शनिवार, 20 नवंबर 2010

पोलिसांच्या निष्क्रियतेविरोधात मनसेचा मोर्चा

पोलिसांच्या निष्क्रियतेविरोधात मनसेचा मोर्चा
पोलीस उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याच्या घरावर पडलेला दरोडा अन् नाशिकरोड येथे पोलीस कर्मचाऱ्याच्या घरातून दागिन्यांच्या झालेल्या चोरीच्या घटनेने गुन्हेगारांची मुजोरी व पोलीस यंत्रणेची हतबलता समोर आल्याची तक्रार करतानाच ज्या शहरात खुद्द पोलीस सुरक्षित नाही, तेथे सामान्य नागरिकांचे काय, असे प्रश्न उपस्थित करत मनसेने शनिवारी पोलीस यंत्रणेच्या निष्क्रियतेविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढून शहराला भयमुक्त करण्याची मागणी केली. सातत्याने सुरू असणारे चेन स्नॅचिंगचे प्रकार आणि अलिकडेच घरात शिरून महिलांवर झालेले प्राणघातक हल्ले या पाश्र्वभूमीवर मोर्चात महिलांची उपस्थितीही लक्षणिय होती. आ. वसंत गीते, आ. उत्तम ढिकले, प्रदेश सरचिटणीस अतुल चांडक यांनी मोर्चाचे नेतृत्व केले.
चोऱ्या-घरफोडय़ा, वाहने जाळण्याच्या घटना, पोलीस असल्याचे भासवून वृद्धांना लुबाडणाऱ्या इराणी टोळीने घातलेला धुमाकूळ, बँकेत पैसे काढणाऱ्यांवर पाळत ठेऊन पैसे लांबविण्याचे प्रकार अशा असंख्य गुन्ह्यांच्या मालिकेने शहरासह जिल्ह्यातील एकूणच कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे ढासळल्याचे स्पष्ट झाले आहे. गुन्ह्यांच्या प्रमाणात मोठय़ा प्रमाणात वाढ होत असताना पोलिसांनी ते रोखण्याच्या दृष्टीने कोणतेही पाऊल उचलले नसल्याची सर्वसामान्यांची भावना आहे. पोलीस यंत्रणेच्या निष्क्रियतेकडे यापूर्वी व्यंगचित्रांच्या माध्यमातून लक्ष वेधणाऱ्या मनसेने मोर्चात त्याच स्वरूपाचे फलक झळकावत पुन्हा सर्वाचे लक्ष वेधून घेतले. ‘पोलिसांचा धाक सामान्यांना, चोरांचा धाक पोलिसांना’,  ‘सरकार बसलं दिल्लीत, चोऱ्या होतात गल्लीत, शासन सुस्त, चोर मस्त’ अशा आशयाच्या फलकांसोबत मोर्चेकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. बी. डी. भालेकर मैदानावरुन निघालेला मोर्चा शहरातील प्रमुख भागांमधून मार्गक्रमण करत जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. पोलीस आयुक्तांनी शहरवासियांचा भ्रमनिरास केला असून वाढत्या गुन्ह्यांमुळे पोलिसांचा गुन्हेगारांवरील वचक कमी झाला असल्याची तक्रार यावेळी करण्यात आली. शहराप्रमाणे ग्रामीण भागातही दरोडय़ांचे सत्र सुरू असल्याने शहरात पुरेशी यंत्रणा अस्तित्वात आहे किंवा नाही असा प्रश्न उपस्थित झाल्याचे आ. गीते यांनी नमूद केले. या संदर्भात मनसेने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.
नाशिक भयमुक्त करण्यासाठी सध्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणात प्रत्येक पोलीस ठाण्याला अधिकाधिक अधिकारी व कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात यावी, अपुऱ्या मनुष्यबळाचा परिणाम कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर झाला असून जिल्ह्यासाठी नव्याने पोलीस भरती करावी, यापूर्वी पोलिसांनी तडीपार केलेल्या पण शासनाकडून अपिलात सुटून आलेल्या गुन्हेगारांवर कारवाई करावी अशा मागण्या मनसेने केल्या. तसेच रात्रीच्यावेळी शहरात गस्त घालण्यासाठी स्वतंत्र पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक, नव्याने निर्माण झालेल्या इंदिरानगर, उपनगर व आडगांव पोलीस ठाण्यात नवीन कर्मचारी वर्ग आणि पोलिसांना अत्याधुनिक शस्त्रास्त्रेही उपलब्ध करून देण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.   

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें