मंगलवार, 17 जनवरी 2012

राज ठाकरे यांची मनसे फटाकेबाजी

राज ठाकरे यांची मनसे फटाकेबाजी
सुनील जावडेकर - सकाळ वृत्तसेवा
Tuesday, January 17, 2012 AT 01:04 PM (IST)
ठाणे - ठाण्यात पक्षसंघटनेत सुरू असलेल्या वादाला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी (ता.17) ठाणे भेटीत आवाज देत आपल्या महापालिका निवडणुकीच्या जंगी तयारीची एक झलक दाखवली. पक्षसंघटनेत निर्णय घेण्याचे सर्वाधिकार केवळ आपल्याकडेच असल्याचे स्पष्टपणे बजावत कोणाचीही त्यात ढवळाढवळ चालणार नाही, असेही त्यांनी यातून रोखठोकपणे सांगून टाकले. परिणामी, केवळ पदे मिळवून निष्क्रिय असलेल्या ठाण्यातील काही पदाधिकाऱ्यांनाही राज ठाकरे यांनी चाप लावला आहे. याबाबतचे वृत्त मंगळवारी "सकाळ'ने प्रकाशित केले होते.

ठाण्यातील मनसेत सर्व काही आलबेल असल्याचे चित्र जरी पदाधिकारी दाखवत असले तरी वास्तव काही वेगळेच सांगत आहे. दोन वर्षांपूर्वी झालेल्या ठाणे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ठाणेकरांची भरभरून मते मिळवणाऱ्या मनसेचा शहरातील दोन वर्षांनंतरचा आलेख मात्र फारसा समाधानकारक नाही. पक्षप्रमुख म्हणून राज ठाकरे यांनीही ठाण्यातील मनसेच्या कामगिरीवर आपली जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. मुळातच केवळ राज यांच्या लोकप्रियतेच्या लाटेवर स्वार होऊन निवडून येण्यातच धन्यता मानणारा एक वर्ग मनसेत आहे. सुशिक्षितांचा मोठा तरुण वर्ग असूनही मनसेच्या पदाधिकाऱ्यांना त्यांचा फारसा उपयोग संघटनावाढीसाठी करून घेता आलेला नाही, ही वस्तुस्थिती आहे. राजन राजे यांच्यासारखा नेता संघटनेपासून दूर गेल्यावर सुशिक्षितांचे सामूहिक नेतृत्व मनसेत पद्धतशीरपणे विकसित होऊ शकले असते. मात्र, एकेका प्रभागात पाच-सहा कार्यकर्ते आधीच इच्छुक असताना आता आणखीन ही सुशिक्षितांची नवी भानगड कशाला, असा विचार करून मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी संघटनावाढीसाठी असे कार्यकर्ते घडवलेच नाहीत. उलट इच्छुकांचे प्रमाण आपोआप कमी व्हावे आणि त्याला गळती लागावी यासाठी आंदोलनातही एखाद्‌-दुसरा कार्यकर्ता अभावानेच झळकू लागला. तेव्हाच येथील काही पदाधिकाऱ्यांची संकुचित आणि खुजी वृत्ती चर्चेत आली होती.

प्रत्यक्षात मनसेकडे तरुण कार्यकर्त्यांचे मोठे जाळे होते. मात्र, ते स्वतःच उद्‌धवस्त करण्यात आले. आताही ठाण्यातील तरुण मनसेकडे काही प्रमाणात आहेत. इतकेच नव्हे तर 18 ते 24 या वयोगटातील सुमारे अडीच लाखांच्या आसपास नवमतदार नोंदवले गेले आहेत आणि त्यांची मते निर्णायक ठरू शकतात इतपत निश्‍चितच परिणामकारक आहेत. मात्र, नगरसेवकाचे बाशिंग गुडघ्याला बांधलेल्या काही स्वयंघोषितांनी या निर्णायक मतदारांकडेच पाठ फिरवली आहे.

निर्वाणीचा इशारा
मनसेतील इच्छुकांच्या मुलाखती घेण्यासाठी ठाण्यात आलेल्या राज ठाकरे यांनी ठाणे मनसेत कार्यकारिणीत फेरबदल करावेच लागतील, असे सांगून निर्वाणीचा इशाराच दिला आहे. शिवाईनगरातील ज्येष्ठ नगरसेवक सुधाकर चव्हाण यांच्या मध्यंतरी झालेल्या एका कार्यक्रमात राज ठाकरे यांनी महापालिका निवडणुकीत फटकेबाजी करू, असे म्हटले होते. मात्र या फटाक्‍यांचा पहिलाच आवाज काही निष्क्रिय पदाधिकाऱ्यांवरच काढण्यात आल्याने मनसेतील संबंधितांचे धाबे दणाणले आहेत.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें