रविवार, 13 फ़रवरी 2011

सातारा-'मनसे जिल्हाध्यक्षांवरील गुन्हा मागे घ्या'

सातारा-'मनसे जिल्हाध्यक्षांवरील गुन्हा मागे घ्या'
सकाळ वृत्तसेवा
Sunday, February 13, 2011 AT 02:47 PM (IST)
 

सातारा : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना लक्ष्य करून त्यांच्यावर चुकीच्या तक्रारीवरून खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. मनसेचे माढा जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांच्यावरील गुन्हा शुक्रवारपर्यंत माघार घ्यावा, अन्यथा तालुकानिहाय आंदोलने केली जातील. तसेच कार्यकर्ते जेलभरो आंदोलन करतील असा इशारा साताऱ्याचे जिल्हाध्यक्ष रणजितसिंह भोसले यांनी आज (रविवारी) येथे पत्रकार परिषदेत दिला.

सामाजिक कार्यातून जिल्ह्यात मनसे लोकांपर्यंत पोचली आहे. बेकायदेशीर कृत्यांना आळा घालण्यासाठी व जनतेचे प्रश्‍न सोडविण्यासाठी पक्षाचे कार्यकर्ते लोकशाही पध्दतीने आंदोलन करीत आहेत, असे सांगून श्री. भोसले म्हणाले, खटावचे तालुकाध्यक्ष संदीप गोडसे यांनी वडूज येथील बांधकाम विभागाचे अधिकारी श्री. पुदाले यांच्या भ्रष्ट कारभाराबद्दल आंदोलने केली. अतिक्रमण प्रश्‍नावर गोडसेंना जाणीवपूर्वक अडविण्याचा प्रयत्न केला. सध्या चोरीच्या गुन्हा दाखल करून त्यांना तुरूंगात ठेवले आहे. माढा मतदारसंघाचे अध्यक्ष धैर्यशील पाटील यांना खोट्या तक्रारीवरून दरोड्याच्या गुन्ह्यात अडकविण्यात आले आहे. त्यांच्यावरील गुन्हे येत्या शुक्रवारपर्यंत मागे घ्यावेत. अन्यथा तालुकानिहाय आंदोलन केले जाईल. तसेच सर्व कार्यकर्ते जेलभरो आंदोलन करतील, असा इशारा त्यांनी दिला आहे. तसेच जिल्ह्यात पवनचक्‍क्‍या कंपन्या व बोगस इन्शुरन्स कंपन्यांच्या विरोधात आम्ही आक्रमक भुमिका घेतली आहे. असे असताना कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल कयन त्यांचे खच्चीकरण करण्याचे काम होत आहे. यासंदर्भात मनसेच्या १३ आमदारांचे गटनेते आमदार बाळ नांदगांवकर यांनी पालकमंत्री व पोलिस अधीक्षक यांना पत्राव्दारे कळविले आहे. आगामी अधिवेशनात याबाबत मनसेचे आमदार प्रश्‍न उपस्थित करणार आहेत. आगामी काळात पालकमंत्री रामराजे नाईक निंबाळकर यांना पक्षाचे पदाधिकारी भेटणार आहेत.

यावेळी शांताराम कारंडे, कऱ्हाड पाटण जिल्हाध्यक्ष विकास पवार, विद्यार्थी सेनेचे युवराज पवार, फिलिप भांबळ, नगरसेवक दादा शिंगण, आर. एल. सावंत, वाई उपजिल्हाप्रमुख मयूर नळ, सातारचे प्रशांत शिंदे, कऱ्हाडचे राजेंद्र केंजळे, महेश जगताप, किशोर भिंगाडे, बंटी माने आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें