शनिवार, 11 जून 2011

...आणि माझ्यासाठी तुम्ही रडणार!

...आणि माझ्यासाठी तुम्ही रडणार!
सकाळ वृत्तसेवा
Sunday, June 12, 2011 AT 03:30 AM (IST)
 
खडकवासला - ""माणूस जन्माला आला की रडत येतो. इतर सर्वजण मात्र हसत असतात. मी मतदारसंघात अशी विकासकामे करणार की सुखासमाधानाने हसत मरणाला सामोरा जाईल आणि तुम्ही मात्र... माझ्या अंत्ययात्रेच्या वेळी माझ्यासाठी रडत असाल...!'' आमदार रमेश वांजळे यांच्या अनेक भाषणांत हे वाक्‍य हमखास असायचे. याचाच प्रत्यय शनिवारी त्यांच्या अत्यंयात्रेवेळी सर्वांना येत होता.

आमदार वांजळे यांच्या मृत्यूची वार्ता कळल्यानंतर सर्व मतदारसंघच शोकाकुल झाला. अंत्ययात्रेची तयारी रात्रीच सुरू झाली. पाऊस असल्याने रस्त्यावर मांडव टाकण्यात आला होता. पोलिसांचाही मोठा बंदोबस्त होता. धायरी फाटा चौक ते महामार्गावरील उड्डाणपुलापर्यंत रस्ता पूर्ण मोकळा करण्यात आला होता. पानशेतहून येणारी वाहतूक नांदेड फाटा येथून धायरीमार्गे वळविण्यात आली होती; तसेच शहरातून पानशेतकडे जाणारी वाहतूक महामार्गावरून नऱ्हे-धायरीमार्गे वळविली होती. कालव्याच्या रस्त्यावरूनही वाहतूक वळविण्यात आली होती.

सकाळी सात वाजता आमदार वांजळे यांचे पार्थिव त्यांच्या वडगाव खुर्द (धायरी फाटा) येथील घरी आणण्यात आले. त्यानंतर "आपल्या रमेशभाऊंचे' दर्शन घेण्यासाठी हजारोंच्या संख्येने आलेल्या लोकांची रीघ लागली होती. भाऊंना अचानक असे काय झाले, अशीच भावना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर होती.

कार्यकर्त्यांनी पहाटेपासूनच गर्दी केली होती. भजनही सुरू होते. या वेळी विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी अंत्यदर्शन घेतले.

दरम्यान, सर्व बाजूंनी "मनसे'चे झेंडे लावलेला ट्रक अंत्ययात्रेसाठी फुलांनी सजविण्यात आला होता. सकाळी सव्वा दहा वाजता अंत्ययात्रेला सुरवात झाली. "आमदार रमेश वांजळे अमर रहे'च्या घोषणांनी परिसर दणाणत होता. महामार्गावरील उड्डाणपुलाजवळ अंत्ययात्रा आली, त्यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, त्यांच्या पत्नी शर्मिला, आमदार बाळा नांदगावकर, नितीन देसाई आणि अन्य नेत्यांनी पुष्पहार अर्पण करून अंत्यदर्शन घेतले. अंत्ययात्रेच्या सुरवातीला भाजपचे आमदार गिरीश बापट, शहराध्यक्ष प्रा. विकास मठकरी यांनीही दर्शन घेतले.

आघातामुळे फुटला अश्रूंचा बांध
वांजळे यांच्या पत्नी हर्षदा यांना या घटनेचा प्रचंड धक्का बसला होता. डोळ्यांतून ओघळणाऱ्या अश्रूंशिवाय त्यांच्या तोंडातून शब्दच फुटत नव्हते. मुलांचीही अवस्था फारशी वेगळी नव्हती. पतीच्या आकस्मिक निधनामुळे झालेला आघात हर्षदा यांच्या हंबरड्यातून उमटत होता. त्या वेळी उपस्थितांचेही डोळे पाणावत होते. शनिवारी सायंकाळी त्यांना भेटण्यासाठी आलेल्या अनेक मान्यवरांचे सांत्वनाचे दोन शब्द ऐकतानाही त्यांची अश्रुधारा अखंड वाहत होत्या.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें