शुक्रवार, 16 सितंबर 2011

सत्ता शिवसेनेची, कंट्रोल राज ठाकरेंचा!

सत्ता शिवसेनेची, कंट्रोल राज ठाकरेंचा! सुनील जावडेकर ठाणे - कल्याण-डोंबिवली महापालिकेत सारी मोट बांधून शिवसेनेने मनसेकडे जाणारी सत्ता खेचून आणली असताना प्रत्यक्षात पालिका कारभारावर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचाच कंट्रोल जाणवतो. त्यामुळे कल्याण, डोंबिवलीसह ठाण्यातील शिवसैनिकही संभ्रमात पडले आहेत. शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा राज ठाकरेच कल्याण-डोंबिवलीतील विकासकामांमध्ये अधिक स्वारस्य दाखवू लागल्याने शिवसैनिकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेची निवडणूक शिवसेना आणि कॉंग्रेस आघाडीतील भांडणापेक्षा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातील प्रतिष्ठेच्या लढाईमुळे गाजली होती. शिवसेनेचे 32; तर मनसेचे 28 उमेदवार विजयी झाले. किमान 15 ते 20 जागांवर मनसेचे उमेदवार अत्यंत थोड्या मतांनी पराभूत झाले; अन्यथा राज यांच्या करिष्म्यामुळे मनसेचे किमान 40 नगरसेवक सहज निवडून आल्यात जमा होते. त्यामुळे अखेर शिवसेनेचा महापौर झाला आणि मनसेला विरोधी पक्षनेतेपद बहाल करण्यात आले. सत्ता मिळाली नसली, तरी विरोधी पक्षात बसलेल्या राज ठाकरे यांनी विकासकामांच्या पाहणीच्या निमित्ताने, तर कधी रस्त्यांच्या दुरवस्थेची पाहणी करण्याच्या निमित्ताने कल्याण-डोंबिवली महापालिकेवरील त्यांची पकड अधिक मजबूत करण्यास सुरवात केली आहे. उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा राज कल्याण-डोंबिवलीतील विकासकामांमध्ये अधिक लक्ष घालत असल्याने आणि पालिका आयुक्तांसह प्रशासनाला आदेश देत असल्याने शिवसैनिक बुचकळ्यात पडले आहेत. आतापर्यंत कल्याण, डोबिवलीच्या इतिहासात पालिकेतील विरोधी पक्षाचा कोणताही पक्षप्रमुख इतक्‍या वेळा विकासकामांबाबत महापालिकेत आलेला नाही. मुळात विरोधी पक्षाने त्यांचे अस्तित्व कधी दाखवू दिले नाही; पण राज ठाकरे यांच्या वाढत्या भेटींनी शिवसैनिकांची झोप उडवली आहे. आर्थिक आणि धोरणात्मक निर्णयांमध्ये राज ठाकरे यांचा शब्द कल्याण-डोंबिवलीत अंतिम मानला जाऊ लागला आहे; तर शिवसेना-भाजप युतीची सत्ता असलेल्या पालिकेवर कंट्रोल राज ठाकरे यांचाच चालत असल्याची उघड भावना शिवसैनिकांमध्ये तसेच कॉंग्रेस, राष्ट्रवादीत व्यक्त होऊ लागली आहे

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें