गुरुवार, 6 जनवरी 2011

आमदार जाधव यांना मारहाण करणाऱ्या पोलिसांवर कारवाईची मागणी


Bookmark and SharePrintE-mail
औरंगाबाद, ६ जानेवारी/खास प्रतिनिधी
कन्नडचे मनसेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांना पोलीस अधिकाऱ्यांनी गुंडासारखी मारहाण केली आहे. दंडुकशाही दाखविणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करा, अशी मागणी मनसेचे गटनेते आमदार बाळ नांदगावकर यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे केली आहे.
बुधवारी हर्षवर्धन जाधव यांना मारहाण करण्यात आली होती. या पाश्र्वभूमीवर मनसेचे शिष्टमंडळ गुरुवारी सकाळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना सुभेदारी विश्रामगृहावर भेटले. या शिष्टमंडळात आमदार नितीन सरदेसाई, मराठवाडा संपर्क नेते अतुल सरपोतदार, जिल्हाध्यक्ष भास्कर गाडेकर, डॉ. सुनील शिंदे, सुमीत खांबेकर आदी उपस्थित होते. मनसेच्या शिष्टमंडळाने औरंगाबादचे ग्रामीण पोलीस अधीक्षक मनोज लोहिया यांचीही भेट घेतली. या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल, असे आश्वासन मनोज लोहिया यांनी या शिष्टमंडळाला दिले आहे.
हर्षवर्धन जाधव यांना खुलताबाद येथे पोलीस उपनिरीक्षक एस. डी. कोकणे यांच्यासह ४० ते ५० पोलीस कर्मचाऱ्यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीमुळे हर्षवर्धन जाधव यांना नीट उभे राहून चालताही येत नव्हते. आमदारांना झालेली मारहाण निषेधार्ह असल्याचे बाळ नांदगावकर म्हणाले. असा काय गुन्हा केला होता जेणेकरून या पोलीस अधिकाऱ्यांनी आमदार जाधव यांना गुंडासारखी मारहाण केली. मुख्यमंत्री चव्हाण हे संवेदनशील आहेत. ते नक्की या प्रकरणात न्याय देतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
मुख्यमंत्र्यांना या मारहाणीचे छायाचित्रे दाखविण्यात आली. त्या वेळी मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात पोलिसांनी ‘थर्ड डिग्री’चा वापर केला आहे असे म्हटल्याचे नांदगावकर यांनी सांगितले. २००९ मध्ये कन्नडमध्ये अवैध वाहतूक, मटका या विरोधात आमदार हर्षवर्धन जाधव यांनी आवाज उठविला होता. त्या वेळी पोलीस उपनिरीक्षक एस. डी. कोकणे हे कन्नडमध्ये कार्यरत होते. याचा राग म्हणून त्यांनी आमदार जाधव यांना मारहाण करून वचपा काढला, असा आरोपही बाळ नांदगावकर यांनी केला. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्या वेळी कन्नडच्या या पोलीस उपनिरीक्षकांची बदली करा म्हणून तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्याकडे तक्रारही केली होती.
आमदार जाधव यांची काय चूक होती. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ते मुख्यमंत्र्यांना भेटायला चालले होते. तरीही पोलिसांनी दंडुकशाहीचा अवलंब करून आमदार जाधव यांना बेदम मारहाण केली, असे बाळ नांदगावकर म्हणाले. राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्यावर आमचा विश्वास नाही. ते त्यांच्या दलातील कर्मचारी व अधिकाऱ्यांवर कारवाई करतील अशी त्यांच्याकडून आमची अपेक्षा नाही; त्यामुळेच संवेदनशील असलेल्या मुख्यमंत्र्यांकडे आम्ही दाद मागितली आहे. या प्रश्नावर विधानसभेतही आवाज उठविला जाईल. पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली आहे. वेळ पडली तर न्यायालयातही धाव घेऊ तसेच मानव अधिकार आयोगाकडे दाद मागू, असेही मनसेच्या नेत्यांनी सांगितले.
सध्या आमदार हर्षवर्धन जाधव हे येथील खासगी इस्पितळात उपचार घेत आहेत. त्यांचे सासरे आणि जालन्याचे भारतीय जनता पक्षाचे खासदार रावसाहेब दानवे यांनी रुग्णालयात जाऊन जाधव यांच्या प्रकृतीची विचापूस केली.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें