सोमवार, 19 दिसंबर 2011

कर्नाटकातील मराठी माणसाला कानडी आली पाहिजे - राज ठाकरे

कर्नाटकातील मराठी माणसाला कानडी आली पाहिजे - राज ठाकरे
सकाळ वृत्तसेवा
Tuesday, December 20, 2011 AT 01:00 AM (IST)
मुंबई - सीमावासीयांसाठी शिवसेनेचे आंदोलन चुकीच्या पद्धतीने सुरू आहे. अशा आंदोलनामुळे येथील आणि तेथील लोकांची डोकी फुटत आहेत. शिवसेनेला एवढाच जर हा विषय महत्त्वाचा वाटला होता, तर राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) काळात सोक्षमोक्ष का लावला नाही, असा टोला "मनसे'चे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेनेला लगावला आहे. कर्नाटकात राहणाऱ्या मराठी माणसाला कानडी आलीच पाहिजे, याबाबत आपले दुमत नसून, तेथील मराठी संस्कृतीवर मात्र घाला घातला जात असल्याने त्याला आपला विरोध असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी रविवारी रात्री शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. आज या पदाधिकाऱ्यांनी राज यांची भेट घेतली. त्या वेळी राज यांनी अशाच प्रकारे आंदोलन सुरू राहिल्यास पुढील 150 वर्षांत या विषयाचा सोक्षमोक्ष लागणे शक्‍य नसल्याचे सांगितले. मुळात या विषयावर मुख्यमंत्री अथवा पंतप्रधानांना निवेदने देऊन काहीही उपयोग होणार नाही, त्याऐवजी "पर्याय' निवडण्याची वेळ आली असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

कर्नाटक राज्यात राहत असताना कानडी भाषा आलीच पाहिजे. त्या त्या राज्यात राहताना तेथील भाषा बोललीच पाहिजे; पण त्याच वेळी कर्नाटक सरकारने मराठी संस्कृतीवर घाला घालण्याचा प्रयत्न करू नये, असा इशारा राज यांनी दिला. बेळगाव सीमावासीयांच्या विषयावर मी 21 डिसेंबरला भाजपचे अध्यक्ष नितीन गडकरी यांची भेट घेणार आहे. वेळ पडली तर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना भेटण्याची माझी तयारी असल्याचे त्यांनी सांगितले. शिवसेनेने केंद्रात सत्ता असताना "एनडीए'चे तोंड न दाबल्यानेच ही वेळ आली आहे. न्यायालयातील खटल्यासाठी महाराष्ट्राचे वकील तब्बल आठ वेळा गैरहजर राहिले, याचा जाब विरोधकांनी कधीही सरकारला विचारल्याचे दिसत नाही. त्याचबरोबर बेळगावसह सीमाभाग महाराष्ट्रात आल्यास तेथील जमिनीवर येथील सरकारची नजर आधी जाईल, असा इशारा देऊन योग्य सन्मान मिळत असल्यास नाहक आक्रमक आंदोलनाची गरज नसल्याचे सूतोवाच राज यांनी केले

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें