रविवार, 26 दिसंबर 2010

भारतकुमार राऊत-राजच्या मैत्रीने उद्धव नाराज

भारतकुमार राऊत-राजच्या मैत्रीने उद्धव नाराज
सकाळ वृत्तसेवा
Monday, December 27, 2010 AT 12:15 AM (IST)
 
मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भाजप कार्यालयातील भेटीमुळे युतीमध्ये निर्माण झालेला तणाव निवळला असला, तरीही शिवसेनेचे खासदार भारतकुमार राऊत यांनी थेट राज यांना दिलेल्या निमंत्रणानुसार ते त्यांच्या पुत्राच्या विवाह सोहळ्यास उपस्थित राहिले. या सर्व प्रकारामुळे शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे संतप्त झाले असून भारतकुमार व राज यांच्या पडद्यामागील मैत्रीचा निषेध म्हणून ते शनिवारी राऊत यांच्या पुत्राच्या विवाह सोहळ्यास अनुपस्थित राहिल्याचे समजते.

राज यांनी गेल्या आठवड्यात भाजप कार्यालयाला दिलेल्या भेटीमुळे युतीत तणाव निर्माण झाला होता. भाजचे नेते गोपीनाथ मुंडे यांच्या मध्यस्थीने हा तणाव निवळला; मित्रपक्ष भाजपच्या हरकतींवरून नाराज झालेल्या उद्धव यांनी आपली नाराजी जाहीरपणे बालून दाखविली; पण भारतकुमार यांनी आपल्या मुलाच्या विवाहाचे निमंत्रण थेट राज यांना दिल्याचा मुद्दा पुढे आणत भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी उद्धव यांनाच कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. राज भाजप कार्यालयात आलेले तुम्हाला चालत नाहीत; पण तुमच्या खासदारांनी त्यांना भेटून निमंत्रण दिलेले कसे चालते, असा सवालही भाजपच्या गोटातून उपस्थित करण्यात आला. राजकारणात शिवसेना व मनसे समोरासमोर उभी ठाकली असतानाच आपल्या खासदारांचे हे "मैत्री'पूर्ण वर्तन उद्धव यांना रुचले नाही. आपण समोरासमोर टीका करायची व पुन्हा शिवसेनेचे काही नेते आपल्या जुन्या मैत्रीचे हवाले देणार, या दुटप्पीपणामुळे उद्धव नाराज झाल्याचे समजते. कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या रिंगणात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याविरुद्ध राज यांनी टीका केली होती. "एलआयसी'मध्ये शिवसेनेला टक्कर देण्यासाठी मनसेने युनियन स्थापन करायची, हे दाखले ताजे असतानाच शिवसेनेचे खासदार जुन्या मैत्रीचे हवाले देतात, हा प्रकार त्यांना रुचला नाही. सध्या राजकारणाच्या प्रत्येक वाटेवर शिवसेना व मनसेमध्ये जाहीर संघर्ष सुरू आहे. विशेष म्हणजे मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीच्या महायुद्धात भारतीय विद्यार्थी सेना व मनविसे समोरासमोर उभी ठाकली असतानाच, शिवसेनेच्या खासदाराच्या पुत्राच्या विवाह सोहळ्यास मनसे अध्यक्षांच्या उपस्थितीमुळे कार्यकर्त्यांमध्ये नेमका कुठला संदेश जाणार, याकडेही शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्याने लक्ष वेधले आहे.

राज या सोहळ्यास उपस्थित राहिले होते. म्हणूनच उद्धव "बीकेसी' येथे झालेल्या विवाह सोहळ्यास गेले नाहीत. त्यांच्या भूमिकेचे शिवसेनेतून स्वागत होत असून पडद्यामागून मनसेच्या पदाधिकाऱ्यांशी मैत्री ठेवणाऱ्या शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांना यामुळे चांगलीच चपराक मिळेल, अशी प्रतिक्रिया काही पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें