शनिवार, 26 फ़रवरी 2011

मराठी दिनाच्या पूर्वसंध्येला मनसेची कुसुमाग्रज उद्यानात ‘चकाचक’ गांधीगिरी

मराठी दिनाच्या पूर्वसंध्येला मनसेची

कुसुमाग्रज उद्यानात ‘चकाचक’ गांधीगिरी
 नाशिक, २६ फेब्रुवारी / प्रतिनिधी

तात्यासाहेब शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांचा जन्मदिन अर्थात मराठी दिनाच्या पाश्र्वभूमीवर, कविवर्य कुसुमाग्रज काव्य उद्यानात मनसेने स्वच्छता मोहीम राबवून गांधीगिरी स्टाईलने आंदोलन केले. तसेच या उद्यानाच्या सौदर्यकरणासाठी मनसेचे विधानसभेतील उपगटनेते आ. वसंत गीते यांनी दहा लाख रूपयांचा निधी आमदार निधीतून उपलब्ध करून दिला आहे. दरम्यान, कुसुमाग्रज जन्मशताब्दी वर्षांनिमित्त, शहरात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कुसुमाग्रजांच्या नाशकात नाशिक महापालिकेने निर्मिलेले उद्यान सध्या अत्यंत दुर्लक्षित आहे. त्यामुळे ठिकठिकाणी कचऱ्याचे मोठय़ा प्रमाणावर ढिग साचलेले होते. यामुळे मनसेने गांधीगिरी स्टाईलने आंदोलन करून केरकचरा, मातीचे ढिग, पालापाचोळा साफ केला. मनसेचे जिल्हाध्यक्ष सचिन ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी संपूर्ण उद्यान परिसरासह व कोनशिला पाण्याने धुवून काढण्यात आली.
 झाडांना पाणी देण्यात आले. कुसुमाग्रजांच्या प्रतिमेचे तसेच कोनशिलेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. मनसेचे आ. गीते यांनी उद्यानासाठी उपलब्ध करून दिलेल्या निधीतून या कामाचे प्राकलन त्वरित काढण्याचे निर्देश पालिकेस दिले आहेत. याप्रसंगी अनील वाघ, समीर शेटे, संजय दंडगव्हाळ, नंदू वराडे आदी उपस्थित होते.
कुसुमाग्रज जन्मशताब्दी
पेठे विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांच्यावतीने कुसुमाग्रजांच्या जन्मशताब्दीनिमित्त रविवारी सकाळी ९ वाजता वेळूंजे येथील आदिवासी भागातील आश्रमशाळेत तात्यासाहेबांच्या कविता वाचन, गीत गायन, कुसुमाग्रजांच्या आठवणी, आश्रमशाळेस कुसुमाग्रजांची पुस्तके भेट देणे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कुसुमाग्रजांचे आदिवासी भागावर अधिक प्रेम असल्याने माजी विद्यार्थ्यांनी जन्मशताब्दीचा पहिला कार्यक्रम खास करून नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या वेळुंजे आश्रमशाळेत आयोजित केला आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें