सोमवार, 30 जनवरी 2012

राज ‘निकाला’वर ठाम

राज ‘निकाला’वर ठाम
विशेष प्रतिनिधी , मुंबई

alt‘ज्यांना उमेदवारी मिळणार नाही, अशा सर्वाच्या घरच्यांची मी माफी मागतो,’ असे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर केल्यानंतरही राज यांनी उमेदवारांची यादी जाहीर करताच मुंबई व ठाण्यात नाराजीची लाट निर्माण झाली. राज यांच्या कृष्णभुवन या निवासस्थानी रविवारपासून सोमवार सायंकाळपर्यंत आपली कैफियत मांडण्यासाठी नाराजांचे तांडे येत होते. दादरमधील २२ उपशाखाध्यक्षांनी व ८४ गटाध्यक्षांनी तर राजीनामे दिल्याचे सांगण्यात येत होते. मात्र कोणीही राजीनामे दिलेले नाहीत, तसेच नाराज असले तरी कोणी बंडखोरी केली नसल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले. त्याचप्रमाणे कोणत्याही परिस्थितीत यादी बदलणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. इतक्या लोकांनी नाराजी व्यक्त केली याचाच अर्थ मी विजयाच्या किती जवळ आहे ते स्पष्ट होते असे सांगून राज म्हणाले, मी छातीठोकपणे यादी जाहीर केली आहे. मागच्या दाराने गुपचूप उमेदवारी देण्याचा धंदा केलेला नाही.
मनसेची यादी रविवारी जाहीर झाल्यानंतर दहिसरपासून मुंबईभर नाराजीचा स्फोट झाला. अनेक ठिकाणी महिलांच्या उमेदवारीवरून नाराजी निर्माण झाली. काही आमदारांनी खाजगीत आपला असंतोष व्यक्त केला, तर ठाण्यात नाराजांचे तांडे थेट पक्षकार्यालयावर चालून गेले. काही नाराजांनी आपल्या शाखांवरील राज यांची छायाचित्रे उतरवून शाखांना टाळे ठोकले व मनसेला ‘जय महाराष्ट्र’ केला. राज यांच्या बालेकिल्ल्यात प्रभाग १८५ मधून विभाग अध्यक्ष संदीप देशपांडे यांना उमेदवारी जाहीर झाल्याने शाखाअध्यक्ष गिरीश धानुरकर यांच्या शाखेतील बावीस उपशाखाध्यक्ष व ८४ गटाध्यक्षांनी आपले राजीनामे आमदार नितीन सरदेसाई यांच्याकडे सादर केले. याबाबत सरदेसाई यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. सोमवारी दिवसभर आमदार मंगेश सांगळे, राम कदम, बाळा नांदगावकर, प्रवीण दरेकर हे आपापल्या मतदारसंघातील नाराजांची समजूत काढण्याचे काम करत होते. मात्र अनेक नाराजांनी थेट कृष्णभुवन गाठले. रविवार दुपारपासून पहाटे पाचपर्यंत राज ठाकरे हे स्वत: नाराजांना भेटून त्यांची समजूत काढत होते. सोमवारी सायंकाळपर्यंत अनेक विभागातील नाराजांनी राज यांची भेट घेतली. याबाबत राज ठाकरे यांना विचारले असता, ज्यांना उमेदवारी मिळाली नाही, अशांनी नाराज होणे स्वाभाविक आहे. मात्र त्यातील एकही बंडखोर नाही. या नाराजांची समजूत काढण्यात आली आहे. तसेच दादरमधील शाखाध्यक्ष गिरीश धानुरकर, यशवंत किल्लेदार यांची समजूत काढण्यात आली असून, एकाही पदाधिकाऱ्याने राजीनामा दिला नसल्याचे त्यांनी सांगितले. ‘मनसेच्या कार्यकर्त्यांबरोबर ही वर्षांनुवर्षे जपलेली नाती आहेत. मी त्यांची समजूत काढीन, मात्र यादी बदलणार नाही,’ असेही राज यांनी स्पष्ट केले

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें