सोमवार, 9 जनवरी 2012

मनसे मुंबईत सर्व जागा लढवणार

मनसे मुंबईत सर्व जागा लढवणार
- सकाळ न्यूज नेटवर्क
Tuesday, January 10, 2012 AT 03:15 AM (IST)
मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मुंबई महापालिकेच्या सर्व म्हणजे 227 जागा लढवण्याचे निश्‍चित केले असून, त्यांच्या उमेदवारांची यादी 20 जानेवारीला जाहीर होणार असल्याचे सांगण्यात येते. मात्र, या यादीमध्ये मनसेच्या परीक्षेला न बसणाऱ्यांचीही नावे असतील, असे दिसते. ठाण्यामध्ये मात्र मनसे सर्व जागा लढवणार नाही, असेही कळते. तेथील काही प्रभागांमध्ये उमेदवार उभे करणे गरजेचेच नाही, असे मनसेला वाटत आहे.

मुंबईतील सर्व प्रभागांमध्ये आपली नेमकी किती ताकद आहे, हे अजमावून पाहण्यासाठीच मनसेने सर्वच्या सर्व जागांवर उमेदवार उभे करण्याचे ठरविल्याचे दिसते. कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडी आणि दुसरीकडे शिवसेना, भारतीय जनता पक्ष व रिपब्लिकन महायुती यांच्या लढतीमध्ये काही प्रभागांत आपला उमेदवार पक्षाची ताकद नसतानाही निवडून येण्याची शक्‍यता मनसेच्या नेत्यांना वाटत आहे. त्यामुळे मोजक्‍याच जागा लढवण्याऐवजी सर्व जागांवर उमेदवार उभे करावेत, अशा निष्कर्षावर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आले असल्याचे कळते. मतांचे विभाजन होण्याचा फायदा कुठेही होणे शक्‍य आहे. त्यामुळे सर्व जागांवर उमेदवार उभे करण्याची तयारी ठेवण्याच्या सूचना त्यांनी दिल्याचे एका मनसे नेत्याने सांगितले.

मनसेने सर्व प्रभागांमध्ये उमेदवार उभे करण्याचे ठरवतानाच "केवळ परीक्षा देणाऱ्यांनाच उमेदवारी' ही अट मात्र काढून टाकण्याचे ठरविल्याचे दिसत आहे. एखादा इच्छुक परीक्षेत उत्तीर्ण झाला असेल; पण त्याची निवडून येण्याची क्षमताच नसेल, तर काय उपयोग, असा सवाल मनसेचे नेतेच करीत आहेत. तसे त्यांनी राज ठाकरे यांनाही सांगितले आहे. त्यामुळे निवडून येण्याची क्षमता पाहूनच मनसे आपले उमेदवार नक्‍की करेल, असे दिसते. परिणामी, परीक्षेला न बसलेले अनेक उमेदवार मनसेच्या यादीत दिसले, तर आश्‍चर्य वाटण्याचे कारण नाही. अर्थात "परीक्षेला बसलेले आणि उत्तीर्ण झालेले बरेच उमेदवार आमच्या यादीत असतील,' असे मनसेच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले.

ठाण्यामध्ये मात्र मनसे 100 हून कमी उमेदवार उभे करेल, असे कळते. तेथील काही प्रभागांतून आपला उमेदवार निवडून येण्याची शक्‍यता नसेल आणि चांगले उमेदवारच मिळत नसतील, तर उगाच सर्व जागा लढवण्याचा हट्ट धरणे मनसेला उचित वाटत नाही, असे सांगण्यात आले.

- राज ठाकरेच करणार यादी निश्‍चित
- परीक्षा न दिलेल्यांनाही उमेदवारीची शक्‍यता
- परीक्षा हीच एकमेव अट नव्हती
- निवडून येण्याच्या पात्रतेवर भर

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें