मंगलवार, 16 नवंबर 2010

महाआघाडी विरोधी पक्षनेते पदासाठी कोर्टात जाणार
सकाळ वृत्तसेवा
Wednesday, November 17, 2010 AT 12:15 AM (IST)
 
डोंबिवली - कल्याण-डोंबिवली महापालिकेतील रणधुमाळी संपली असली तरी अजूनही आघाडीच्या नगरसेवकांनी आपला विरोधी पक्षनेते पदावरचा हक्‍क सोडलेला नाही. मनसेला विरोधी नेते पद देण्यास विरोध करणाऱ्या आघाडीच्या नेत्यांनी महाआघाडी स्थापन करून त्याची कायदेशीर नोंदणी करून घेतली आहे. आता या महाआघाडीला विरोधी नेते पद द्यावे, असा दावा करण्यासाठी महाआघाडीने कोर्टात धाव घेण्याची तयारी चालविली आहे. 

पालिकेतील सत्ताधारी पक्षानंतर सर्वात मोठा असलेला पक्ष म्हणून नियमानुसार मनसेला विरोधी पक्षनेते पद देण्यात आले असले तरी सुरुवातीपासूनच आघाडीच्या नगरसेवकांचा या निर्णयाला विरोध आहे. कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या नगरसेवकांनी अपक्षांच्या मदतीने महाआघाडी स्थापन केली असून या महाआघाडीत 32 सदस्य आहेत; तसेच या महाआघाडीची कोकण आयुक्‍तांकडे नोंदणी करण्यात आले आहे. यापूर्वी पुणे, अहमदनगर आणि बुलढाणा या महापालिकेतील विरोधी पक्षनेते पद महाआघाडीला देण्यात आले आहे. यामुळे याच धर्तीवर या महाआघाडीला विरोधी पक्षनेते पद मिळावे, असा दावा आघाडीच्या नगरसेवकांनी केला आहे. त्याचबरोबर मनसेकडे एक अपक्ष आला असतानाही मनसेने आपली युती कोकण आयुक्‍तांकडे नोंदणी केली नाही किंवा शिवसेना भाजपाकडेदेखील अपक्ष गेले असतानाही त्यांनी आपली युतीची नोंदणी केलेली नाही. यामुळे आघाडीने महाआघाडीची सर्वप्रथम नोंदणी केल्यामुळेसुद्धा विरोधी पक्ष नेतेपद मिळेल, असा आघाडीचा दावा आहे.
त्याचबरोबर महापौरांनी महापौर निवडीनंतर सभा संपल्याचे जाहीर केल्यानंतर राष्ट्रगीत थांबवून मनसेचा विरोधी पक्षनेता जाहीर केला असल्यामुळे आघाडीकडून याला हरकत घेण्यात आली आहे. एकदा सभा संपल्यानंतर कोणतीही घोषणा करता येत नसताना विरोधी पक्षनेत्याची घोषणा करणे चुकीचे असल्याचेही आघाडीच्या नगरसेवकांचे म्हणणे आहे. याबाबत आघाडीच्या नेत्यांचे वकिलांशी बोलणी सुरू असून पुढील दोन दिवसांत या निर्णयाविरोधात कोर्टात जाणार असल्याचे राष्ट्रवादीचे नगरसेवक गणेश कोट यांनी सांगितले; मात्र फेब्रुवारी 24 नोव्हेंबर 2009 च्या कोर्टाच्या आदेशाप्रमाणे सत्ताधारी पक्षानंतर आपलाच पक्ष हा सर्वाधिक संख्याबळ असणारा पक्ष असल्यामुळेच विरोधीनेते पदाचे आपणच दावेदार होतो आणि कोर्टाच्या आदेशाप्रमाणेच आपल्याला विरोधी पक्षनेते पद मिळाले असल्याचा दावा मनसे शहरप्रमुख राजेश कदम यांनी केला आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें