मंगलवार, 6 दिसंबर 2011

पेडर रोडचा उड्डाणपूल झालाच पाहिजे - राज

पेडर रोडचा उड्डाणपूल झालाच पाहिजे - राज
सकाळ वृत्तसेवा
Wednesday, December 07, 2011 AT 01:45 AM (IST)

मुंबई - कोणाचाही विरोध असला, तरी पेडर रोडचा उड्डाणपूल झालाच पाहिजे, अशी स्पष्ट भूमिका घेत, जर या उड्डाणपुलासाठी जनसुनावणी घेणार असाल, तर यापुढील प्रत्येक उड्डाणपूल हा जनसुनावणी घेऊनच झाला पाहिजे, असा खणखणीत इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल (मंगळवार) दिला. त्यामुळे राजकीय विरोधामुळे या उड्डाणपुलावरून येत्या काळात राजकीय उड्डाणे सुरू होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

स्थानिकांच्या विरोधामुळे राज्य सरकारने पेडर रोडवरील उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय रद्द केला. मुंबईतल्या या उड्डाणपुलासाठी जनसुनावणी घेण्यात आली होती. सरकारच्या या भूमिकेवर राज ठाकरे यांनी मंगळवारी जोरदार टिकास्त्र सोडले. उड्डाणपुलाला विरोध हा केवळ पेडर रोडवासीयांचा अजेंडा असून, मंगेशकर कुटुंबीयांना पुढे करून हा अजेंडा राबविला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. या उड्डाणपुलासाठी जनसुनावणी घेता, मग मुंबईतील इतर पूल, स्कायवॉक व मोनो रेल्वे उभारणीसाठी जनसुनावणी का नाही झाली, असा परखड सवाल करीत यापुढे पेडर रोडसाठी जनसुनावणी झाल्यास संपूर्ण मुंबईतील लोक जनसुनावणीला जातील, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला.
पेडर रोडवासीयांच्या या भूमिकेचा राज ठाकरे यांनी खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले, "मुंबईत रोजच्या रोज इतर प्रांतातून लोक येतात, गाड्या वाढतात, याबद्दल हे कधीही बोलत नाहीत. उद्या शिवाजी पार्क आणि वरळीतील रहिवासी सागरी सेतूवर आक्षेप घेतील. राज्यात होत असलेल्या प्रकल्पांना होणाऱ्या विरोधाबद्दल विचारले असता, हा विरोध राजकीय असेल तर मोडून काढला पाहिजे, अशी भूमिकाही त्यांनी मांडली.

जयंत पाटील "चकित चेंडू'
या पत्रकार परिषदेत ग्रामविकास मंत्री व मुंबईचे पालकमंत्री जयंत पाटील यांची "चकित चेंडू' अशी खिल्ली उडवत त्यांची नक्कल राज ठाकरे यांनी केली. पाटील यांनी बोजा-बिस्तरा उचलून उपनगरात राहायला जावे, मग या उड्डाणपुलाबद्दल बोलावे, असा टोलाही त्यांनी लगावला.

हा पूल भारतीयांसाठी आहे
हा पूल उभारल्यास आपण दुबईत राहायला जाऊ, असा इशारा ज्येष्ठ पार्श्‍वगायिका आशा भोसले यांनी दिला होता. याबद्दल पत्रकारांनी विचारले असता राज ठाकरे म्हणाले, आपल्या एका कार्यक्रमात त्यांनी आपण भारतीय असल्याचे सांगितले होते. मग हे दुबई भारतात येते का हे माहीत नाही; पण हा पूल भारतीयांसाठी आहे. त्यांच्या परळच्या घराजवळदेखील उड्डाणपूल आहेच. त्यांनी दहा वर्षांपूर्वी हे विचार व्यक्त केले होते. मग त्याचा प्रतिध्वनी आताही ऐकू येतो का, असा सवालही त्यांनी केला.

वाहतूक पोलिस फक्त शिट्या वाजविणार काय?
गृहविभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव उमेश सारंगी यांच्या मुलाला पोलिसांनी पकडल्यामुळे वाहतूक पोलिसांचे दंड वसूल करण्याचे अधिकार काढून घेतले आहेत. मग हे पोलिस काय फक्त शिट्या वाजविणार काय, असा सवाल राज ठाकरे यांनी केला. आयएएस अधिकाऱ्याला झटका आला म्हणून का हा निर्णय घेण्यात आला? मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व गृहमंत्र्यांनी यात लक्ष घालावे, अशी मागणीही त्यांनी केली

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें