मंगलवार, 11 जनवरी 2011

'राज'च्या सभेवर पोलिसांच्या 200 कॅमेऱ्यांची नजर

'राज'च्या सभेवर पोलिसांच्या 200 कॅमेऱ्यांची नजर
सकाळ वृत्तसेवा
Wednesday, January 12, 2011 AT 12:15 AM (IST)

औरंगाबाद - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आमदार हर्षवर्धन जाधव यांना पोलिसांनी केलेल्या मारहाणीचा निषेध करण्यासाठी बुधवारी (ता. 12) आयोजित केलेल्या सभेसाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. त्याशिवाय अत्याधुनिक तंत्राचा वापर करून या सभेवर नजर ठेवण्याचीही तयारी पोलिसांनी केली आहे. त्यासाठी मराठवाड्यातून दोनशे व्हिडिओ कॅमेरे मागविण्यात आले आहेत.

ही सभा बुधवारी (ता. 12) संध्याकाळी साडेपाच वाजता मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर होणार आहे. या सभेला पोलिसांनी परवानगी देताना काही अटी घातल्या आहेत. त्यामध्ये भावना दुखावतील किंवा प्रक्षोभ होईल, असे वक्तव्य केल्यास प्रमुख वक्‍त्यासह आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात येईल, अशा स्वरूपाच्या अटी आहेत. त्याचप्रमाणे ही सभा वेळेवर सुरू व्हावी आणि वेळेवर संपवावी, अशीही अट घातली आहे. या सभेसाठी बाहेरच्या जिल्ह्यांतून कार्यकर्ते येणार असल्याने शहरात येणाऱ्या प्रत्येक मार्गावर तपासणी केली जाणार आहे. तर वाहनांचे व्हिडिओ शूटिंगही केले जाणार आहे. शहरातील प्रमुख चौकांसह सभेच्या ठिकाणी मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला असल्याची माहिती सिटी चौक पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक खुशालचंद बाहेती यांनी दिली.

या बंदोबस्तात राज्य राखीव पोलिस दलाचे जवान, शीघ्र कृती दल, दंगा काबूचे पथक, "एसआरपीएफ'च्या दोन कंपन्या; तसेच वज्र आणि पाण्याचा मारा करणाऱ्या वाहनांनाही तैनात करण्यात आले आहे. शहर पोलिसांच्या मदतीला बीड, जालना, उस्मानाबाद येथून पोलिस कुमक मागविण्यात आली आहे. शहराबाहेरून येणाऱ्या कार्यकर्त्यांना ओळखणाऱ्या त्या-त्या शहराचे विशेष शाखेचे पोलिस कर्मचारीही शहरात दाखल झाले आहेत. शहरात येणाऱ्या प्रत्येक मार्गावर पोलिस तैनात करण्यात आले आहेत. प्रत्येक वाहनांचे व्हिडिओ शूटिंग केले जाणार आहे. त्यामध्ये येणाऱ्या कार्यकर्त्यांना ओळखता येईल, या पद्धतीने शूटिंग करण्याचा आदेशही देण्यात आला आहे. तर शहरात 60 ठिकाणी फिक्‍स पॉइंट लावण्यात आले आहेत. प्रत्येक पॉइंटवर सभेला जाणाऱ्यांची शूटिंग केली जाणार आहे. सभेच्या ठिकाणीदेखील मोठ्या प्रमाणावर कॅमेऱ्यांचा वापर करून शूटिंग करणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक बाहेती यांनी दिली. सभा आटोपल्यावर काही अनुचित प्रकार करताना कोणी आढळलयास त्या ठिकाणी कलर सोडणाऱ्या "डाय गॅस'चा वापर करण्यात येणार आहे.

'डाय गॅस'चा वापर करणारराज ठाकरेंच्या सभेत पहिल्यांदाच "डाय गॅस'चा वापर केला जाणार आहे. जर या सभेत किंवा सभेनंतर जर गोंधळ झाला तर पोलिस ज्याप्रमाणे अश्रुधुराचा वापर करतात, त्याच पद्धतीने या "डाय गॅस'चा वापर करणार आहेत. या गॅसमधून रंग बाहेर पडतो, तो रंग होळीच्या रंगाप्रमाणे अंगाला लागतो. एकदा हा रंग लागला, की तो पंधरा दिवस तरी निघत नाही. त्यामुळे नंतर गुन्हे दाखल करण्यासाठी किंवा गोंधळ घालणाऱ्यांना पकडण्यासाठी ही पद्धत वापरली जाते. त्याचा वापर या सभेसाठी पहिल्यांदा औरंगाबादेत केला जात आहे

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें