. काठावरच्या बहुमतासाठी आवश्‍यक असलेला 54 चा जादुई आकडा गाठण्यासाठी आघाडी किंवा युतीला मनसेवरच अवलंबून रहावे लागणार आहे. त्यामुळे मनसेला हाताशी धरून सत्ता कोण स्थापन करणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. 

कल्याण-डोंबिवली महापालिकेची निवडणूक राजकीय पक्षांप्रमाणे उद्धव आणि राज या ठाकरे बंधूंनी प्रतिष्ठेची केली होती. म्हणूनच निकालाबाबत कधी नव्हे एवढी उत्सुकता होती. 107 पैकी 62 जागा शिवसेनेने लढविल्या. त्यापैकी 32 जागा त्यांच्या पदरात पडल्या. जवळपास 50 टक्के यश त्यांनी मिळवले. गेल्या निवडणुकीत शिवसेनेला 29 जागा मिळाल्या होत्या. यंदा त्यांच्या तीन जागा वाढल्या. शिवसेनेचा मित्रपक्ष भाजपने 45 जागा लढविल्या आणि फक्त नऊ जागांवर विजय मिळविला. गेल्या वेळी भाजपकडे 16 जागा होत्या. यंदा त्यांच्या सात जागा घटल्या. भाजपच्या पीछेहाटीचा फटका युतीला बसला आहे. युतीच्या एकूण जागांची संख्या 41 होते. त्यामुळे "54'चे संख्याबळ गाठण्यासाठी मनसे फॅक्‍टर महत्त्वपूर्ण ठरणार आहे. सत्तास्थापनेसाठी जवळचे काही अपक्ष गृहित धरले, तरी युतीला 54 चा आकडा गाठणे शक्‍य होणार नाही, अशी सध्याची स्थिती आहे. 

युतीचे 41 व अपक्षांतील सहा-सात सदस्य धरूनही सदस्यसंख्या बहुमताच्या आसपासही जाण्याची शक्‍यता दिसत नाही. भाजपच्या हक्काच्या मानल्या गेलेल्या शहरी मतांवर मनसेने डल्ला मारल्याने युतीचे सत्तास्वप्न भंग होण्याची शक्‍यताच अधिक आहे.

आघाडीलाही धक्का
कॉंग्रेसने यावेळी 55 आणि राष्ट्रवादीने 52 जागा लढविल्या होत्या. मनसे फॅक्‍टर युतीला मारक ठरणार असल्याचा अंदाज राजकीय वर्तुळातून व्यक्त केला जात होता; परंतु मनसेने भाजपबरोबर आघाडीलाही धक्का दिला आहे. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीला प्रत्येकी 15 जागा मिळाल्या आहेत. आघाडीचे एकूण संख्याबळ 30 च्या घरात आहे. मनसेने जशी भाजपला हानी पोचवली आहे, तसेच कॉंग्रेस-राष्ट्रवादीला मागे खेचत धक्का दिला आहे. गेल्या निवडणुकीत कॉंग्रेसला 21 जागा मिळाल्या होत्या. यंदा त्यांच्या सहा जागा घटल्या आहेत. राष्ट्रवादीला गेल्यावेळी 22 जागा मिळाल्या होत्या. या वेळी त्यांना सात जागांवर पाणी सोडावे लागले आहे. आघाडीला 40 जागांची अपेक्षा होती. त्यांच्या पदरात दहा जागा कमी पडल्या आहेत.

या निवडणुकीत "ठाकरे विरुद्ध ठाकरे' असा सामना रंगला होता. दोन्ही ठाकरेंची प्रतिष्ठा पणाला लागली होती. शिवसेनेच्या उद्धव ठाकरे यांना आहे त्याच जागा राखण्यात यश आले असले, तरी मनसेने मिळविलेल्या 25 जागा त्यांना आपल्या पक्षाच्या कार्यपद्धतीचा विचार करण्यास भाग पाडणाऱ्या आहेत. अंबरनाथ पालिकेत शिवसेनेला मनसेने पाठिंबा दिला असला, तरी मनसे आता कल्याण-डोंबिवलीत सत्तेसाठी युतीला पाठिंबा देणार नाही. महापालिकेतील आघाडीच्या तीस सदस्यांना मनसेने पाठिंबा दिला, तर "54' ची मॅजिक फिगर गाठणे त्यांना सहज शक्‍य आहे. मनसेने आघाडीला पाठिंबा दिला, तर "मनसेला मत म्हणजे कॉंग्रेसला मत' असा युतीचा प्रचार सुरुच राहील. शिवाय या स्थितीत किती अपक्ष या नव्या राजकीय सूत्रात सहभागी होतात, ते लवकरच स्पष्ट होईल. ज्या अपक्षांना युती व आघाडीने उमेदवारी नाकारली, ते सत्तेचे पारडे जेथे जड आहे तेथेच झुकण्याची दाट शक्‍यता आहे. काहीही असले, तरी नव्या राजकारणात कल्याण-डोंबिवलीतील सत्तेची दोरी सध्या तरी मनसेच्याच हाती आहे.

मनसेचा करिष्मा उल्लेखनीय 
प्रचारात राज ठाकरे यांनी मतदारांना पूर्ण सत्ता देण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या भाषणांना जमलेली गर्दी ते मतांमध्ये परावर्तीत करू शकल्यानेच मनसेला 25 जागांवर विजय मिळविता आला. याचा विचार शिवसेनेने गांभीर्याने करणे गरजे आहे. 31 जागा मिळवून शिवसेना सिंगल लार्जेस्ट पार्टी ठरली असली तरी 25 जागा मिळवून मनसे दुसऱ्या स्थानी आहे, ही बाब उल्लेखनीय म्हणावी लागेल

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें