सोमवार, 14 नवंबर 2011

गांधी कुटुंबामुळेच उत्तर प्रदेश मागासलेला - राज

गांधी कुटुंबामुळेच उत्तर प्रदेश मागासलेला - राज सकाळ वृत्तसेवा Tuesday, November 15, 2011 AT 01:00 AM (IST) मुंबई - उत्तर प्रदेशात सर्वाधिक काळ गांधी कुटुंब आणि कॉंग्रेसनेच सत्ता उपभोगली आहे. त्यांच्यामुळेच तेथील विकास थांबला आहे. म्हणूनच उत्तर प्रदेशातील लोकांना महाराष्ट्रात जाऊन भीक न मागण्याचा सल्ला देणाऱ्या राहुल गांधी यांना समज नाही, असा टोला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लगावला. उत्तर प्रदेशातील लोकांनी महाराष्ट्रात जाऊन भीक मागू नये, असा सल्ला कॉंग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी यांनी आज दिला. या वक्तव्याचा खरपूस समाचार आज सायंकाळी मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी घेतला. महाराष्ट्राबाबत टीकाटिप्पणी करणाऱ्या अशा नेत्यांना आम्ही भीक घालत नाही आणि यापुढेही भीक घालणार नाही, असे त्यांनी सुनावले. उत्तर प्रदेशातून निवडून येऊन पंडित जवाहरलाल नेहरूंनी 17 वर्षे, इंदिरा गांधी यांनी 15 वर्षे आणि राजीव गांधी यांनी पाच वर्षे पंतप्रधानपद भोगले आहे. तेथूनच संजय गांधी लोकसभेवर गेले होते. सोनिया गांधी आणि राहुल गांधीही त्याच राज्यातून निवडून येतात. गांधी कुटुंबाला सातत्याने विजयी करणाऱ्या उत्तर प्रदेशात विकास झालाच नसल्याने तेथील लोकांना स्थलांतर करावे लागते. हे गांधी कुटुंबाचे अपयश आहे, असे टीकास्त्र राज यांनी सोडले. या विषयावर अधिक माहिती पाहिजे असल्यास राहुल यांची महाराष्ट्रात फुकटची शिकवणी घेण्यास आपण तयार आहोत, असे राज म्हणाले. उत्तर प्रदेशातील निवडणुकीत राहुल गांधींच्या सल्ल्याचा कॉंग्रेसला फटका बसेल, अशी भविष्यवाणीही त्यांनी केली. मराठी माणसापासून रोजगाराच्या संधी लपवण्यात आल्या. आताही रेल्वेभरतीसाठी तब्बल साडेपाच लाख युवकांनी अर्ज दाखल केले आहेत. यापुढे नोकऱ्यांच्या जाहिराती मराठी वृत्तपत्रांतून दिल्याच पाहिजेत, अशी मागणी त्यांनी केली. राजीव गांधींच्या मारेकऱ्यांची शिक्षा माफ करण्याचा ठराव तामिळनाडू विधानसभेत होतो. अफजल गुरूला माफ करण्याचा प्रयत्न ओमर अब्दुला करतात. पण त्यांच्यावर कोणीही टीका करत नाही. असा प्रकार जर महाराष्ट्रात घडला असता, तर सर्व देश तुटून पडला असता, असा शेरा राज यांनी मारला

1 टिप्पणी: