शनिवार, 22 अक्तूबर 2011

दोन्ही कॉंग्रेस स्वबळावर, तर भाजप मनसेबरोबर

दोन्ही कॉंग्रेस स्वबळावर, तर भाजप मनसेबरोबर गोविंद घोळवे : सकाळ वृत्तसेवा Sunday, October 23, 2011 AT 04:30 AM (IST) मुंबई/पुणे - स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे. आतापर्यंतच्या घडामोडींवरून कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस स्वबळावर निवडणुकांना सामोरे जातील, असे दिसते आहे, तर दुसरीकडे भारतीय जनता पक्षातील एक गट महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत युतीसाठी प्रयत्न करीत आहे. मात्र, भाजपच्या या प्रयत्नांना शिवसेनेकडून साथ मिळालेली नाही. पुणे ः खडकवासला पोटनिवडणुकीतील विजय हा "मनसे'मुळे झाल्याची खात्री भाजप-शिवसेना युतीतील नेतृत्वाला पटली आहे. मात्र, उघड बोलून शिवसेनेची नाराजी स्वीकारण्यापेक्षा गप्प बसणे बरे, अशी भूमिका भाजप नेतृत्वाने घेतली आहे. त्याच वेळी, मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर, औरंगाबाद व पिंपरी-चिंचवड महापालिकेत युतीला सत्ता मिळवायची असेल तर मनसेला बरोबर घेण्याशिवाय पर्याय नाही, असेही भाजपला वाटत आहे. "राज्यातील आघाडीची सत्ता राज ठाकरेंमुळे गेली. मुंबई महापालिकाही हातातून जाऊ शकते. भविष्यात अशीच परिस्थिती राहिली तर आपण केवळ विरोधी पक्षनेता कोणाचा, यासाठी भांडत राहायचे काय,' असा सवाल युतीतीलच काही नेते करीत आहेत. "आम्हास उघडपणे याविषयी बोलता येत नाही,' अशी भावना शनिवारी अनेक नेत्यांनी "सकाळ'शी बोलताना व्यक्‍त केली. "ज्यांना एकत्र येता येत नाही त्यांना महाराष्ट्राचे सरकार काय चालविता येईल,' असा शाब्दिक हल्ला दोन्ही कॉंग्रेसने चढविला होता. तरीही दोन्ही ठाकरे बंधूंची एकमेकांबद्दल चांगली प्रतिक्रिया नाही. या पार्श्‍वभूमीवर, दोघांना एकत्र आणण्याचा प्रयत्न भाजप करणार असल्याचे बोलले जात आहे. रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले युतीला भेटल्यामुळे भविष्यात मनसेची आपल्याला गरज नाही, अशी भूमिका शिवसेनेने घेतली आहे. मात्र, खडकवासला पोटनिवडणुकीत "मनसे'ने मनापासून काम केल्यामुळेच विजय सुकर झाला, असे युतीच्या स्थानिक नेत्यांना वाटते. त्यामुळे आगामी सर्व निवडणुकांसाठी खडकवासला पॅटर्न राबविला तरच विजय मिळेल. अन्यथा, केवळ एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करीत बसावे लागेल, असे भाजप नेतृत्वास वाटत आहे. मुंबई महापालिकेत कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडी झाली तर शिवसेना-भाजपला सत्तेच्या जवळही जाता येईल की नाही, याविषयी युतीतील अनेक नेत्यांना शंका वाटत आहे. त्यामुळे "मनसे'ला जवळ करण्यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरू आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडे व पुणे, पिंपरी-चिंचवडचे संघटनमंत्री श्रीकांत भारती यांनी "मनसे'बद्दल अनेक वेळा सकारात्मक भूमिका घेतलेली आहे. त्यामुळे भाजपमधील नेते मंडळी पुन्हा एकदा दोन्ही ठाकरे बंधूंना एकत्र आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचे समजते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें