मंगलवार, 9 अगस्त 2011

'मनसे'ला युतीत आणायला मोदींचे 'मन'से प्रयत्न

'मनसे'ला युतीत आणायला मोदींचे 'मन'से प्रयत्न
गोविंद घोळवे : सकाळ वृत्तसेवा
Tuesday, August 09, 2011 AT 11:57 AM (IST)
 

मुंबई- राज ठाकरेंच्या पाठिंब्याशिवाय महाराष्ट्रात युती राज येणे असंभव असल्याची जाणीव भाजप आणि शिवसेनेच्या नेते मंडळींना आहे. भाऊबंदकीत कोण पडणार, या भीतीपोटी आजतागायत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबरोबर घरोबा करण्यासाठी कोणी आक्रमक प्रयत्न केलेले नाहीत. मात्र, गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी आता मनसेला बरोबर घेण्यासाठी मनापासून प्रयत्न सुरू केले असल्याने भविष्यात आजचे कट्टर शत्रू उद्याचे मित्र होऊ शकतात.

शिवसेना कार्याध्यक्षपदी उद्धव ठाकरे यांची नियुक्‍ती झाल्यानंतर शिवसेनेची महाराष्ट्र विधानसभेतील मुलूख मैदान तोफ असणारे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेला अखेरचा "जय महाराष्ट्र' केला. त्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची कार्यशैली लाभलेले राज ठाकरेंनी "विठ्ठल सध्या बडव्यांच्या ताब्यात आहे,' असे म्हणत शिवसेनेला "जय महाराष्ट्र' केल्यामुळे महाराष्ट्राचा हा विरोधी पक्ष अत्यंत कमकुवत झाला होता. त्यामुळे शिवसेनेत एकच खळबळ उडाली होती. कार्यकर्त्यांना कोणता झेंडा हाती घ्यावा, हे कळत नव्हते.

मागील विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांच्या पक्षाला काही जागा सोडून सेना-भाजपबरोबर घ्यावे, असा प्रयत्न भाजप नेते मंडळींकडून केला गेला. कधी भाजप अध्यक्ष नितीन गडकरी यांनी, तर कधी खासदार गोपीनाथ मुंडेंनी प्रयत्न केले. मात्र, शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरेंनी सर्वांची मागणी फेटाळून लावली. उलट पुन्हा असा विषय उपस्थित केला तर खबरदार म्हणत वेळप्रसंगी युती तोडू, असा इशारा दिला होता. त्यामुळे कोणी मनसेला सोबत घेण्याचे नावही काढत नव्हते. या निवडणुकांमध्ये मनसेने मुंबई, नाशिक, ठाणे व पुणे शहरात आपले चांगले खाते उघडून १३ आमदार निवडून आणले. त्यानंतरच मनसेचा प्रभाव व ताकद सर्व पक्षांना कळली; परंतु सेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांना कोण विनंती करणार? असा प्रश्‍न भाजप नेतृत्वाला पडला होता.
खा. मुंडे यांनी आपण मनसेला आगामी काळात बरोबर घेण्याचा प्रयत्न करू, राजकारणात काहीही असंभव नसते. आजचा शत्रू उद्याचा मित्र होऊ शकतो. यामुळे "नथिंग इज इम्पॉसिबल' असे ठणकावून सांगितले होते; परंतु त्यांच्या वक्‍तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचंड गोंधळ उडाला होता. सेना-भाजप युती तुटणार अशी शक्‍यता निर्माण झाली होती. मात्र, सेना कार्याध्यक्षांनी हे खा. मुंडे यांचे व्यक्तिगत मत असल्याचे सांगत "नो-कॉमेन्ट्‌स', अशी संयमी आणि शांत भूमिका घेतली होती.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघापासून भाजपच्या सर्व वरिष्ठ नेते मंडळींनी मनसेला सहकार्याची भूमिका घ्या, अशी गळ सेना नेतृत्वाला घातली होती; परंतु सेनेची भूमिका बदलण्यात भाजप नेतृत्वाला अद्याप यश आलेले नाही. मात्र, शेवटचा प्रयत्न म्हणून गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी गेल्या तीन दिवसांपासून गुजरातच्या दौऱ्यावर असणारे मनसेप्रमुख राज ठाकरे यांची बडदास्त एखाद्या अतिमहत्त्वाच्या व्यक्‍तीसारखी ठेवली असून दहा टक्‍के गुजरात प्रशासन राज यांच्या सेवेला पाठविले आहे.

राज्यात दोन्ही कॉंग्रेस पक्षांच्या आघाडीचे सरकार आहे; परंतु दोघेही पाच वर्ष एकमेकांना संपविण्याची भाषा बोलतात. अनेक विकास प्रकल्पांना थांबवून एकमेकांवर कुरघोडी करतात. मात्र सत्ता वाटून घेतात, असे आता दस्तुरखुद्द सेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनीच पिंपरी-चिंचवड दौऱ्यात सांगितले आहे. हाच धागा पकडून आता मोदी पुन्हा एकदा राज्यात युतीचेच राज आणण्यासाठी दोघा भावांना एकत्र आणण्यासाठी मनापासून प्रयत्न करीत असल्याचे विश्‍वसनीय वृत्त आहे. भाजप वर्तुळातही अशी चर्चा होत आहे.

यासंदर्भात विधानसभेतील शिवसेना गटनेते आमदार सुभाष देसाई यांच्याशी संपर्क साधला असता आपल्याला अशी शक्‍यता वाटत नसल्याचे त्यांनी सांगितले. ""लोक अनेक राज्यात पर्यटनासाठी दौरे करीत असतात, तसा हादेखील एक दौरा असू शकतो,'' अशी प्रतिक्रिया देसाई यांनी "सकाळ'शी बोलताना व्यक्‍त केली.

नितीशकुमार नाराज
नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये राज ठाकरे यांचे केलेले स्वागत पाहता बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार मात्र भाजपवर प्रचंड नाराज आहेत. यासंदर्भात संयुक्त जनता दलाचे प्रमुख शरद यादव हे राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे अध्यक्ष लालकृष्ण अडवानी यांच्याशी चर्चा करणार असल्याचे समजते

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें