शनिवार, 28 अगस्त 2010

बेस्टचे खासगीकरण होऊ देणार नाही - राज ठाकरे

बेस्टचे खासगीकरण होऊ देणार नाही - राज ठाकरे
सकाळ वृत्तसेवा
Sunday, August 29, 2010 AT 12:30 AM (IST)

मुंबई - आजकाल उठसूट सर्व सार्वजनिक उपक्रमांच्या खासगीकरणाचे षड्‌यंत्र रचले जात असल्याची टीका करतानाच कोणत्याही परिस्थितीत बेस्टचे खासगीकरण होऊ देणार नाही, अशी ग्वाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज येथे दिली. "महाराष्ट्राच्या, मराठी माणसाच्या हिताचे जे आहे ते मी बोलतच राहणार. काय कारवाई करायची ते करा,' असे आव्हानही त्यांनी राज्य सरकारला दिले.

महाराष्ट्र नवनिर्माण बेस्ट कामगार कर्मचारी सेनेची स्थापना आज राज ठाकरे यांच्या उपस्थितीत झाली. बेस्ट कामगार कर्मचारी सेनेच्या अध्यक्षपदी अविनाश अभ्यंकर यांची, तर बृहन्मुंबई महानगरपालिका कर्मचारी सेनेच्या अध्यक्षपदी दिलीप नाईक यांच्या नियुक्तीची घोषणा राज ठाकरे यांनी या वेळी केली. दोन्ही संघटनांच्या कार्यकारिणीची घोषणा आठडाभरात केली जाईल, असे त्यांनी जाहीर केले.

देशात बेस्टसारखी दुसरी कोणतीही सेवा नाही. ती कर्मचारी-कामगारांमुळे सुरू आहे. या कामगारांना न्याय मिळालाच पाहिजे, असे सांगतानाच, त्यांचे प्रश्‍न मार्गी लागावेत यासाठी ही संघटना काम करील, अशी ग्वाही राज ठाकरे यांनी दिली. आता बेस्टचा प्रश्‍न हाती घेतला आहे. आगामी काळात एअर इंडियामधील कर्मचाऱ्यांचा प्रश्‍नही हाती घेऊ, असे त्यांनी जाहीर केले.

राज्य सरकारने भाषणांसंदर्भात बजावलेल्या नोटिशींचीही राज ठाकरे यांनी खिल्ली उडविली. ""माझ्या घराच्या भिंतीवर सध्या नोटिशींची चित्रं तयार झाली आहेत'', असे सांगून नोटिशीतील उतारे वाचत त्यातील "सरकारी भाषे'ची राज यांनी चेष्टा केली. ""सामान्य माणसाला जे प्रश्‍न भेडसावत आहेत, त्यांच्या मनात ज्याबद्दल राग खदखदत आहे तेच मी बोलतो. लोकांचा राग व्यक्त करत असतो. अशा कितीही नोटिसा बजावल्या तरीही मी महाराष्ट्राच्या, मराठी माणसाच्या हिताचे जे आहे ते बोलतच राहणार. काय कारवाई करायची ती करा,'' असे आव्हान राज यांनी राज्य सरकारला दिले.

""बहुसंख्य टॅक्‍सी-रिक्षावाले लोकांशी उर्मटपणे वागतात, कमी अंतराचे भाडे घेत नाहीत, मी त्याबाबतच बोलतो. कोण माणसे गाड्या चालवत आहेत, हेही सरकारला माहिती नाही. अनेक टॅक्‍सी बेकायदा आहेत. अशा परिस्थितीत बॉम्बस्फोट होणार नाही तर काय,'' असा सवालही राज ठाकरे यांनी केला.

मल्टिप्लेक्‍सच्या विषयावर शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी श्रेय घेण्याचा कथितरीत्या प्रयत्न केला. त्याबद्दल राज ठाकरे यांनी त्यांची खिल्ली उडवली. ""काहीही झाले तरी यांना फक्त हे आमच्यामुळेच झाले एवढेच म्हणता येते,'' असा टोला त्यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता लगावला. या वेळी मनसेचे आमदार बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई आदी उपस्थित होते.

"राज बोले, सरकार हाले'
बेस्ट कामगारांना आता फक्त राज ठाकरे यांचाच आधार वाटत आहे. कारण राज यांनी बोलायचे आणि सरकारने हलायचे, असा प्रकार आता राज्यात सुरू झाला आहे, असे उद्‌गार मनसेचे आमदार प्रवीण दरेकर यांनी या वेळी बोलताना काढले.

गुरुवार, 26 अगस्त 2010

तिकीट दरांवरून राज यांची उद्धववर टीका

तिकीट दरांवरून राज यांची उद्धववर टीका
सकाळ वृत्तसेवा
Thursday, August 26, 2010 AT 12:15 AM (IST)
मुंबई - मराठी चित्रपटांसाठी तिकिटांचे दर कमी झाले तर त्याचा आपणास आनंद आहे; परंतु मराठी माणूस काही दरिद्री नाही किंवा मोठ्या दुःखात आहे असे काही नाही. त्याला चांगले प्रॉडक्‍ट दिले तर तो निश्‍चितच त्याचे स्वागत करतो, असे उद्‌गार काढून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना कार्यकारी अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यावर शरसंधान साधले.

महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचा वर्धापनदिन उद्या (ता. 26) साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्त आज माटुंगा येथील स्टारसिटी मल्टिप्लेक्‍समध्ये "ऐका दाजिबा' या चित्रपटाचा खास शो त्यांच्या पदाधिकाऱ्यांसाठी आयोजित करण्यात आला होता. तो चित्रपट पाहण्यासाठी राज ठाकरे, तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चित्रपट शाखेचे अध्यक्ष अमेय खोपकर, शालिनी ठाकरे, रिटा गुप्ता, संदीप देशपांडे, आमदार नितीन सरदेसाई आदी मंडळीही हजर होती.
पत्रकारांशी बोलताना राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांनी सुचविलेल्या तिकिटांचे दर कमी करण्याच्या मुद्द्याचा खास आपल्या शैलीत समाचार घेतला. ते म्हणाले, की महाराष्ट्रात मराठी माणसांची संख्या जास्त आहे. ते हिंदी चित्रपट पाहतात. हिंदी चित्रपटांचे तिकिटांचे दर त्यांना परवडतात. मग मराठी चित्रपट ते का पाहू शकत नाहीत? मुळात प्रॉडक्‍ट चांगले दिले तर ते निश्‍चितच मराठी चित्रपट पाहतील. त्यातच तिकिटांचे दर कमी झाले तर आपणास आनंद आहे.

मल्टिप्लेक्‍सवाल्यांना काही सवलती हव्या आहेत. त्यांनी त्यांचा शहाणपणा कमी केला पाहिजे, असा सज्जड दमही त्यांनी मल्टिप्लेक्‍सवाल्यांना पुन्हा दिला. मल्टिप्लेक्‍सचे आंदोलन पहिले कुणी सुरू केले ते सर्वांना ठाऊक आहे. त्याबाबतीत आपली कुणाशीही स्पर्धा नाही. मराठी चित्रपट चालले पाहिजेत असे आपले मत आहे. त्यांना प्राईम टाईम दिला गेला पाहिजे. कारण त्याच वेळी प्रेक्षक येतील, असेही ते म्हणाले. नेहमी इंजिन पुढे असते. बाकीचे डबे मागून येत असतात, असे म्हणून त्यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला.

मंगलवार, 24 अगस्त 2010

शिवसेनेपुढे "मनसे'चे कडवे आव्हान

शिवसेनेपुढे "मनसे'चे कडवे आव्हान
सकाळ वृत्तसेवा
Tuesday, August 24, 2010 AT 12:30 AM (IST)

कल्याण - कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीसाठी प्रत्येक पक्ष जोमाने कामाला लागला आहे; परंतु विशेष मेहनत सत्ताधारी शिवसेनेला घ्यावी लागत आहे. कारण शिवसेनेपुढे मनसेचे कडवे आव्हान आहे. त्यासाठी शिवसेनेला सत्ता टिकविण्यासाठी महापालिका निवडणुकीत शर्थीचे प्रयत्न करावे लागणार आहेत. मनसेची जादू रोखणे शिवसेनेपुढे मोठी कसोटी असून त्याला तोंड देण्यासाठी शिवसेनेने रणनीती आखण्यासाठी सुरुवात केली आहे.

कल्याण-डोंबिवली पालिकेच्या 2005 मध्ये पार पडलेल्या निवडणुकीत शिवसेना-भाजपची युती होती. शिवसेनेने 107 पैकी 60 जागा लढविल्या होत्या. त्यांपैकी 29 जागांवर शिवसेनेचे उमेदवार निवडून आले. सहा जागांवर शिवसेना पुरस्कृत सहा नगरसेवक निवडून आले होते. भाजपचे 16 नगरसेवक निवडून आले होते. कल्याण पूर्व-पश्‍चिम भागात शिवसेनेला 20 जागा मिळाल्या होत्या. डोंबिवलीत कमी जागा मिळाल्या होत्या. युतीला अपक्षांची साथ न मिळाल्याने सत्तेचे गणित चुकले होते. या वेळेसही शिवसेना-भाजपची युती होणार, असा सकारात्मक सूर दोन्ही पक्षांच्या पक्षश्रेष्ठींकडून व्यक्त केला जात असला तरी युती अद्याप झालेली नाही. प्रत्येक पक्ष सध्यातरी स्वबळावर निवडणूक लढविण्याची भाषा करीत असल्याने शिवसेना-भाजपही स्वबळाची ताकद जोखण्याची तयारी ठेवून आहे, असे स्थानिक नेतेमंडळींकडून सांगण्यात येत आहे.

अडीच वर्षानंतर कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीची सत्ता उलथवून शिवसेना-भाजप युती पालिकेत सत्तेवर आली; परंतु 2009 मध्ये पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत कल्याण मतदारसंघातून शिवसेनेला विजय मिळाला. त्याच वेळी मनसेला मिळालेली मते लाखापेक्षा जास्त होती. कल्याणचा बुरूज राखण्यात शिवसेनेला यश आले होते. लोकसभेपाठोपाठ सहा महिन्यांनी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत कल्याण पश्‍चिम, कल्याण पूर्व आणि कल्याण ग्रामीण या तिन्ही मतदारसंघांत शिवसेनेच्या उमेदवारांचा दारूण पराभव झाला. विधानसभा निवडणुकीत कल्याणचा बुरूजही ढासळला. पालिकेत सत्ता असूनही शिवसेनेला मिळालेले अपयश प्रकर्षाने सामोरे आले.

मनसेने दोन निवडणुकींत मिळालेल्या मताधिक्‍याच्या जोरावर महापालिका निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून महापालिकेची काळी बाजू मांडणारी आंदोलने करण्याचा सपाटा लावला आहे. कल्याण पश्‍चिमचे आमदार मनसेचे आहेत. त्यांनी दोन अधिवेशनांत कल्याणचे कोणते प्रश्‍न मांडले आणि कोणत्या योजना मंजूर केल्या, असा सवाल शिवसेनेचे नगरसेवक सचिन बासरे यांनी उपस्थित केला आहे. प्रभाग आरक्षणाचा फटका सगळ्यात जास्त शिवसेनेला बसला आहे. प्रस्थापित नगरसेवकांना दुसऱ्या प्रभागात उभे राहावे लागणार आहे.

मनसेचा करिष्मा चालणार नाही!शिवसेनेचे डोंबिवलीचे शहरप्रमुख सदानंद थरवळ यांनी सांगितले की, महापालिका निवडणुकीत मनसेचा करिष्मा चालणार नाही. महापालिका निवडणूक व्यक्तिगत संबंध आणि नगरसेवकांनी केलेल्या कामांच्या जोरावर लढविल्या जातात. कल्याण शहरप्रमुख विजय साळवी यांनी सांगितले की, मनसेची जादू चालणार नाही. शाखाप्रमुखांच्या बैठका घेऊन चाचपणी केली गेली आहे. युती झाल्यानंतरच उमेदवारांच्या मुलाखतींचा कार्यक्रम होणार आहे.

सोमवार, 23 अगस्त 2010

राज-उद्धव एकत्रीकरणासाठी मूक मोर्चा काढणार

राज-उद्धव एकत्रीकरणासाठी मूक मोर्चा काढणार
सकाळ वृत्तसेवा
Tuesday, August 24, 2010 AT 12:30 AM (IST)
गोविंद येतयेकर - सकाळ वृत्तसेवामुंबई - मराठी अस्मितेचा लढा आपापल्या झेंड्याखाली स्वतंत्रपणे लढणारे शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आता एकाच झेंड्याखाली एकत्र येऊन एकजुटीने व ताकदीने उभे राहावे, यासाठी "ठाकरे जोडो अभियाना'मार्फत आता थेट "मातोश्री' व "कृष्णकुंज'च्या दारी मराठी जनांचा मूक मोर्चा नेण्यात येणार आहे.

उद्धव व राज ठाकरे यांनी एकत्र यावे, या एकाच ध्यासापोटी "माझी चळवळ मी महाराष्ट्राचा' या माध्यमातून वरळी येथील काही ज्येष्ठ शिवसैनिकांनी एकत्र येऊन 16 मे रोजी या चळवळीची मुहूर्तमेढ रोवली. या चळवळीचा पुढील अध्याय सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. त्यात आता या चळवळीतील ज्येष्ठ शिवसैनिक थेट कृष्णकुंज व मातोश्री निवासस्थानी दाद मागणार आहेत.

येत्या 5 सप्टेंबर रोजी या चळवळीचे प्रणेते हजारो मराठी माणसांच्या साक्षीने शिवाजी पार्क येथील मॉंसाहेब स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या अर्धपुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या मोहिमेस प्रारंभ करणार आहेत. शिवाजी पार्क येथून निघालेला हा मराठीजनसमूह राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी पोहोचेल. हा मोर्चा मूक असेल. यामध्ये कुठलाही झेंडा, बॅनर वा घोषणा नसतील. फक्त शिवसेनाप्रमुख यांच्या बाजूला बसलेले राज व उद्धव यांचे ऐतिहासिक छायाचित्र असलेले होर्डिंग या मोर्चात फडकविण्यात येईल.

कृष्णकुंज निवासस्थानी राज ठाकरे यांनी आमचे म्हणजेच मराठी माणसांच्या मतांचे लेखी निवेदन स्वीकारावे, हीच आमची अपेक्षा आहे. त्यानंतर आमचा मूक मोर्चा मातोश्री निवासस्थानी जाणार आहे. मातोश्री निवासस्थानी उद्धव ठाकरे यांनीही या मोर्चाशी संवाद साधावा, एवढीच आमची अपेक्षा आहे, असे चळवळीचे संस्थापक सतीश वळंजू यांनी सांगितले.

राज ठाकरेंपेक्षा चांगली समाजसेवा करीन

राज ठाकरेंपेक्षा चांगली समाजसेवा करीन
सकाळ वृत्तसेवा
Tuesday, August 24, 2010 AT 12:30 AM (IST)

मुंबई - मुंबईतील वाढते लोंढे कसे थांबवायचे यावर राज ठाकरे यांच्यापेक्षा आपल्याकडे चांगला उपाय आहे. मी राज ठाकरे यांच्यापेक्षा चांगली समाजसेवा करू शकते, असा दावा राखी सावंतने केला आहे.

'इमॅजिन' या वाहिनीवर "राखी का इन्साफ' हा एक आगळावेगळा कार्यक्रम येत आहे. त्याचे सूत्रसंचालन राखी सावंतच करीत आहे. समाजातील विविध वाद आणि समस्या सोडविण्यासाठी हे एक व्यासपीठ आहे. यामध्ये विविध विषय हाताळले जाणार आहेत. या कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी आज अंधेरी येथे एका पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी राखी सावंतला "मुंबईतील वाढते लोंढे...' या विषयाला तू या कार्यक्रमात प्राधान्य देणार का, असा प्रश्‍न केला असता क्षणाचाही विलंब न लावता तिने आमचे मित्र राज ठाकरे यांच्यापेक्षा आपल्याकडे या समस्येवर चांगला उपाय आहे, असे सांगितले. ती पुढे म्हणाली, 'आपण या कार्यक्रमात सहभागी झालो आहोत ती कुणाचे मन तोडण्यासाठी नाही तर तुटलेली मने जोडण्यासाठी येथे आलो आहोत. यामध्ये विविध समस्या सोडविल्या जाणार आहेत किंवा त्यावर उपाययोजना सांगितली जाणार आहे. आपण याकरिता कोणत्याही प्रकारचा अभ्यास केलेला नाही किंवा करण्याची आपणास गरज भासत नाही. सर्व काही समोर आले की आपण त्यावर तोडगा सुचवू, असेही ती म्हणाली. आपल्या आयुष्यातदेखील बऱ्याच समस्या आल्या होत्या. त्याला आपण सामोरे गेलो आहोत. परंतु या कार्यक्रमात आपण इतरांच्या समस्या सोडविण्यासाठी आलो आहोत, असे तिने सांगितले.

छोट्या पडद्यावर अमिताभ बच्चन, प्रियांका चोप्रा आणि सलमान खान यांचे कार्यक्रम सुरू होत आहेत. त्यामुळे त्यांच्यासमोर तुझा निभाव कसा लागेल, या प्रश्‍नावर तिने "ते वाघ आहेत. त्यामुळे आपली काही त्यांच्याशी स्पर्धा नाही. आपण आपल्या पद्धतीने काम करणार आहोत,' असे उत्तर तिने दिले.