शनिवार, 18 दिसंबर 2010

राहुल गांधी बावळट असल्याची राज यांची टीका

राहुल गांधी बावळट असल्याची राज यांची टीका
सकाळ वृत्तसेवा
Sunday, December 19, 2010 AT 12:30 AM (IST)
 

डोंबिवली - हिंदूंना दहशतवादी म्हणणारा राहुल गांधी बावळट आहे, अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राहुल गांधींची खिल्ली उडविली. डोंबिवली जिमखान्यातर्फे आयोजित "उत्सव 2010'च्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते.

या वेळी सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ, आमदार रवींद्र चव्हाण, रमेश पाटील, बाळा नांदगांवकर, सीकेपी बॅंकेचे संचालक श्‍यामराव देशमुख, जिमखान्याचे अध्यक्ष दीपक मेजारी, उत्सवचे अध्यक्ष दिलीप कुडाळकर, सचिव संजना ठाकूर उपस्थित होते. राज ठाकरे म्हणाले, "दहशतवादी म्हणजे काय, याचा राहुल गांधीने कधी अभ्यास केला आहे का? त्याला लष्कर ए तोयबा माहीत आहे का? त्याला लष्कर ए तोयबा विचारला तर गल्लीत खेळलेला "कोयबा'च आठवेल या शब्दात त्यांनी राहुल गांधी यांना हिणविले. कसाब डोंबिवलीतील फडके रोडला राहायचा का? असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला. चार लोकांसमोर बोलण्याची हिंमत नाही म्हणून अमेरिका दूतावासासमोर जाऊन हे वाक्‍य तो बोलला, मात्र खरोखरच बोलला किंवा नाही, हेसुद्धा माहीत नाही. केवळ प्रसिद्धिमाध्यमांनी प्रसिद्ध केले म्हणून त्यावर विश्‍वास ठेवायचा; मात्र त्यांनाही बातमी नीट समजते का? असा टोलाही त्यांनी प्रसिद्धिमाध्यमांना लगावला.

तर आदर्श प्रकरणावर टोला मारताना त्यांनी मोकळ्या मैदानावर सर्वांचे लक्ष असते. त्यामुळे जिमखान्याचे एवढे मोठे मैदान विकू नका. आज उद्योगपती आणि राजकारण्यांचे साटेलोटे असून ते "आदर्श'च्या रूपाने बाहेर पडत असल्याचा चिमटा त्यांनी काढला. राज्य शासनाने ज्या सुविधा नागरिकांना देणे आवश्‍यक आहे, त्या सुविधा आज बिल्डर नागरिकांना देत असल्याचे त्यांनी सांगितले. नवीन वर्षात नवे मुद्दे घेऊन मी तुमच्या भेटीला येईन, असे आश्‍वासन राज ठाकरे यांनी दिले. सिंधुताई सपकाळ यांनी उत्सवला शुभेच्छा देतानाच राज ठाकरे यांना गरुडासारखी झेप घे, आज सारे जग तुझ्याकडे आशेने पाहात आहे. त्यामुळे आभाळभर ओझं घेऊन तुला चालायचे आहे, असे म्हणत त्यांना आशीर्वाद दिला.

जिमखान्याचे हे रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. नऊ दिवस चालणाऱ्या या महोत्सवात एकूण 150 स्टॉल्स आहेत.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें